मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

गारपीट: स्थानिक- जागतिक हवामानाचा दुर्मिळ संयोगसलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र आणि मध्य भारताला गारपिटीने झोडपले. सध्याच्या पिढीसाठी गारपीट ही तशी नवी घटना. दुपारनंतर एकाएकी आभाळ भरून येऊन काळे ढग दाटतात आणि बघता बघता संत्र्या- लिंबाच्या आकाराच्या गारांचा वर्षाव सुरु होतो. साधारणपणे अर्ध्या तासाचाच खेळ. मात्र, नुकसान भयावह. आकाशातून दहा- पंधरा किलोमीटर वरून येणाऱ्या या टपोऱ्या गारा अंगावर पडून अनेक जनावरे दगावतात. घराची छप्परे फोडून या गारा घरात आसरा घेणाऱ्यांनाही जखमी करतात. शेतीच्या होणाऱ्या नुकसानाला तर पारावरच नाही.

काय आहे ही घटना? एकाएकी हे गारांचे सत्र कसे सुरु झाले याबाबत तज्ञांच्या मुलाखतीतून आणि प्रत्यक्ष गारपिटीचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेट देऊन घेतलेला हा मागोवा. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मध्य प्रदेशच्याही मोठ्या भागांत गारपीटीसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली. काही भागांत तर गारपीटीमुळे झोपड्या कोसळल्या, शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली. दोन्ही राज्यांत मिळून शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचे आकडे समोर येत आहेत. ध्यानीमनी नसताना फेब्रुवारी- मार्चमध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती हवामानाच्या एका दुर्मिळ स्थितीचे दर्शन घडवते.

भारतात पाऊस हा फक्त वळीवाचा आणि मॉन्सूनचाच असू शकतो असा आपला समज असतो. आणि या व्यतिरिक्त पडणारा पाऊस हा 'अवकाळी' म्हणून आपण मोकळे होतो. मात्र एक मूलभूत गोष्ट या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. वातावरणात पुरेसे बाष्प आणि कमी दाब (बहुतेक वेळा तापमानात वाढ झाल्याने हा कमी दाब निर्माण होतो) असला की पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती असते. अशी स्थिती वर्षभरात कधीही निर्माण झाली तर पाऊस पडू शकतो. त्यासाठी नैऋत्य मोसमी वारेच हवेत असे नाही. आयएमडीच्या हवामानाच्या नोंदी पाहिल्यास वर्षभरात प्रत्येक महिन्यात पावसाच्या नोंदी आढळतात. त्यापैकी मे ते ऑक्टोबर या काळात तुलनेने अधिक पाऊस पडतो. सध्या फेब्रुवारी- मार्चमध्ये देशभर पडणाऱ्या पावसामागे मात्र जागतिक आणि स्थानिक अशा हवामानाच्या स्थितीचा संयोग कारणीभूत ठरला आहे.

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रोपिकल मेट्रीओलॉजीमधील (आयआयटीएम) वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी या घटनेचे सर्वप्रथम शास्त्रीय विश्लेषण केले आहे. त्यांच्या अभ्यासानुसार ही एकूण घटना जागतिक असून तिची व्याप्ती उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून ते थेट उष्णकटीबंधीय प्रदेशापर्यंत पसरलेली आहे. या घटनेमागे ध्रुवीय प्रदेशातून येणारे थंड वारे, समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि प्रशांत महासागरात निर्माण होणारी 'एल निनो'ची स्थिती यांचा एकत्रित संयोग कारणीभूत आहे.   

ध्रुवीय प्रदेशातून येणारे वारे: 

साधारणपणे डिसेंबरमध्ये ज्यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धात त्याच्या सर्वोच्च ठिकाणी पोचतो, त्यावेळी उत्तर ध्रुवीय प्रदेशात थंड वाऱ्यांचे प्रवाह मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये या प्रवाहांचा जोर वाढून ते ध्रुवीय प्रदेश ओलांडून ३० ते ६० अंश उत्तर या दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे संपूर्ण पृथ्वीवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये (वेस्टर्लीज) प्रवेश करतात. या थंड प्रवाहांमुळेच कॅनडा, अमेरिकेपासून युरोप, काश्मीर, जपानमध्ये दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते. ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांना घेऊन वाहणाऱ्या वेस्टर्लीजची दक्षिण सीमा सर्वसाधारणपणे ३० अंश उत्तरेपर्यंतच असते. मात्र काही वेळा उत्तर ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढला तर ती सीमा ३० अंशांच्याही खाली येते. सध्या या थंड प्रवाहाची सीमा चक्क १५ अंश उत्तर इतक्या खाली आल्यामुळे हे वारे महाराष्ट्रावरूनही वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावरील वातावरणाचा गोठणबिंदू (ज्या ठिकाणी पाण्याचा बर्फ होतो) जमिनीपासून चार किलोमीटर उंची पर्यंत घसरला आहे, जो सर्वसाधारणपणे जमिनीपासून पाच किलोमीटर उंचीवर असतो. पाच किलोमीटर उंचीवर बाष्पाचा बर्फ झाला तरी तो जमिनीवर येईपर्यंत वितळून त्याचे पाणी झालेले असते. मात्र सध्या गोठणबिंदू चार किलोमीटरवर असल्यामुळे तो जमिनीवर येईपर्यंत पूर्णपणे न वितळता गारांच्या स्वरुपात वृष्टी होत आहे.

समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल- मेमध्ये कमाल तापमान आणि वातावरणातील बाष्पाचे प्रमाण वाढून स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह पाऊस पडतो. याच पावसामध्ये काही प्रमाणात गारपीटही होते मात्र त्याचे प्रमाण कमी असते. हा पाऊस स्थानिक पातळीवर आणि विखुरलेल्या स्वरुपात पडत असतो. सध्या फेब्रुवारी - मार्चमध्ये हिवाळा संपत असताना जमिनीपेक्षा समुद्रपृष्ठाचे तापमान तुलनेने अधिक असते. या स्थितीमुळे समुद्रावर कमी दाब तर जमिनीवर जास्त दाब अशी स्थिती तयार होते. जमिनीवरील जास्त दाबाकडून समुद्रावरील कमी दाबाकडे वाऱ्यांचे प्रवाह वाहू लागतात आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत पुन्हा जमिनीवर प्रवेश करतात. यावेळी जमिनीवर येताना ते समुद्रावर तयार झालेले बाष्पही घेऊन येतात. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या भागांत एकवटले. दोन्ही दिशांनी आलेले हे वारे एकमेकांना धडकून वातावरणात वर गेले आणि चार किलोमीटर उंचीवर पोचताच (ध्रुवीय प्रदेशातून आलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे खाली आलेला गोठण बिंदू) त्यांच्यापासून गारपीट सुरु झाली. बाष्प युक्तवारे आणि थंड वारे यांचा प्रभाव कायम राहिल्यामुळे आठवडाभर ही गारपीट सुरूच राहिली.

एल निनोची भूमिका 

गेल्या आणि यंदाच्या वर्षी जानेवारी पासूनच प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती (तेथील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीच्यावर) निर्माण होत आहे. या स्थितीच्या प्रभावामुळेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाची दक्षिण सीमा ३० अंश उत्तरेपासून खाली सरकून १५ अंश उत्तरेपर्यंत आली आहे. म्हणूनच साधारणपणे उत्तर- वायव्य भारतातून (पंजाब, हरियाणा, जम्मू- काश्मीर) वाहणारे थंड वारे महाराष्ट्रापर्यंत खाली सरकले आहेत.

अशा स्थितीचे पूर्वानुमान शक्य !  
ध्रुवीय प्रदेशातून पश्चिमेमार्गे येणारे थंड वारे, त्यांची दक्षिण सीमा खाली सरकण्यास कारणीभूत ठरलेली एल निनोची स्थिती आणि त्यात दोन्ही बाजूच्या समुद्रावरून आलेले बाष्प यांचा दुर्मिळ संयोग झाल्यामुळे फेब्रुवारी - मार्चमध्ये राज्यभर गारपीट होत आहे. या सर्व स्थितीचा समावेश असणारी मॉडेल जगभर वापरली जातात. ज्याच्या आधारे गारपीट आणि पावसाची पूर्वकल्पना आठवडाभर आधीच देणे शक्य आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवातून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदा तीन- चार दिवस आधीच अशा प्रकारच्या मॉडेलच्या साह्याने गारपिटीचा अंदाज वर्तवला. आर्थिक नुकसान टळले नाही तरी, यामुळे जीवित हानी झाली नाही याची नोंद घ्यायला हवी. अर्थात ही घटना सर्वांनीच धडा घेण्यासारखी आहे. निसर्गाला एका नियमित स्वरुपात गृहीत धरता येणार नाही, त्याच्यातील चढ -उतार नेमकेपणाने ओळखून त्यानुसार आपले नियोजन करण्याचा धडा यातून सर्वांनीच घ्यायला हवा.

-------------------------------------------------
मान्सूनसाठी धोक्याची सूचना !
पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह मंदावले की, भारतीय उपखंडात मान्सून विकसित होण्यास सुरुवात होत असते. एक अभ्यास असे सांगतो की, ज्या वर्षी हिमालयात बर्फवृष्टी जास्त काळ सुरु राहते, त्या वर्षी मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असते. सलग दुसऱ्या वर्षी तशीच स्थिती कायम असून, अद्यापही पश्चिमेकडून येणारे थंड वारे कमी झालेले नाहीत. याचा प्रतिकूल परिणाम मान्सूनच्या आगमनाच्या तारखेवर तसेच, त्याच्या त्या वेळेसच्या प्रमाणावर होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज हवामान शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. त्यात भर म्हणून सध्या एल- निनोही आकाराला येत आहे, ज्याचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर होतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर सध्या तरी हवामानाची वक्रदृष्टी असल्याचे हवामानतज्ञ सांगत आहेत.
------------------------------------------------------  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा