रविवार, २९ मे, २०११

मॉन्सून डायरी: २९ मे, २०११

रप्राइजिंग एन्ट्री..   



सकाळी साडेदहाला कोईम्बतूर ओलांडून पश्चिम घाटाकडे सरकत असताना सहज आकाशात लक्ष गेले. निळ्या आकाशामध्ये अधेमधे ढगांची तुरळक गर्दी होती. तेवढ्यात पश्चिमेकडे दिसू लागलेल्या डोंगरांकडे लक्ष गेले. त्यांचे माथे काळ्या ढगांनी वेढलेले दिसले. जसे जसे आम्ही घाटाकडे सरकत होतो, तसे त्या डोंगरांच्या मागे काळ्या, मोठ मोठाल्या ढगांची चादरच पसरल्याची जाणीव झाली. कर्नाटक आणि नंतर तामिळनाडूमधून येताना फार नाही, पण दुपारी ऊन आणि उकाडा जाणवलाच होता. आता मात्र तापमान कमी होत असल्याचे जाणवले. कोईम्बतूरवरून केरळमधे प्रवेश करताना मधेच पश्चिम घाटाची एक छोटी डोंगर रांग मधे येते. तेथील घाट उतरला की आपण थ्रीशूरमध्ये प्रवेश करतो. हा घाट सुरु होण्याआधी अथर्व आणि ऋषिकेशने हवामानाची निरीक्षणे घ्यायला सुरवात केली. वारा नैऋत्येकडून येत होता. त्यावेळी त्याचा कमाल वेग ताशी २० किलोमीटर पर्यंत पोचत होता. सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत होती. तापमान २७ अंश सेल्सिअस.
वाऱ्याची दिशा आणि वेग पाहून मॉन्सूनच्या जवळच आहोत की काय अशी शंका आली. घाटातून प्रवास करताना सर्वदूर ढगांनी वेढलेल्या आकाशाखाली हिरवी डोंगररांग पुढील आठवडाभर आम्हाला कसा अनुभव मिळणार आहे याचं ट्रेलरच दाखवत होती. दुपारी १२ च्या दरम्यान घाटातून प्रवास करताना काही वेळा पावसाच्या सरीही कोसळल्या. ढगांच्या गडगडाटा शिवाय दुपारी पडणारा हा पाऊस मॉन्सून चा तर नव्हे अशी सतत शंका येत होती. पण, आय एम डी च्या अंदाजा नुसार मॉन्सून या भागात पोचायला आणखी ३ दिवस बाकी होते. थ्रीशूर ओलांडून आम्ही एर्नाकुलम मध्ये पोचलो, तोच दुपारी ३ वाजता तिथे पाऊस सुरूच होता. मध्यम आणि एक सारख्या लयीत पडणाऱ्या या पावसाला पूर्व मोसमी म्हणायला मन तयार नव्हते. मी हॉटेल चालकाला विचारलं..'कधी पासून सुरु आहे पाऊस..?' तो म्हणाला..'काल रात्रीपासून..!' काय??..अरे हाच की मॉन्सून ..
मला अनपेक्षित धक्का बसला. आम्ही आय एम डी च्या साईट वर तपासले..'मॉन्सूनने अंदमानच्या समुद्रासह दक्षिण अरबी समुद्र आणि केरळच्या बहुतांश भागाला व्यापल्याचे दुपारच्या बुलेटीन मधून जाहीर करण्यात आले होते. तत्काळ डॉ. मेधा खोलेंना फोन केला. त्यांनी मॉन्सूनच्या या 'सरप्राइज'मागील करणे सांगितली. मागील काही दिवसांपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांना विशेष जोर मिळत नसल्याने मॉन्सूनचे अंदमानातील आगमन लांबले होते. मॉन्सून अंदमानात येणार.. मग दोन- तीन दिवसांनी केरळमध्ये.. असं वाटत असतानाच 'बैकलॉग भरून काढत मॉन्सूनने अंदमान कव्हर करतानाच केरळ मधेही तीन दिवस आधी एन्ट्री मारून आपला सरप्राइजिंग नेचर कायम राखलं..' डॉ. खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लक्षद्वीपपासून अंदमानपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सूनने वेगाने प्रवास करत भारतात प्रवेश केला आहे.. त्याचवेळी बाष्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी मॉन्सून ने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन- तीन दिवसात मॉन्सूनची आगेकूच सुरूच राहणार असून, तो दोन दिवसात कर्नाटकपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत त्याने व्यापलेल्या भागात मुसळधार पावसाचीही अपेक्षा आहे..'
आम्ही त्रिवेंद्रममध्ये पोचण्याआधीच मॉन्सूनने आम्हाला गाठून आपला पाठलाग करण्याचे आव्हान दिले. हा धक्का अनपेक्षित असला तरी, सुखद नक्कीच होता. गाडीतच आम्ही जल्लोष केला. आणि मॉन्सूनचे स्वागत करण्यासाठी गाडी जवळच असणाऱ्या अलेप्पी बीचवर वळवली. काळ्या ढगांनी भरलेलं आकाश आणि उंच उसळणाऱ्या लाटा एकमेकांच प्रतीबिम्बच दाखवत होत्या. समुद्रहि आपल्या अंदाजाने मॉन्सूनचं स्वागत करत होता. मॉन्सून आल्याची बातमी सगळीकडे आधीच पसरली होती. त्यातून रविवार असल्यामुळे मॉन्सूनचे पहिले वारे अंगावर घ्यायला आणि समुद्राचे 'उत्साही' रूप पाहायला मोठी गर्दी जमली होती. एका शाळेने तर जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांना जमवून 'मॉन्सूनचे विज्ञान' प्रत्यक्ष दाखवण्यासाठी छोटी सहलच काढली. हाच त्यांच्या शाळेचा पहिला दिवस..  भरपूर फोटो घेऊन आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन लगेचच म. टा.ला बातमी पाठवण्यासाठी जवळचे एक हॉटेल गाठले. या दरम्यान ज्यांना ज्यांना विचारले..त्या सर्वांना मॉन्सून आल्याचे माहित होते. दुपारी आय एम डी ने जाहीर केले असताना संध्याकाळ पर्यंत सर्वांपर्यंत हि माहिती कशी पोचली, याचे आश्चर्य वाटले. 
त्रिवेंद्रमकडे गाडी निघाली. वेगाने घडलेल्या घटना, त्यानंतर बातमीची डेडलाईन गाठताना झालेल्या धावपळीनंतर आता खूपच शांत, समाधानी आणि थकूनहि उत्साही वाटत होते. समुद्र किनाऱ्याला उजवीकडे ठेवून जाणाऱ्या एन एच ४७ या हायवेवर अंधार होता. पावसाच्या सरी कोसळत होत्याच. थोड्या थोड्या अंतराने हजारो बेडकांच्या कर्णकर्कश्श आवाजाने वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण होत होता. गाडीच्या सर्व खिडक्या उघडून, बाष्पयुक्त थंड वारे अंगावर घेत आम्ही त्रिवेंद्रमच्या दिशेने सरकत होतो.. बाजूला भीमसेन जोशींचा 'शुद्ध कल्याण' रंगात होता..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा