मंगळवार, २४ जुलै, २०१२

बाळाची लीला !


दूर त्या प्रशांत महासागरावर कोपऱ्यात म्हणे एका अंशांनी पाणी तापलं..
पोटाचा घेर घेऊन फिरणाऱ्या पृथ्वीला मात्र ते उबदार बाळ वाटलं..

बाळ येणार म्हणून सर्वत्र धावपळ उडाली.. 
भारतात जायला निघालेली वाफ तातडीने जपानला पोचली..

तापट बाळाची डिलिव्हरी.. झाली नाही नॉर्मल,
कळा पोचल्या दिल्लीत, न्यूयॉर्कलाही सिग्नल

स्पेनने केले बारसे त्याचे.. ठेवले नाव 'एल निनो'
बाळाचे पाय पाळण्यात दिसताच कामास लागली युनो

बाळाचे हट्ट काय विचारता.. सगळाच लहरी कारभार
टायफूनच्या भिंगऱ्या फिरू लागताच कोरडे पडले म्यानमार

बाळाच्या लीला पाहून वाढला इंडोनेशियावर दाब
त्याच्या टेन्शनमुळे मग चढला राजस्थानलाही ताप

बाळाच्या हट्टासाठी धावले पूर्वेकडे वारे
आपलं काय होणार चिंतेत पश्चिमेकडे सारे 

हे बाळ नाही साधे सर्वांना झाली जाणीव 
कॅलिफोर्निया वाहू लागले भारतात मात्र उणीव

छोट्या वयात केंद्रित सत्ता अशी नाचू लागली
जगभरातील गरीब जनता घासासाठी वणवणली

आपली चूक लक्षात येताच पृथ्वीनेही घेतले प्रायश्चित्त
एल निनोला ला नीनाने... केले तत्काळ शांत..

दिवस चालले शांततेत म्हणता पुन्हा कोणीतरी शिंकलं
दूर त्या प्रशांत महासागरावर कोपऱ्यात म्हणे एका अंशांनी पाणी तापलं..

- मयुरेश प्रभुणे 
२४ जुलै, २०१२