सोमवार, २५ मार्च, २०१३

अखेर जाग तरी आली !गोष्टी हव्या तशा बदलल्या नाहीत. पण मनस्वी याचा आनंद होतोय, किमान सुरुवात तरी झाली. इतक्या वर्षांच्या निद्रेतून अखेर सर्वांना जाग तरी आली. लोणारच्या काठावर 'वर्ल्ड हेरिटेज' चा फलक झळकल्याची आता स्वप्ने पडू लागली आहेत. तोही दिवस दूर नाही. दीड वर्षांपूर्वी ज्यावेळी आम्हाला लोणारच्या खाऱ्या पाण्यात गोड्या पाण्यातील जीव सापडले होते त्यावेळी खरोखर सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सरोवरातील ज्या दुर्मिळ सूक्ष्मजीवसृष्टीसाठी लोणार ओळखले जाते, जी निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे या सरोवरात असंख्य प्रक्रिया घडल्या, ती जीवसृष्टी केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे काही वर्षांत नष्ट होणार.. कल्पना करूनच मन सुन्न होत होते. तातडीने पुण्यात लोणारवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची परिषद भरवली. त्याला लोणारच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाने नेमेलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनाही निमंत्रित केले. सर्व शास्त्रज्ञांनी लोणारची दुर्मिळ जीवसृष्टी वाचवण्याची गरज अगदी शास्त्रीय दाखले देऊन त्यावेळी मांडली.   
दुसरीकडे माध्यमांमधून लोणार सरोवरातील जीवसृष्टीला निर्माण झालेल्या धोक्याबाबत आवाज उठवण्यात आला. ही बाब न्यायालय, प्रशासनापर्यंत पोचली आणि त्याचा हवा तसा परिणामही झाला. यात मुख्य भूमिका बजावली, ती लोणारच्या संवर्धनासाठी नेमलेल्या स्थानिक समितीचे तत्कालीन अध्यक्ष (तत्कालीन जिल्हाधिकारी) डॉ रामास्वामी, राज्याचे वनसचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी, न्यायालयात याचिका दाखल करणारे आणि लोणार संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे श्री. सुधाकर बुगदाणे, त्यांचे सहकारी आणि राज्यभरातील माध्यमांनी. 
गेल्या आठवड्यात लोणारला धावती भेट दिली आणि चित्र पाहून खरोखर आनंद झाला. ज्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे लोणार सरोवरातील मूळच्या जीवसृष्टीला धोका निर्माण झाला होता. त्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लवकरच पूर्णावस्थेत येत आहे. सरोवरात जाणारे सांडपाणी पूर्णपणे थांबले आहे. नीरी या संस्थेतर्फे 'फायटोरीड' तंत्राद्वारे गावातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी दुसरीकडे वळवण्यात येत आहे. यामुळे सांडपाण्याद्वारे सरोवरात मिसळणारे बाहेरचे जैविक घटक पूर्णपणे थांबले असून, अतिरिक्त पाण्यामुळे सरोवराची कमी होणारी क्षारताही थांबण्यास मदत होणार आहे. याला पूरक म्हणून आणखी एक आनंददायी बाब म्हणजे, विवराच्या आत केल्या जाणाऱ्या शेतीवरही निर्बंध आले असून, आत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन विवरातून स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या लावलेले केळीचे शेवटचे पिक घेतल्यावर लोणार विवराच्या आत शेतीद्वारे सरोवराच्या पाण्यात मिसळणारे रासायनिक खतांचे प्रदूषणही थांबणार आहे. विवराच्या भोवतीचे फेन्सिंगही पूर्ण झाले आहे. या कामांमध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या सुधारण्यास वाव आहे. 
इतकी वर्षे लोणारप्रेमी अभ्यासक, स्थानिक नागरीक आणि माध्यमांकडून केल्या जाणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. पण लोणारच्या संवर्धनासाठी एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. आणखीही अनेक बाबी आहेत. विवराच्या आतील आणि बाहेरील मंदिरे अत्यंत दुरावस्थेत आहेत, विवारापासून ५०० मीटरच्या आत बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. विवराच्या आत आजही कोणीही थेट प्रवेश करू शकतो, सणांच्या काळात होणाऱ्या प्रदूषणाला सुमार नाही, गेल्या काही वर्षांत लोणार सरोवराचे पाणी कशाने वाढू लागले याचा ठाव अजूनही लागलेला नाही, पर्यटकांना लोणारविषयी माहिती मिळण्याचा काहीच स्रोत नाही आणि मुख्य म्हणजे लोणारची देखरेख करण्यासाठी आजही मनुष्यबळ नाही.
लोणार सरोवराचा 'रामसार' साईट मध्ये समावेश व्हावा यासाठी राज्य सरकारतर्फे शिफारस करण्यात आली आहे. मात्र लोणारच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धनासाठी लोणारला 'वर्ल्ड हेरीटेज'चाच दर्जा मिळावा यासाठी लोणारप्रेमी आग्रही आहेत. त्यासाठी लवकरच पुण्यात 'लोणार वर्ल्ड हेरीटेज कॉन्फरन्स' घेण्यात येणार आहे. त्याची तयारीही सुरु झाली आहे.


पूर्वीची स्थिती: लोणार गावातले सांडपाणी थेट सरोवरात जात होते.

 


आजची स्थिती: सीवेज ट्रीटमेंट प्लांटमुळे सरोवरात सांडपाणी जाणे बंद झाले आहे