मंगळवार, १० मे, २०११

लोणारसाठी धोक्याची घंटा !








लोणारसाठी धोक्याची घंटा ! 

सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्ट्यामधून दीडशे मीटर व्यासाचा अशनी वेगाने येऊन महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर धडकला. सेकंदाला १५ ते २० किलोमीटरच्या वेगाने झालेल्या प्रचंड आघातामुळे अतिकठीण समजाला जाणारा बसाल्ट पाण्यासारखा वितळला. ज्या ठिकाणी हा आघात झाला त्या ठिकाणी १८०० मीटर व्यासाचे विवर तयार झाले. परिसरातील जीवसृष्टी क्षणार्धात नष्ट झाली. हजारो अणूबॉम्ब एकाच वेळी फुटावे, असा तो आघात होता. या घटनेची नोंद त्यावेळच्या आदिमानवाने नक्कीच घेतली असेल. पुढे अनेक वर्षे हा परिसर जीवविरहित अवस्थेतच राहिला. सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी या विवरात पाण्याचे काही झरे कोसळू लागले आणि विवराच्या मध्यात सरोवर निर्माण झाले. हळूहळू त्या पाण्यात आणि पाण्याभोवती वैशिष्ट्यपूर्ण जैवसंस्था विकसित झाली. पुढे मानवालाही या रम्य जागेची भुरळ पडली. विविध राजांच्या राजवटीत, विवराच्या आत, सरोवराच्या काठावर महादेव, राम, देवीची सुबक मंदिरे उभारली गेली. वेद, रामायणापासून अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या जागेचा उल्लेख झाला. दक्खनच्या ओसाड पठारावर नंदनवन ठरावे असे ठिकाण पुढे लोणार म्हणून ओळखले जाऊ लागले. 
अनेक वर्षे परिसरातील जमिनीमधून आलेले क्षार एकाच जागी साठून लोणारचे पाणी खारट झाले. या खारट पाण्याच्या सरोवरामुळेच या ठिकाणाला लोणार हे नाव पडले. वेद काळापासूनचा मानवी इतिहास लोणारला लाभला असला तरी,  गेल्या दहा वर्षात, लोणार सातत्याने बातम्यांमधून चर्चेत येऊ लागले. नासाने मंगळावरील पाण्याच्या शोधासाठी लोणारचा घेतलेला आधार असो, किंवा ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय ठरू शकणारा, मिथेन खाणाऱ्या जीवाणूचे लोणारच्या पाण्यातील अस्तित्व असो, आपल्याला फक्त ऐतिहासिक किंवा भौगोलिक महत्व नसून, अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ असल्याचे लोणारने दाखवून दिले आहे. म्हणूनच लघुग्रहाद्वारे काही जीवांचे अवशेष या परिसरात विखरून त्यातून नव्या जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे का, याची शोधमोहीम इस्रोच्या मदतीने सुरु आहे. दुसरीकडे नासाच्या पुढाकाराने शास्त्रज्ञांचे एक पथक मंगळावर माणसाला पाठवण्याआधी लोणारमध्ये त्याला प्रशिक्षण देण्याचा विचार करीत आहे. लोणारमध्ये अनेक रहस्ये अजूनही दडलेली आहेत, ज्यातून कदाचित मानवाला पडलेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे (पृथ्वीवर जीवसृष्टी आली कशी आणि तिचा विकास कसा झाला) उत्तरही मिळू शकेल.

नव्या जैवसंस्थेचे अस्तित्व: 
मात्र, हे सर्व तेव्हाच होऊ शकेल, ज्यावेळी, लोणार आपल्या नैसर्गिक अवस्थेत अस्तित्वात असेल. खगोल विश्व या पुण्यातील संस्थेच्या पुढाकाराने नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लोणारच्या पाण्यात 'पाण कीटकांची' वसती आढळून आली. ही लोणार सरोवरातील मूळ जैवसंस्थेसाठी शेवटची धोक्याची घंटाच मानली जात आहे. लोणारचे पाणी हे ११- १२ पीएच क्षारतेचे आहे. या पाण्यात खरेतर कोणतेही जीव तग धरून राहू शकत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या सरोवरात मासे किंवा तत्सम जलचर दिसत नाहीत. या पाण्यात कठीण परिस्थितीत राहू शकणारे शैवाले आणि जीवाणूच असणे अपेक्षित असताना, पाण्यात राहणारे कीटक आढळून आल्यामुळे त्यांचे अन्नही अस्तित्वात असल्याचे दर्शवते. थोडक्यात लोणारच्या पाण्यात नवी जैवसंस्था विकसित होत असून, गेल्या २५ हजार वर्षात स्वतंत्रपणे विकसित झालेल्या येथील मूळ जैवसंस्थेसाठी हे धोकादायक ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे सर्व निसर्गतः घडत असते, तर लोणारच्या नैसर्गिक विकासाचा भाग म्हणून त्याला अभ्यासात आले असते. मात्र, यामागे आहे, थेट मानवी हस्तक्षेप. ज्यामुळे हे सरोवर आणि विवर आपली वैशिष्ट्ये कायमस्वरूपी गमावण्याच्या स्थितीत आहे. 

लोणारमधील मानवी हस्तक्षेप
पुण्यातील 'इकोनेट'तर्फे १९९९ मध्ये लोणारचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी तज्ञांनी त्यावेळी नोंदवलेली मानवी हस्तक्षेपाची निरीक्षणे आजही अधिक तीव्रतेने अस्तित्वात असल्याचे आढळून येते. सर्वात गांभीर्याची बाब म्हणजे, या जागतिक दर्जाच्या विवरात, आजही लोणार गावाचे ड्रेनेज थेट सोडून दिलेले आहे. औपचारिकता म्हणून स्थानिक प्रशासनाने मध्ये एक भिंत घातलेली असली, तरी आजही लोणारचे सांडपाणी वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी असणाऱ्या सरोवरात मिसळत आहे. विवराच्या आत आजही शेती केली जात असून, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांनी युक्त पाणी सरोवरात मिसळत आहे. सरोवराचा मुख्य स्रोत असणाऱ्या 'धारा' या झऱ्याच्या पाण्याद्वारे साबण, डीटर्जंटचे पाणीही सरोवरात थेट जाते. जवळच बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे तेथील गोडे पाणी सरोवराच्या पाण्यात मिसळून, सरोवराची पातळी वाढतानाच, याची क्षारताही कमी झाली आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम, नव्या जैवसंस्थेच्या अस्तित्वाने दिसू लागले आहेत.
विवराच्या ५०० मीटरच्या परिसरात अशनीच्या आघाताच्या वेळी उडून पडलेले वैशिष्ट्यपूर्ण खडकांचे मिश्रण (इजेक्टा) पसरलेले आहे. लोणार हे गाव विवारापासून ५०० मीटरच्या आत असल्यामुळे तो भाग सोडून इतर भागाचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, असे अनेक शास्राज्ञांचे मत आहे. या भागात, नव्याने कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र १२ महिन्यात आपण कधीही लोणारला भेट दिली, तरी इजेक्टावर बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याचे दिसून येते. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र वृक्षतोड, पक्षी- प्राण्यांची शिकार हे येथील नित्यक्रम आहेत. विवराच्या काठावर आणि विवरात ही दारूच्या पार्ट्या सर्हास सुरु असतात. लोणारची मंदिरे सुमारे १५०० वर्षांपूर्वीची असून, अनेक मंदिरे कोसळलेल्या अवस्थेत आहेत, काही अवशेषांची तस्करी झाल्याचेही स्थानिक सांगतात. अशा अनेक समस्यांनी लोणारला घेरलेले असताना संबंधित पुरातत्व विभाग, भू- सर्वेक्षण विभाग, वन विभाग यांचे कार्य फलक उभारण्याव्यतिरिक्त काहीच नसल्याचे दिसून येते. या कोणत्याही विभागाचा एकही कर्मचारी लोणारमध्ये फिरताना आपल्याला परिसरात आढळून येणार नाही. याचाच फायदा घेऊन लोणारमध्ये अनेकवर्षे बेकायदेशीर हस्तक्षेप वाढत आहे.

'वर्ल्ड हेरीटेज'चा पर्याय
लोणारची अवस्था न पाहवून लोणारप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला जाब विचारून लोणारच्या संवर्धनासाठी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यावर सध्या तज्ञांची एक समिती कार्यरत आहे. मात्र, लोणारच्या समस्यांवर कायम स्वरूपी उपाय लोणारला 'वर्ल्ड हेरीटेज साईट'चा दर्जा मिळाल्यावरच मिळू शकेल, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. 'वर्ल्ड हेरीटेज साईट'साठी नामांकन करण्याआधी केंद्र सरकारला या परिसराच्या संवर्धन आणि विकासाचे धोरण जाहीर करावे लागेल आणि त्यानुसार ते प्रत्यक्षात ही आणावे लागेल. वर्ल्ड हेरीटेज साईट झाल्यावर लोणार हे फक्त स्थानिकांची किंवा महाराष्ट्राची जबाबदारी राहणार नसून, त्याच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे सर्वप्रकारे सहकार्यही मिळू शकेल. वर्ल्ड हेरीटेजच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही विभागातील बहुतेक निकषांना लोणार पात्र असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र त्या आधी लोणारला केंद्राने आपल्या हद्दीतील महत्वाचा ठेवा असणाऱ्या राष्ट्रीय यादीत स्थान देणे आवश्यक आहे. या यादी मध्ये समाविष्ट असणाऱ्या ठिकाणांचाच विचार युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरीटेज साईट साठी करण्यात येतो. भारताच्या राष्ट्रीय यादीत, काही रेल्वे, रेल्वेस्थानके यांचाही समावेश असताना, वैज्ञानिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक केंद्र असणाऱ्या लोणारचा समावेश कसा नाही, ही आश्चर्याची बाब आहे. लोणारचा समावेश प्रथम राष्ट्रीय यादीत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला भाग पडणे आवश्यक आहे.

लोणारबाबत समिती नेमून, वेळ काढत, अनेक वर्षांनी, एखाद दुसरे पाऊल उचलण्याची ही वेळ नाही. तसेच करत आल्यामुळे लोणारचे वैशिष्ट्य आज शेवटची घटका मोजत आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण महाराष्ट्रात असल्याचा अभिमान बाळगून त्याचे तसेच संवर्धन करणे आवश्यक आहे. तसे न घडल्यास, वैज्ञानिक महत्व असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण जैवसंस्था नष्ट केल्याचे पाप कायमस्वरूपी आपल्या माथी लागेल. 

(रविवार म. टा. मधून साभार )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा