गुरुवार, २६ मे, २०११

'मॉन्सून डायरी'- २६ मे २०११, पुणे

'मॉन्सून' आता दोन दिवसांमध्ये अंदमानात पोचत आहे असं आयएमडीने जाहीर करून तमाम भारतीयांना दिलासा दिला. गेला आठवडाभर उपग्रहीय चित्रात भारताच्या दक्षिणेकडे बरेच ढग जमा झाल्याचं दिसत आहे. ते पाहून मॉन्सून एवढा दारापर्यंत येऊनही आत का येत नाही, असाच अनेकांचा समज झाला. त्यात २५ मे उलटूनही अंदमानातील आगमन जाहीर झाले नसल्यामुळे संभ्रमात भर पडली. पुण्यात तर याचे प्रतिबिंब वृत्तपत्रांमधून लगेचच पाहायला मिळाले. मॉन्सूनच्या अगमानाविषयी आय एम डी कडून अपेक्षित माहिती मिळाली नाही म्हटल्यावर, माध्यमांकडून मिळेल त्या तज्ञाकडून ('स्वयंघोषित' अर्थातच) माहिती घेऊन या स्थितीचे स्वतःच विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला. आणि हंगामातील पहिल्या 'इन्व्हेस्टीगेटिव्ह स्टोरी'चा जन्म झाला. (मॉन्सून प्रथमच अंदमान, श्रीलंकेआधी केरळमध्ये!)  गेले दोन दिवस पुण्यातील हवामान तज्ञांमध्ये याच बातमीची चर्चा आहे. आयएमडीकडून तर ही माहिती कोणी दिली याचा शोधही घेतला गेला. पण हे संबंधित रिपोर्टरचंच संशोधन असल्याचं आढळून आलं. 

'मॉन्सून डायरी'मध्ये या बातमीचा उल्लेख करण्याचं कारण सरळ आहे. (यामागे कोणतीही 'स्पर्धा' नाही.) पण मॉन्सून नीट समजून न घेता, तज्ञांशी चर्चा न करता वार्तांकन केल्यास अशी चूक होणे स्वाभाविक आहे. मात्र वाचकांपर्यंत गेलेल्या या चुकीच्या माहिती मागील सत्य काय आहे हे सर्वांना माहित असावे, हे एक 'सायन्स रीपोर्टर' म्हणून मला कर्तव्य वाटतं. (कोणीही पर्सनली घेणार नाही अशी अशा करतो.) या बातमीच्या 'लीड' 'हेडिंग' आणि खालील सविस्तर माहितीत अनेक अवैज्ञानिक विधाने आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात 'नैऋत्य मोसमी पाऊस' म्हणजेच मॉन्सून दक्षिण- पश्चिमेकडून सर्वप्रथम केरळमध्येच येऊ शकतो. दक्षिण भारतात वारे नैरुत्येकडून वाहू लागल्याशिवाय मॉन्सून आला असं जाहीरच करता येत नाही. आता वारे जर नैरुत्येकडून येणार असतील तर त्यात श्रीलंकेचा संबंध येतोच कुठे? (भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणावा. श्रीलंका भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडूच्या शेजारी आहे.) म्हणूनच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन शाखा असलेला मॉन्सून पश्चिमेकडे केरळमध्ये आणि पूर्वेकडे पश्चिम बंगाल, बांगलादेश, ईशान्येकडील राज्यात एकाच वेळी पोचतो. श्रीलंकेला तामिळनाडूप्रमाणे परतीच्या मॉन्सूनमधून अधिक पाऊस मिळतो. (मॉन्सून म्हणजे फक्त ढग, पाऊस नसून मुख्यतः नैरुत्येकडून येणारे वारे आहेत हे लक्षात घेतल्यास मॉन्सून श्रीलंकेत आधी पोचणार की केरळमध्ये हे लगेच लक्षात येऊ शकेल.)

मॉन्सून येतो म्हणजे एखादा ढगांचा समूह पुढे सरकतो असे नाही, तर एक विशिष्ठ दाबाचा पट्टा, नैरुत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांसह भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे पुढे सरकतो. (मॉन्सूनच्या प्रगतीचे चित्र सोबत जोडले आहे. त्यातून मॉन्सूनचा प्रवास कसा होतो हे लक्षात येऊ शकेल.) याला बाष्पाची जोड मिळाली की हा पट्टा जसा पुढे सरकतो तसा त्या भागात पाऊस वाढत जातो. आयएमडीने अंदमानातील मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला असल्यामुळे संबंधित बातमीतील चूक अधोरेखित झाली आहे. अंदमाननंतर २- ३ दिवसात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. 'इन्व्हेस्टीगेटिव्ह स्टोरी'बद्दल इतकंच पुरे. 

काल काही तज्ञांशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मॉन्सून अंदमानात आणि लगेच केरळ मध्ये येईल खरा. पण, वाऱ्यांना अजूनही पुरेसा जोर नाहीये. त्यामुळे त्याची पुढची प्रगती कशी असेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक तापमान मध्य प्रदेशातील शेवपुर येथे ४४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या छत्तीसगड ते तामिळनाडू दरम्यान उत्तर- दक्षिण कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्याचवेळी दुसरा कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानपासून ओरिसापर्यंत निर्माण झाला आहे. उपग्रहीय छायाचित्रामध्ये महाराष्ट्रावर आणि पूर्व भारतावर काही ढग जमा झाले असून, या भागात तापमान वाढून ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. (पुण्यातही संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला, आणि हवामान ढगाळ आहे.)

केरळला निघण्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, ऐनवेळी 'काही तांत्रिक कारणास्तव' काही जण येत नसल्याचे समजले आहे. या क्षणाला ६ जण निघण्याच्या तयारीत आहेत.
----------
प्रोजेक्ट मेघदूतच्या पार्टीसिपंट्सची पहिली (अनौपचारिक) मीटिंग रात्री ११ ते १ दरम्यान पार पडली. निघायच्या आदल्या दिवशी सर्वांनी ऑफीसवर जमावं असं ठरलं होतं. त्यानुसार मुंबईहून शब्दगंधा कुलकर्णी, नम्रता भिंगार्डे, नाशिकहून ऋषिकेश पंडित आणि पुण्यातून अभिषेक वाघमारे आणि मी असे पाच जण उपस्थित होतो. उद्या सकाळी अथर्व वांगीकर मुंबईहून पोचेल असा निरोप आला आहे. आणि उर्वरित दोघांचेही दुपारपर्यंत समजण्याची अपेक्षा आहे.
'मॉन्सूनचा विविध नजरांमधून अभ्यास' असे या प्रकल्पाचे स्वरूप नेमकी कसे असेल, याचा प्रत्यय आज इंट्रोडक्शन दरम्यान आला. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे, दृष्टीकोन वेगळा, विचारसरणी वेगळी..जर्मनीतील शिक्षणापासून  भारतातील दारिद्र्यरेषेची मर्यादा आणि आकाशनिरीक्षणातील (अनाकलनीय) ताराकासामुहांपासून ते नाशिकच्या ( कडू /  गोड ? ) वाईनपर्यंत अनेक विषयांवर कोणतीही पूर्वओळख नसताना छान गप्पा रंगल्या..वादविवाद झाले, 'पंडित'ला छळून झालं आणि रात्री १ वाजता चौपाटीवर कुल्फी खाऊन ही मीटिंग संपली.
दरम्यान, त्याआधी दिवस धावपळीत गेला. सर्वप्रथम आयआयटीएममध्ये जाऊन आयएमएसपीचे सचिव  डॉ. मिलिंद मुजुमदारांची भेट घेतली आणि प्रोजेक्टच्या तयारीची कल्पना दिली. त्यानंतर वर्ल्ड मेट्रीओलोजीकॅल ऑर्गनायझेशनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेवरून कालच परतलेल्या पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांची भेट घेऊन त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पाचे स्वरूप आणि नंतर त्यातून समोर येणाऱ्या माहितीचा अंदाज घेतल्यावर प्रोजेक्ट मेघदूतला त्यांनी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली. आयएमएसपीचे सहसचिव श्री. जमादार यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला आवश्यक सर्व हवामानशास्त्रीय उपकरणे मिळवून देण्याची व्यवस्था स्वतःच्या जबाबदारीवर केली.
'वेदर अपडेट' पाहून उद्या (२७ मे ) संध्याकाळी निघण्याचे निश्चित केले आहे.
'मॉन्सून डायरी'चा पुढचा भाग प्रवासातूनच लिहेन..            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा