रविवार, २९ मे, २०११

मॉन्सून डायरी: २९ मे, २०११

रप्राइजिंग एन्ट्री..   सकाळी साडेदहाला कोईम्बतूर ओलांडून पश्चिम घाटाकडे सरकत असताना सहज आकाशात लक्ष गेले. निळ्या आकाशामध्ये अधेमधे ढगांची तुरळक गर्दी होती. तेवढ्यात पश्चिमेकडे दिसू लागलेल्या डोंगरांकडे लक्ष गेले. त्यांचे माथे काळ्या ढगांनी वेढलेले दिसले. जसे जसे आम्ही घाटाकडे सरकत होतो, तसे त्या डोंगरांच्या मागे काळ्या, मोठ मोठाल्या ढगांची चादरच पसरल्याची जाणीव झाली. कर्नाटक आणि नंतर तामिळनाडूमधून येताना फार नाही, पण दुपारी ऊन आणि उकाडा जाणवलाच होता. आता मात्र तापमान कमी होत असल्याचे जाणवले. कोईम्बतूरवरून केरळमधे प्रवेश करताना मधेच पश्चिम घाटाची एक छोटी डोंगर रांग मधे येते. तेथील घाट उतरला की आपण थ्रीशूरमध्ये प्रवेश करतो. हा घाट सुरु होण्याआधी अथर्व आणि ऋषिकेशने हवामानाची निरीक्षणे घ्यायला सुरवात केली. वारा नैऋत्येकडून येत होता. त्यावेळी त्याचा कमाल वेग ताशी २० किलोमीटर पर्यंत पोचत होता. सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत होती. तापमान २७ अंश सेल्सिअस.
वाऱ्याची दिशा आणि वेग पाहून मॉन्सूनच्या जवळच आहोत की काय अशी शंका आली. घाटातून प्रवास करताना सर्वदूर ढगांनी वेढलेल्या आकाशाखाली हिरवी डोंगररांग पुढील आठवडाभर आम्हाला कसा अनुभव मिळणार आहे याचं ट्रेलरच दाखवत होती. दुपारी १२ च्या दरम्यान घाटातून प्रवास करताना काही वेळा पावसाच्या सरीही कोसळल्या. ढगांच्या गडगडाटा शिवाय दुपारी पडणारा हा पाऊस मॉन्सून चा तर नव्हे अशी सतत शंका येत होती. पण, आय एम डी च्या अंदाजा नुसार मॉन्सून या भागात पोचायला आणखी ३ दिवस बाकी होते. थ्रीशूर ओलांडून आम्ही एर्नाकुलम मध्ये पोचलो, तोच दुपारी ३ वाजता तिथे पाऊस सुरूच होता. मध्यम आणि एक सारख्या लयीत पडणाऱ्या या पावसाला पूर्व मोसमी म्हणायला मन तयार नव्हते. मी हॉटेल चालकाला विचारलं..'कधी पासून सुरु आहे पाऊस..?' तो म्हणाला..'काल रात्रीपासून..!' काय??..अरे हाच की मॉन्सून ..
मला अनपेक्षित धक्का बसला. आम्ही आय एम डी च्या साईट वर तपासले..'मॉन्सूनने अंदमानच्या समुद्रासह दक्षिण अरबी समुद्र आणि केरळच्या बहुतांश भागाला व्यापल्याचे दुपारच्या बुलेटीन मधून जाहीर करण्यात आले होते. तत्काळ डॉ. मेधा खोलेंना फोन केला. त्यांनी मॉन्सूनच्या या 'सरप्राइज'मागील करणे सांगितली. मागील काही दिवसांपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांना विशेष जोर मिळत नसल्याने मॉन्सूनचे अंदमानातील आगमन लांबले होते. मॉन्सून अंदमानात येणार.. मग दोन- तीन दिवसांनी केरळमध्ये.. असं वाटत असतानाच 'बैकलॉग भरून काढत मॉन्सूनने अंदमान कव्हर करतानाच केरळ मधेही तीन दिवस आधी एन्ट्री मारून आपला सरप्राइजिंग नेचर कायम राखलं..' डॉ. खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लक्षद्वीपपासून अंदमानपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सूनने वेगाने प्रवास करत भारतात प्रवेश केला आहे.. त्याचवेळी बाष्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी मॉन्सून ने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन- तीन दिवसात मॉन्सूनची आगेकूच सुरूच राहणार असून, तो दोन दिवसात कर्नाटकपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत त्याने व्यापलेल्या भागात मुसळधार पावसाचीही अपेक्षा आहे..'
आम्ही त्रिवेंद्रममध्ये पोचण्याआधीच मॉन्सूनने आम्हाला गाठून आपला पाठलाग करण्याचे आव्हान दिले. हा धक्का अनपेक्षित असला तरी, सुखद नक्कीच होता. गाडीतच आम्ही जल्लोष केला. आणि मॉन्सूनचे स्वागत करण्यासाठी गाडी जवळच असणाऱ्या अलेप्पी बीचवर वळवली. काळ्या ढगांनी भरलेलं आकाश आणि उंच उसळणाऱ्या लाटा एकमेकांच प्रतीबिम्बच दाखवत होत्या. समुद्रहि आपल्या अंदाजाने मॉन्सूनचं स्वागत करत होता. मॉन्सून आल्याची बातमी सगळीकडे आधीच पसरली होती. त्यातून रविवार असल्यामुळे मॉन्सूनचे पहिले वारे अंगावर घ्यायला आणि समुद्राचे 'उत्साही' रूप पाहायला मोठी गर्दी जमली होती. एका शाळेने तर जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांना जमवून 'मॉन्सूनचे विज्ञान' प्रत्यक्ष दाखवण्यासाठी छोटी सहलच काढली. हाच त्यांच्या शाळेचा पहिला दिवस..  भरपूर फोटो घेऊन आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन लगेचच म. टा.ला बातमी पाठवण्यासाठी जवळचे एक हॉटेल गाठले. या दरम्यान ज्यांना ज्यांना विचारले..त्या सर्वांना मॉन्सून आल्याचे माहित होते. दुपारी आय एम डी ने जाहीर केले असताना संध्याकाळ पर्यंत सर्वांपर्यंत हि माहिती कशी पोचली, याचे आश्चर्य वाटले. 
त्रिवेंद्रमकडे गाडी निघाली. वेगाने घडलेल्या घटना, त्यानंतर बातमीची डेडलाईन गाठताना झालेल्या धावपळीनंतर आता खूपच शांत, समाधानी आणि थकूनहि उत्साही वाटत होते. समुद्र किनाऱ्याला उजवीकडे ठेवून जाणाऱ्या एन एच ४७ या हायवेवर अंधार होता. पावसाच्या सरी कोसळत होत्याच. थोड्या थोड्या अंतराने हजारो बेडकांच्या कर्णकर्कश्श आवाजाने वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण होत होता. गाडीच्या सर्व खिडक्या उघडून, बाष्पयुक्त थंड वारे अंगावर घेत आम्ही त्रिवेंद्रमच्या दिशेने सरकत होतो.. बाजूला भीमसेन जोशींचा 'शुद्ध कल्याण' रंगात होता..

शनिवार, २८ मे, २०११

मॉन्सून डायरी: २८ मे, २०११, बेंगळूरू (दुपारी ४ )

काल रात्री १२ ला पुणे- बेंगळूरू हायवेवर गाडीने प्रवास सुरु केला. आधी १० मग ८ असं होत शेवटी ६ जण मोहिमेवर निघाले. ऋषिकेश पंडित, अभिषेक वाघमारे, अथर्व वांगीकर, शब्दगंधा कुलकर्णी, नम्रता भिंगार्डे आणि मयुरेश प्रभुणे. एका दिशेने सलग १५०० किलोमीटर प्रवास, तोहि दीड दिवसात करायचा असल्यामुळे काही जण आधीच काळजीत पडले. पण गाडीने जसा वेग घेतला, तसा अचानक सर्वांमध्ये उत्साह संचारला आणि वातावरण संगीतमय झालं. मल्लिकार्जुन मन्सूर आणि किशोरी अमोणकरांचे पहाटेचे राग सुरु असतानाच कर्नाटकाने आमचे स्वागत केले, ते जोरदार पावसाच्या सरींनी. कर्नाटक पासून दक्षिण भारतात सध्या सर्वत्र हजेरी लावणारा हा पाऊस मॉन्सून येत असल्याचीच चाहूल मनाला जातो.

उजाडल्यावर रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांची पूर्वमोसमी लगबग दिसू लागली. पाऊस पडून गेल्याने लाल, काळी ओलसर झालेली जमीन नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या हालचालीत 'लवकर आटपायला हवं' असेच भाव दिसून येत होते. दोन पांढऱ्या बैलांच्या मदतीने नांगरणाऱ्या शब्बीरला विचारलं..'नांगरायची वेळ कशी ठरवता?'.. माझ्याकडे थेट न बघता आपल्या कामात दंग असणाऱ्या शब्बीर ने दिलेले उत्तर खरच भारतीय शेतकऱ्यांची प्रातिनिधिक माहिती असावी असं वाटलं. 'सहाव्या महिन्याच्या पाचव्या तारखेला इथे पाऊस येतोच. आकाशात काळे ढग दाटू लागले, विजा चमकू लागल्या आणि तापमान वाढले कि आम्ही नांगरणी सुरु करतो. आणि पावसाचे आगमन झाले की पेरणी.' मी विचारलं, ' टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून कधी हवामानाचा अंदाज पाहून शेतीचे निर्णय घेता का?' ..यावर पुन्हा न पाहताच..'त्यात टीव्ही किंवा वर्तमानपत्राचा काय प्रश्न? आकाशात बघून लक्षात येतच की..' आजपर्यंत आयएमडीचा अंदाज कधीच न पाहिलेल्या त्या शेतकऱ्याचे त्यामुळे कधीच आडले नाही..हे पाहून आश्चर्य वाटलेच, पण असे लाखो शेतकरी जर आयएमडीच्या अंदाजापेक्षा आपल्या पारंपरिक, निरीक्षणांवर आधारित ज्ञानालाच प्राधान्य देत असतील, तर आयएमडीच्या कृषी हवामानशास्त्र विभागाला मूळापासून विचार करायला हवा.    

आय एम डी चा दुपारचा अपडेट नुकताच वाचला. येत्या २४ ते ४८ तासात मॉन्सून अंदमानात, तर येत्या ३ दिवसात केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता. कदाचित रात्रीच्या बुलेटीन मध्ये मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा होईलहि. सध्या बेंगळूरूजवळून प्रवास करीत आहोत. रात्री डायरी अपडेट करेनच.  

गुरुवार, २६ मे, २०११

'मॉन्सून डायरी'- २६ मे २०११, पुणे

'मॉन्सून' आता दोन दिवसांमध्ये अंदमानात पोचत आहे असं आयएमडीने जाहीर करून तमाम भारतीयांना दिलासा दिला. गेला आठवडाभर उपग्रहीय चित्रात भारताच्या दक्षिणेकडे बरेच ढग जमा झाल्याचं दिसत आहे. ते पाहून मॉन्सून एवढा दारापर्यंत येऊनही आत का येत नाही, असाच अनेकांचा समज झाला. त्यात २५ मे उलटूनही अंदमानातील आगमन जाहीर झाले नसल्यामुळे संभ्रमात भर पडली. पुण्यात तर याचे प्रतिबिंब वृत्तपत्रांमधून लगेचच पाहायला मिळाले. मॉन्सूनच्या अगमानाविषयी आय एम डी कडून अपेक्षित माहिती मिळाली नाही म्हटल्यावर, माध्यमांकडून मिळेल त्या तज्ञाकडून ('स्वयंघोषित' अर्थातच) माहिती घेऊन या स्थितीचे स्वतःच विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला. आणि हंगामातील पहिल्या 'इन्व्हेस्टीगेटिव्ह स्टोरी'चा जन्म झाला. (मॉन्सून प्रथमच अंदमान, श्रीलंकेआधी केरळमध्ये!)  गेले दोन दिवस पुण्यातील हवामान तज्ञांमध्ये याच बातमीची चर्चा आहे. आयएमडीकडून तर ही माहिती कोणी दिली याचा शोधही घेतला गेला. पण हे संबंधित रिपोर्टरचंच संशोधन असल्याचं आढळून आलं. 

'मॉन्सून डायरी'मध्ये या बातमीचा उल्लेख करण्याचं कारण सरळ आहे. (यामागे कोणतीही 'स्पर्धा' नाही.) पण मॉन्सून नीट समजून न घेता, तज्ञांशी चर्चा न करता वार्तांकन केल्यास अशी चूक होणे स्वाभाविक आहे. मात्र वाचकांपर्यंत गेलेल्या या चुकीच्या माहिती मागील सत्य काय आहे हे सर्वांना माहित असावे, हे एक 'सायन्स रीपोर्टर' म्हणून मला कर्तव्य वाटतं. (कोणीही पर्सनली घेणार नाही अशी अशा करतो.) या बातमीच्या 'लीड' 'हेडिंग' आणि खालील सविस्तर माहितीत अनेक अवैज्ञानिक विधाने आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात 'नैऋत्य मोसमी पाऊस' म्हणजेच मॉन्सून दक्षिण- पश्चिमेकडून सर्वप्रथम केरळमध्येच येऊ शकतो. दक्षिण भारतात वारे नैरुत्येकडून वाहू लागल्याशिवाय मॉन्सून आला असं जाहीरच करता येत नाही. आता वारे जर नैरुत्येकडून येणार असतील तर त्यात श्रीलंकेचा संबंध येतोच कुठे? (भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणावा. श्रीलंका भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडूच्या शेजारी आहे.) म्हणूनच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन शाखा असलेला मॉन्सून पश्चिमेकडे केरळमध्ये आणि पूर्वेकडे पश्चिम बंगाल, बांगलादेश, ईशान्येकडील राज्यात एकाच वेळी पोचतो. श्रीलंकेला तामिळनाडूप्रमाणे परतीच्या मॉन्सूनमधून अधिक पाऊस मिळतो. (मॉन्सून म्हणजे फक्त ढग, पाऊस नसून मुख्यतः नैरुत्येकडून येणारे वारे आहेत हे लक्षात घेतल्यास मॉन्सून श्रीलंकेत आधी पोचणार की केरळमध्ये हे लगेच लक्षात येऊ शकेल.)

मॉन्सून येतो म्हणजे एखादा ढगांचा समूह पुढे सरकतो असे नाही, तर एक विशिष्ठ दाबाचा पट्टा, नैरुत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांसह भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे पुढे सरकतो. (मॉन्सूनच्या प्रगतीचे चित्र सोबत जोडले आहे. त्यातून मॉन्सूनचा प्रवास कसा होतो हे लक्षात येऊ शकेल.) याला बाष्पाची जोड मिळाली की हा पट्टा जसा पुढे सरकतो तसा त्या भागात पाऊस वाढत जातो. आयएमडीने अंदमानातील मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला असल्यामुळे संबंधित बातमीतील चूक अधोरेखित झाली आहे. अंदमाननंतर २- ३ दिवसात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. 'इन्व्हेस्टीगेटिव्ह स्टोरी'बद्दल इतकंच पुरे. 

काल काही तज्ञांशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मॉन्सून अंदमानात आणि लगेच केरळ मध्ये येईल खरा. पण, वाऱ्यांना अजूनही पुरेसा जोर नाहीये. त्यामुळे त्याची पुढची प्रगती कशी असेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक तापमान मध्य प्रदेशातील शेवपुर येथे ४४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या छत्तीसगड ते तामिळनाडू दरम्यान उत्तर- दक्षिण कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्याचवेळी दुसरा कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानपासून ओरिसापर्यंत निर्माण झाला आहे. उपग्रहीय छायाचित्रामध्ये महाराष्ट्रावर आणि पूर्व भारतावर काही ढग जमा झाले असून, या भागात तापमान वाढून ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. (पुण्यातही संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला, आणि हवामान ढगाळ आहे.)

केरळला निघण्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, ऐनवेळी 'काही तांत्रिक कारणास्तव' काही जण येत नसल्याचे समजले आहे. या क्षणाला ६ जण निघण्याच्या तयारीत आहेत.
----------
प्रोजेक्ट मेघदूतच्या पार्टीसिपंट्सची पहिली (अनौपचारिक) मीटिंग रात्री ११ ते १ दरम्यान पार पडली. निघायच्या आदल्या दिवशी सर्वांनी ऑफीसवर जमावं असं ठरलं होतं. त्यानुसार मुंबईहून शब्दगंधा कुलकर्णी, नम्रता भिंगार्डे, नाशिकहून ऋषिकेश पंडित आणि पुण्यातून अभिषेक वाघमारे आणि मी असे पाच जण उपस्थित होतो. उद्या सकाळी अथर्व वांगीकर मुंबईहून पोचेल असा निरोप आला आहे. आणि उर्वरित दोघांचेही दुपारपर्यंत समजण्याची अपेक्षा आहे.
'मॉन्सूनचा विविध नजरांमधून अभ्यास' असे या प्रकल्पाचे स्वरूप नेमकी कसे असेल, याचा प्रत्यय आज इंट्रोडक्शन दरम्यान आला. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे, दृष्टीकोन वेगळा, विचारसरणी वेगळी..जर्मनीतील शिक्षणापासून  भारतातील दारिद्र्यरेषेची मर्यादा आणि आकाशनिरीक्षणातील (अनाकलनीय) ताराकासामुहांपासून ते नाशिकच्या ( कडू /  गोड ? ) वाईनपर्यंत अनेक विषयांवर कोणतीही पूर्वओळख नसताना छान गप्पा रंगल्या..वादविवाद झाले, 'पंडित'ला छळून झालं आणि रात्री १ वाजता चौपाटीवर कुल्फी खाऊन ही मीटिंग संपली.
दरम्यान, त्याआधी दिवस धावपळीत गेला. सर्वप्रथम आयआयटीएममध्ये जाऊन आयएमएसपीचे सचिव  डॉ. मिलिंद मुजुमदारांची भेट घेतली आणि प्रोजेक्टच्या तयारीची कल्पना दिली. त्यानंतर वर्ल्ड मेट्रीओलोजीकॅल ऑर्गनायझेशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेवरून कालच परतलेल्या पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पाचे स्वरूप आणि नंतर त्यातून समोर येणाऱ्या माहितीचा अंदाज घेतल्यावर प्रोजेक्ट मेघदूतला त्यांनी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली. आयएमएसपीचे सहसचिव श्री. जमादार यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला आवश्यक सर्व हवामानशास्त्रीय उपकरणे मिळवून देण्याची व्यवस्था स्वतःच्या जबाबदारीवर केली.
'वेदर अपडेट' पाहून उद्या (२७ मे ) संध्याकाळी निघण्याचे निश्चित केले आहे.
'मॉन्सून डायरी'चा पुढचा भाग प्रवासातूनच लिहेन..            

बुधवार, २५ मे, २०११

'मॉन्सून डायरी'- २५ मे २०११, पुणे

(आजपासून 'वैश्विक'वर 'मॉन्सून डायरी' सुरु करीत आहे. प्रोजेक्ट मेघदूतच्या दैनंदिन नोंदी, प्रवासातील अनुभव रोजच्या रोज शक्यतो 'लाइव्ह' देण्याचा प्रयत्न राहील. मॉन्सूनचे वारे महासागरात माघारी फिरेपर्यंत 'मॉन्सून डायरी' मॉन्सूनचे इतिवृत्त कळवत राहील. अभिप्राय, सूचना जरूर कळवाव्यात.)   
------------------------------------------------------------------------------------  
    

गेल्या दोन वर्षांत मॉन्सूनची दोन अगदी विरुद्ध रूपे भारताने पाहिली. २००९ मध्ये 'एल निनो' (प्रशांत महासागरातील गरम पाण्याचे प्रवाह) सक्रीय असताना भारतात गेल्या ३० वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ पडला (सरासरीच्या ७८ टक्के पाऊस). आणि २०१० मध्ये 'ला निना' (एल निनो ची विरुद्ध स्थिती) असताना भारताच्या बहुतेक भागात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. आता तिसऱ्या वर्षी काय होणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) त्यांच्या दीर्घकालीन अंदाजामध्ये यावर्षी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले आहे. आयएमडीतर्फे दुसरा अंदाज देण्यात आला आहे, तो म्हणजे त्याच्या केरळमधील आगमनाचा. ३१ मे रोजी नैऋत्य मोसमी वारे केरळच्या किनाऱ्यावर धडकतील असे या अंदाजात म्हटले आहे. 
---------
पार्श्वभूमी 
साधारणपणे मे च्या मध्यात भारताला मॉन्सूनचे वेध लागतात. याच काळात मॉन्सूनचे वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात प्रवेश करतात. १५ ते २० मे दरम्यान मॉन्सून अंदमानच्या समुद्रात पोचतो (या तारखा पुढे मागे होतातच). त्यानंतर आठवडाभरात मॉन्सूनची एक शाखा अरबी समुद्रातून केरळमध्ये, तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पूर्व किनाऱ्यावर प्रवेश करते. भारताच्या मुख्य भूमीवर मॉन्सूनचे वारे एक जून रोजी प्रवेश करतात असे मानले जाते. 

यावर्षी १५ मे ते २५ मे हा कालावधी पहिला तर हवामानशास्त्रीयदृष्ट्या काय स्थिती होती ते पाहू..
१) एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटांच्या अभावामुळे यावर्षी उन्हाळा विशेष जाणवलाच नाही.
२) मे महिन्यातही पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डीस्टर्बन्स)  दर वर्षीच्या तुलनेत उष्ण दिवसांची संख्या (तापमान ४० अंशांच्या वर) देशातील बहुतेक शहरांमध्ये कमीच राहिली. थोडक्यात काही भाग वगळता उन्हाळा तुलनेने 'थंड' होता.
३) मात्र, १५ मे नंतर उत्तर भारत, राजस्थान आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली. राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्रात पाऱ्याने ४७ अंशांपर्यंत मजल मारली.
४) १७ ते २० मेच्या दरम्यान उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातले.            
५) उत्तर प्रदेशात वादळी वारा आणि विजांसह आलेल्या पावसाने ४२ जणांचा बळी घेतला. या मध्ये वीज अंगावर पडून, वादळामुळे झाड, घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश होता. या घटनांमध्ये ५० हून अधिक जण जखमीही झाले.
६) राजस्थान मध्ये या कालावधीत धुळीच्या वादळाने आकाश घेरले. 
७) मात्र, उत्तर, मध्य भारतासह महाराष्ट्रातहि अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा कायम राखला.

वरील सर्व स्थिती 'मॉन्सून येत आहे' हेच दर्शवत असल्याचे हवामानतज्ञांचे म्हणणे आहे. उत्तर भारतात धुळीची वादळे येणे, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणे हि मॉन्सूनपूर्व हवामानाची लक्षणे आहेत. सध्या महाराष्ट्रात पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता अधिक असून, वातावरण ढगाळ असल्यामुळे कमाल तापमान नियंत्रणात आहे. त्याच वेळी पूर्व किनाऱ्यावरहि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला असल्याच्या नोंदी आयएमडीच्या वेधशाळांनी घेतल्या आहेत.

मात्र, सर्वसाधारणपणे १५ ते २० मे दरम्यान अंदमानमध्ये दाखल होणारा मॉन्सून २५ मे उजाडूनहि अंदमान पर्यंत न पोचल्यामुळे काळजीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनचे केरळमधील आगमन लांबते कि काय अशी चिंता सर्वांना लागून आहे. आयएमडीतर्फे मात्र ३१ मे चा दिलेला अंदाज योग्य असल्याचे ठासून सांगण्यात येत आहे (त्यात +/- ४ दिवसांचा एरर आहे.. त्यांना काय जातंय सांगायला..) भारताच्या दक्षिण भागात पूर्व- पश्चिमेला ढगांची मोठी गर्दी दिसत आहे. तरीही आयएमडीतर्फे मॉन्सूनचे आगमन जाहीर का होत नाही हे अनेकांना उमजत नाहीये.

काही तज्ञांकडून मिळालेल्या माहिती नुसार बाष्प असले तरी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रातील आगमन लांबले आहे. (याचा अर्थ..मॉन्सून येणे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे येणे..नुसते ढग असून उपयोग नाही.) अशी स्थिती असताना आज दुपारी आयएमडीने येत्या तीन दिवसात मॉन्सून अंदमानच्या समुद्रात दाखल होईल अशी शक्यता वर्तवली आहे. याचा अर्थ उद्या किंवा परवा मॉन्सून अंदमानात दाखल होईल आणि केरळच्या दिशेने कूच करेल. सध्या हिंदी महासागरात दिसणारे बाष्प या वाऱ्यांच्या साथीला आले, तर या वर्षी मॉन्सूनचे आगमन धडाक्यात होईल यात शंका नाही.

 (नोंद: २००९ मध्ये मॉन्सून केरळमध्ये.., कर्नाटकात.,. कोकण मध्ये..., पुण्यात.. अशा बातम्या येत होत्या..मात्र पाऊसच नव्हता. याचा अर्थ मॉन्सूनचे वारे ठराविक दाबासह किमान पाऊस पडत पुढे सरकत होते. मात्र त्या वाऱ्यांबरोबर बाष्प नसल्यामुळे मॉन्सून पावसासह नाही तर, नुसताच कागदावर पुढे सरकत होता.)
---------------------------------------
प्रोजेक्ट मेघदूत अपडेट 

- तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उद्या दिवसभरात आयएमडीची उपकरणे हाताळणे, पावसाच्या, हवामानाच्या नोंदी ठेवणे यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
- सहभागींची लिस्ट जवळ जवळ फायनल झालीच आहे.
- प्रकल्पाच्या काही खर्चासाठी अजूनहि काही स्पॉन्सरशीप मिळतीये का ते पाहणे सुरु आहे.
- केरळमध्ये भेट द्यावयाच्या विविध क्षेत्रातील २० पेक्षा जास्त संस्थांची यादी तयार आहे.
- आज ऋषिकेश आणि अभिषेकने बोहरीआळी आणि अप्पा बळवंत चौकातून बरीच खरेदी केली.
- मॉन्सूनचा अपडेट पाहून लवकर निघण्यावर (२७ ला सकाळी) विचार सुरु आहे.              

रविवार, २२ मे, २०११

काऊन्ट डाऊन सुरु    पाहता पाहता प्रोजेक्ट मेघदूतचा शुभारंभ पाच दिवसांवर येऊन ठेपला. संकल्पना मांडल्यापासून सर्व स्तरातूनच प्रोजेक्ट मेघदूतचे स्वागत झाले. प्रकल्पाच्या विविध पैलूंबद्दल आत्मीयता असणाऱ्या अनेकांनी स्वतःहून आपल्याकडील माहिती, संदर्भ, संबंधित विषयांमधील तज्ञांची नावे, त्यांचे फोन नंबर देण्यास सुरवात केली. संस्कृतमधील अभ्यासकांनी मेघदूत आणि काही प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ काढून देण्याची तयारी दाखवली, काही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञांनी प्रवासासाठी काही बहुमूल्य अशा टिप्स दिल्या. दरम्यान, प्रकल्पासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारे 'चेसिंग द मॉन्सून' हे अलेक्झांडर फ्रेटर यांनी लिहिलेलं पुस्तक गायत्रीने तत्काळ 'फ्लिपकार्ट' वरून मागवून घेतले आणि भारतीय हवामान अभ्यासकांसाठी 'गाईड' असणारा वाय. पी. राव यांचा 'साऊथवेस्ट मॉन्सून' हा प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित अहवालहि उपलब्ध झाला. हळूहळू प्रकल्पासाठी आवश्यक पूर्वज्ञान मिळवण्याची व्यवस्था झाली. 
   सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) , भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि इंडियन मेट्रीओलोजीकल सोसायटी - पुणे (आयएमएसपी) यांनी संकल्पना ऐकताच तत्काळ संबंधित सर्व तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि प्रवासादरम्यान मोबाईल ओब्झर्वेटरीचीहि व्यवस्था झाली. त्यासाठी आयएमएसपीमधील हवामानतज्ञ सहभागींना विशेष प्रशिक्षणहि देणार आहेत. केरळमधून कायम सहकार्य करणारे पत्रकार- अजयकुमार यांनीहि त्रिवेंद्रम आणि संपूर्ण केरळ मधील महत्वाची ठिकाणे, व्यक्ती त्यांचे पत्ते उपलब्ध करण्यास सुरवात केली. आयएमडीनेहि स्थानिक पातळीवर आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. सर्व काही छान जुळून आलं आहे. 
     जवळ जवळ दहा दिवस वेळ द्यावा लागणार असल्यामुळे खूप इच्छा असूनही मॉन्सूनचा पाठलाग करणाऱ्या या मोहिमेत सहभागी होता येत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. पण काही जणांनी मागचा पुढचा विचार न करता आपला सहभाग जाहीर केला. आजच्या तारखेला विविध विषयांची पार्श्वभूमी असलेले ८ जण या मोहिमेतून केरळला जाण्यासाठी सज्ज आहेत. त्रिवेंद्रम ते कोकण या प्रवासादरम्यान प्रत्येकजण मॉन्सूनच्या वेगवेगळ्या पैलूंच्या नोंदी ठेवणार आहेत. स्वतःची प्रवास डायरी लिहिणार आहेत. त्यासाठी त्यांना पश्चिम घाटातल्या जंगलांमधून भटकावं लागेल, आडवाटेवरच्या गावांना भेटी द्याव्या लागतील, मॉन्सूनपूर्व तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागेल, मॉन्सूनच्या पारंपारिक स्वागताला कॅमेरामध्ये कैद करावे लागेल.. जंगलामधील पशु- पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करावे लागतील, समुद्रकिनारी, पर्वतांच्या शिखरांवरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची दिशा- वेग अभ्यासावा लागेल.. हे आठ दिवस सर्वजण मॉन्सूनच्या 'जल'रंगाने न्हाऊन निघतील..
       सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रांतील असल्यामुळे गप्पा- चर्चा रंगतीलच..पण हा दीर्घ प्रवास रंगतदार व्हावा यासाठी विशेष संगीतही मिळवणे सुरु आहे.. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांच्या साथीला हरिप्रसाद चौरासिया- शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेनही असतील.. 'साउन्ड ऑफ स्केप्स' आणि 'द एलिमेंट्स'द्वारे पहिल्या धारा झेलणाऱ्या पश्चिम घाटातल्या निसर्गाच्या भावना व्यक्त होतील.. तर कुमार गंधर्वांची निर्गुडी भजन वातावरणातील गंधाशी समरस होऊन एक अद्भुत दर्शन घडवतील...मॉन्सूनच्या पाठलागाला 'ताल' मिळेल ए. आर. रेहमानचा, तर पंचम- गुलझारची 'आंधी' पावसाची भाषा बोलू लागेल..      
         ही मोहीम आहेच, पण एक सोहळाहि आहे..धरती- मेघाच्या मिलनाचा ! 'प्रोजेक्ट मेघदूत' या सोहळ्याला 'लाईव्ह कव्हर' करणार आहे..               

मयुरेश, २२ मे, २०११  

मंगळवार, १० मे, २०११

लोणारसाठी धोक्याची घंटा !
लोणारसाठी धोक्याची घंटा ! 

सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्ट्यामधून दीडशे मीटर व्यासाचा अशनी वेगाने येऊन महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर धडकला. सेकंदाला १५ ते २० किलोमीटरच्या वेगाने झालेल्या प्रचंड आघातामुळे अतिकठीण समजाला जाणारा बसाल्ट पाण्यासारखा वितळला. ज्या ठिकाणी हा आघात झाला त्या ठिकाणी १८०० मीटर व्यासाचे विवर तयार झाले. परिसरातील जीवसृष्टी क्षणार्धात नष्ट झाली. हजारो अणूबॉम्ब एकाच वेळी फुटावे, असा तो आघात होता. या घटनेची नोंद त्यावेळच्या आदिमानवाने नक्कीच घेतली असेल. पुढे अनेक वर्षे हा परिसर जीवविरहित अवस्थेतच राहिला. सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी या विवरात पाण्याचे काही झरे कोसळू लागले आणि विवराच्या मध्यात सरोवर निर्माण झाले. हळूहळू त्या पाण्यात आणि पाण्याभोवती वैशिष्ट्यपूर्ण जैवसंस्था विकसित झाली. पुढे मानवालाही या रम्य जागेची भुरळ पडली. विविध राजांच्या राजवटीत, विवराच्या आत, सरोवराच्या काठावर महादेव, राम, देवीची सुबक मंदिरे उभारली गेली. वेद, रामायणापासून अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या जागेचा उल्लेख झाला. दक्खनच्या ओसाड पठारावर नंदनवन ठरावे असे ठिकाण पुढे लोणार म्हणून ओळखले जाऊ लागले. 
अनेक वर्षे परिसरातील जमिनीमधून आलेले क्षार एकाच जागी साठून लोणारचे पाणी खारट झाले. या खारट पाण्याच्या सरोवरामुळेच या ठिकाणाला लोणार हे नाव पडले. वेद काळापासूनचा मानवी इतिहास लोणारला लाभला असला तरी,  गेल्या दहा वर्षात, लोणार सातत्याने बातम्यांमधून चर्चेत येऊ लागले. नासाने मंगळावरील पाण्याच्या शोधासाठी लोणारचा घेतलेला आधार असो, किंवा ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय ठरू शकणारा, मिथेन खाणाऱ्या जीवाणूचे लोणारच्या पाण्यातील अस्तित्व असो, आपल्याला फक्त ऐतिहासिक किंवा भौगोलिक महत्व नसून, अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ असल्याचे लोणारने दाखवून दिले आहे. म्हणूनच लघुग्रहाद्वारे काही जीवांचे अवशेष या परिसरात विखरून त्यातून नव्या जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे का, याची शोधमोहीम इस्रोच्या मदतीने सुरु आहे. दुसरीकडे नासाच्या पुढाकाराने शास्त्रज्ञांचे एक पथक मंगळावर माणसाला पाठवण्याआधी लोणारमध्ये त्याला प्रशिक्षण देण्याचा विचार करीत आहे. लोणारमध्ये अनेक रहस्ये अजूनही दडलेली आहेत, ज्यातून कदाचित मानवाला पडलेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे (पृथ्वीवर जीवसृष्टी आली कशी आणि तिचा विकास कसा झाला) उत्तरही मिळू शकेल.

नव्या जैवसंस्थेचे अस्तित्व: 
मात्र, हे सर्व तेव्हाच होऊ शकेल, ज्यावेळी, लोणार आपल्या नैसर्गिक अवस्थेत अस्तित्वात असेल. खगोल विश्व या पुण्यातील संस्थेच्या पुढाकाराने नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लोणारच्या पाण्यात 'पाण कीटकांची' वसती आढळून आली. ही लोणार सरोवरातील मूळ जैवसंस्थेसाठी शेवटची धोक्याची घंटाच मानली जात आहे. लोणारचे पाणी हे ११- १२ पीएच क्षारतेचे आहे. या पाण्यात खरेतर कोणतेही जीव तग धरून राहू शकत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या सरोवरात मासे किंवा तत्सम जलचर दिसत नाहीत. या पाण्यात कठीण परिस्थितीत राहू शकणारे शैवाले आणि जीवाणूच असणे अपेक्षित असताना, पाण्यात राहणारे कीटक आढळून आल्यामुळे त्यांचे अन्नही अस्तित्वात असल्याचे दर्शवते. थोडक्यात लोणारच्या पाण्यात नवी जैवसंस्था विकसित होत असून, गेल्या २५ हजार वर्षात स्वतंत्रपणे विकसित झालेल्या येथील मूळ जैवसंस्थेसाठी हे धोकादायक ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे सर्व निसर्गतः घडत असते, तर लोणारच्या नैसर्गिक विकासाचा भाग म्हणून त्याला अभ्यासात आले असते. मात्र, यामागे आहे, थेट मानवी हस्तक्षेप. ज्यामुळे हे सरोवर आणि विवर आपली वैशिष्ट्ये कायमस्वरूपी गमावण्याच्या स्थितीत आहे. 

लोणारमधील मानवी हस्तक्षेप
पुण्यातील 'इकोनेट'तर्फे १९९९ मध्ये लोणारचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी तज्ञांनी त्यावेळी नोंदवलेली मानवी हस्तक्षेपाची निरीक्षणे आजही अधिक तीव्रतेने अस्तित्वात असल्याचे आढळून येते. सर्वात गांभीर्याची बाब म्हणजे, या जागतिक दर्जाच्या विवरात, आजही लोणार गावाचे ड्रेनेज थेट सोडून दिलेले आहे. औपचारिकता म्हणून स्थानिक प्रशासनाने मध्ये एक भिंत घातलेली असली, तरी आजही लोणारचे सांडपाणी वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी असणाऱ्या सरोवरात मिसळत आहे. विवराच्या आत आजही शेती केली जात असून, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांनी युक्त पाणी सरोवरात मिसळत आहे. सरोवराचा मुख्य स्रोत असणाऱ्या 'धारा' या झऱ्याच्या पाण्याद्वारे साबण, डीटर्जंटचे पाणीही सरोवरात थेट जाते. जवळच बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे तेथील गोडे पाणी सरोवराच्या पाण्यात मिसळून, सरोवराची पातळी वाढतानाच, याची क्षारताही कमी झाली आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम, नव्या जैवसंस्थेच्या अस्तित्वाने दिसू लागले आहेत.
विवराच्या ५०० मीटरच्या परिसरात अशनीच्या आघाताच्या वेळी उडून पडलेले वैशिष्ट्यपूर्ण खडकांचे मिश्रण (इजेक्टा) पसरलेले आहे. लोणार हे गाव विवारापासून ५०० मीटरच्या आत असल्यामुळे तो भाग सोडून इतर भागाचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, असे अनेक शास्राज्ञांचे मत आहे. या भागात, नव्याने कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र १२ महिन्यात आपण कधीही लोणारला भेट दिली, तरी इजेक्टावर बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याचे दिसून येते. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र वृक्षतोड, पक्षी- प्राण्यांची शिकार हे येथील नित्यक्रम आहेत. विवराच्या काठावर आणि विवरात ही दारूच्या पार्ट्या सर्हास सुरु असतात. लोणारची मंदिरे सुमारे १५०० वर्षांपूर्वीची असून, अनेक मंदिरे कोसळलेल्या अवस्थेत आहेत, काही अवशेषांची तस्करी झाल्याचेही स्थानिक सांगतात. अशा अनेक समस्यांनी लोणारला घेरलेले असताना संबंधित पुरातत्व विभाग, भू- सर्वेक्षण विभाग, वन विभाग यांचे कार्य फलक उभारण्याव्यतिरिक्त काहीच नसल्याचे दिसून येते. या कोणत्याही विभागाचा एकही कर्मचारी लोणारमध्ये फिरताना आपल्याला परिसरात आढळून येणार नाही. याचाच फायदा घेऊन लोणारमध्ये अनेकवर्षे बेकायदेशीर हस्तक्षेप वाढत आहे.

'वर्ल्ड हेरीटेज'चा पर्याय
लोणारची अवस्था न पाहवून लोणारप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला जाब विचारून लोणारच्या संवर्धनासाठी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यावर सध्या तज्ञांची एक समिती कार्यरत आहे. मात्र, लोणारच्या समस्यांवर कायम स्वरूपी उपाय लोणारला 'वर्ल्ड हेरीटेज साईट'चा दर्जा मिळाल्यावरच मिळू शकेल, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. 'वर्ल्ड हेरीटेज साईट'साठी नामांकन करण्याआधी केंद्र सरकारला या परिसराच्या संवर्धन आणि विकासाचे धोरण जाहीर करावे लागेल आणि त्यानुसार ते प्रत्यक्षात ही आणावे लागेल. वर्ल्ड हेरीटेज साईट झाल्यावर लोणार हे फक्त स्थानिकांची किंवा महाराष्ट्राची जबाबदारी राहणार नसून, त्याच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे सर्वप्रकारे सहकार्यही मिळू शकेल. वर्ल्ड हेरीटेजच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही विभागातील बहुतेक निकषांना लोणार पात्र असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र त्या आधी लोणारला केंद्राने आपल्या हद्दीतील महत्वाचा ठेवा असणाऱ्या राष्ट्रीय यादीत स्थान देणे आवश्यक आहे. या यादी मध्ये समाविष्ट असणाऱ्या ठिकाणांचाच विचार युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरीटेज साईट साठी करण्यात येतो. भारताच्या राष्ट्रीय यादीत, काही रेल्वे, रेल्वेस्थानके यांचाही समावेश असताना, वैज्ञानिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक केंद्र असणाऱ्या लोणारचा समावेश कसा नाही, ही आश्चर्याची बाब आहे. लोणारचा समावेश प्रथम राष्ट्रीय यादीत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला भाग पडणे आवश्यक आहे.

लोणारबाबत समिती नेमून, वेळ काढत, अनेक वर्षांनी, एखाद दुसरे पाऊल उचलण्याची ही वेळ नाही. तसेच करत आल्यामुळे लोणारचे वैशिष्ट्य आज शेवटची घटका मोजत आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण महाराष्ट्रात असल्याचा अभिमान बाळगून त्याचे तसेच संवर्धन करणे आवश्यक आहे. तसे न घडल्यास, वैज्ञानिक महत्व असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण जैवसंस्था नष्ट केल्याचे पाप कायमस्वरूपी आपल्या माथी लागेल. 

(रविवार म. टा. मधून साभार )