काल रात्री १२ ला पुणे- बेंगळूरू हायवेवर गाडीने प्रवास सुरु केला. आधी १० मग ८ असं होत शेवटी ६ जण मोहिमेवर निघाले. ऋषिकेश पंडित, अभिषेक वाघमारे, अथर्व वांगीकर, शब्दगंधा कुलकर्णी, नम्रता भिंगार्डे आणि मयुरेश प्रभुणे. एका दिशेने सलग १५०० किलोमीटर प्रवास, तोहि दीड दिवसात करायचा असल्यामुळे काही जण आधीच काळजीत पडले. पण गाडीने जसा वेग घेतला, तसा अचानक सर्वांमध्ये उत्साह संचारला आणि वातावरण संगीतमय झालं. मल्लिकार्जुन मन्सूर आणि किशोरी अमोणकरांचे पहाटेचे राग सुरु असतानाच कर्नाटकाने आमचे स्वागत केले, ते जोरदार पावसाच्या सरींनी. कर्नाटक पासून दक्षिण भारतात सध्या सर्वत्र हजेरी लावणारा हा पाऊस मॉन्सून येत असल्याचीच चाहूल मनाला जातो.
उजाडल्यावर रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांची पूर्वमोसमी लगबग दिसू लागली. पाऊस पडून गेल्याने लाल, काळी ओलसर झालेली जमीन नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या हालचालीत 'लवकर आटपायला हवं' असेच भाव दिसून येत होते. दोन पांढऱ्या बैलांच्या मदतीने नांगरणाऱ्या शब्बीरला विचारलं..'नांगरायची वेळ कशी ठरवता?'.. माझ्याकडे थेट न बघता आपल्या कामात दंग असणाऱ्या शब्बीर ने दिलेले उत्तर खरच भारतीय शेतकऱ्यांची प्रातिनिधिक माहिती असावी असं वाटलं. 'सहाव्या महिन्याच्या पाचव्या तारखेला इथे पाऊस येतोच. आकाशात काळे ढग दाटू लागले, विजा चमकू लागल्या आणि तापमान वाढले कि आम्ही नांगरणी सुरु करतो. आणि पावसाचे आगमन झाले की पेरणी.' मी विचारलं, ' टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून कधी हवामानाचा अंदाज पाहून शेतीचे निर्णय घेता का?' ..यावर पुन्हा न पाहताच..'त्यात टीव्ही किंवा वर्तमानपत्राचा काय प्रश्न? आकाशात बघून लक्षात येतच की..' आजपर्यंत आयएमडीचा अंदाज कधीच न पाहिलेल्या त्या शेतकऱ्याचे त्यामुळे कधीच आडले नाही..हे पाहून आश्चर्य वाटलेच, पण असे लाखो शेतकरी जर आयएमडीच्या अंदाजापेक्षा आपल्या पारंपरिक, निरीक्षणांवर आधारित ज्ञानालाच प्राधान्य देत असतील, तर आयएमडीच्या कृषी हवामानशास्त्र विभागाला मूळापासून विचार करायला हवा.
आय एम डी चा दुपारचा अपडेट नुकताच वाचला. येत्या २४ ते ४८ तासात मॉन्सून अंदमानात, तर येत्या ३ दिवसात केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता. कदाचित रात्रीच्या बुलेटीन मध्ये मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा होईलहि. सध्या बेंगळूरूजवळून प्रवास करीत आहोत. रात्री डायरी अपडेट करेनच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा