गुरुवार, ३१ जानेवारी, २०१३

कोट्यावधी वर्षे सूर्याभोवती प्रवास करून एखादा अशनी जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात आत्मार्पण करतो तेव्हा जमिनीच्या दिशेने होणाऱ्या अग्निगोलाच्या त्या वेगवान प्रवासातील एक एक क्षण सूर्यमालेची अनेक गुपिते उलगडत असतो. त्याचा रंग सांगतो त्याच्या मूलद्रव्यांचे रसायनशास्त्र, आकाशातील उगमस्थान सांगते सूर्याभोवतीची त्याची कक्षा, मागे दिसणाऱ्या ज्वाला सांगतात त्याच्या निर्मितीच्या वेळी घडलेल्या असंख्य घटनांची कथा.. असाच एक अग्निगोल दिसला होता टेक्सासच्या आकाशात दहा वर्षांपूर्वी. कॅमेरात टिपलेल्या त्या अग्निगोलाच्या छबीचे जेव्हा विश्लेषण करण्यात आले तेव्हा त्यात सापडली 'कल्पना'शक्ती, निर्धार, धाडस आणि अथक प्रयत्नांची सात मूलद्रव्ये. आकाशातील त्याच्या उगमस्थानाने दाखवली मानवी महत्वाकांक्षेची विस्तारणारी कक्षा आणि अग्निगोलाच्या मागे राहिलेल्या धुराच्या लोटांमध्ये सापडली अर्धवट जळालेली असंख्य स्वप्ने.. (१ फेब्रुवारी २०१३: कोलंबिया अपघाताची १० वर्षे)