रविवार, २२ मे, २०११

काऊन्ट डाऊन सुरु



    पाहता पाहता प्रोजेक्ट मेघदूतचा शुभारंभ पाच दिवसांवर येऊन ठेपला. संकल्पना मांडल्यापासून सर्व स्तरातूनच प्रोजेक्ट मेघदूतचे स्वागत झाले. प्रकल्पाच्या विविध पैलूंबद्दल आत्मीयता असणाऱ्या अनेकांनी स्वतःहून आपल्याकडील माहिती, संदर्भ, संबंधित विषयांमधील तज्ञांची नावे, त्यांचे फोन नंबर देण्यास सुरवात केली. संस्कृतमधील अभ्यासकांनी मेघदूत आणि काही प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ काढून देण्याची तयारी दाखवली, काही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञांनी प्रवासासाठी काही बहुमूल्य अशा टिप्स दिल्या. दरम्यान, प्रकल्पासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारे 'चेसिंग द मॉन्सून' हे अलेक्झांडर फ्रेटर यांनी लिहिलेलं पुस्तक गायत्रीने तत्काळ 'फ्लिपकार्ट' वरून मागवून घेतले आणि भारतीय हवामान अभ्यासकांसाठी 'गाईड' असणारा वाय. पी. राव यांचा 'साऊथवेस्ट मॉन्सून' हा प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित अहवालहि उपलब्ध झाला. हळूहळू प्रकल्पासाठी आवश्यक पूर्वज्ञान मिळवण्याची व्यवस्था झाली. 
   सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) , भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि इंडियन मेट्रीओलोजीकल सोसायटी - पुणे (आयएमएसपी) यांनी संकल्पना ऐकताच तत्काळ संबंधित सर्व तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि प्रवासादरम्यान मोबाईल ओब्झर्वेटरीचीहि व्यवस्था झाली. त्यासाठी आयएमएसपीमधील हवामानतज्ञ सहभागींना विशेष प्रशिक्षणहि देणार आहेत. केरळमधून कायम सहकार्य करणारे पत्रकार- अजयकुमार यांनीहि त्रिवेंद्रम आणि संपूर्ण केरळ मधील महत्वाची ठिकाणे, व्यक्ती त्यांचे पत्ते उपलब्ध करण्यास सुरवात केली. आयएमडीनेहि स्थानिक पातळीवर आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. सर्व काही छान जुळून आलं आहे. 
     जवळ जवळ दहा दिवस वेळ द्यावा लागणार असल्यामुळे खूप इच्छा असूनही मॉन्सूनचा पाठलाग करणाऱ्या या मोहिमेत सहभागी होता येत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. पण काही जणांनी मागचा पुढचा विचार न करता आपला सहभाग जाहीर केला. आजच्या तारखेला विविध विषयांची पार्श्वभूमी असलेले ८ जण या मोहिमेतून केरळला जाण्यासाठी सज्ज आहेत. त्रिवेंद्रम ते कोकण या प्रवासादरम्यान प्रत्येकजण मॉन्सूनच्या वेगवेगळ्या पैलूंच्या नोंदी ठेवणार आहेत. स्वतःची प्रवास डायरी लिहिणार आहेत. त्यासाठी त्यांना पश्चिम घाटातल्या जंगलांमधून भटकावं लागेल, आडवाटेवरच्या गावांना भेटी द्याव्या लागतील, मॉन्सूनपूर्व तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागेल, मॉन्सूनच्या पारंपारिक स्वागताला कॅमेरामध्ये कैद करावे लागेल.. जंगलामधील पशु- पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करावे लागतील, समुद्रकिनारी, पर्वतांच्या शिखरांवरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची दिशा- वेग अभ्यासावा लागेल.. हे आठ दिवस सर्वजण मॉन्सूनच्या 'जल'रंगाने न्हाऊन निघतील..
       सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रांतील असल्यामुळे गप्पा- चर्चा रंगतीलच..पण हा दीर्घ प्रवास रंगतदार व्हावा यासाठी विशेष संगीतही मिळवणे सुरु आहे.. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांच्या साथीला हरिप्रसाद चौरासिया- शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेनही असतील.. 'साउन्ड ऑफ स्केप्स' आणि 'द एलिमेंट्स'द्वारे पहिल्या धारा झेलणाऱ्या पश्चिम घाटातल्या निसर्गाच्या भावना व्यक्त होतील.. तर कुमार गंधर्वांची निर्गुडी भजन वातावरणातील गंधाशी समरस होऊन एक अद्भुत दर्शन घडवतील...मॉन्सूनच्या पाठलागाला 'ताल' मिळेल ए. आर. रेहमानचा, तर पंचम- गुलझारची 'आंधी' पावसाची भाषा बोलू लागेल..      
         ही मोहीम आहेच, पण एक सोहळाहि आहे..धरती- मेघाच्या मिलनाचा ! 'प्रोजेक्ट मेघदूत' या सोहळ्याला 'लाईव्ह कव्हर' करणार आहे..               

मयुरेश, २२ मे, २०११  

1 टिप्पणी:

  1. फारच छान... संगीतासोबतच पावसाने कवितांना जन्म दिलाय त्यामुळे नामवंत कवींच्या काव्यरचना सोबत घ्यायला विसरु नका.

    उत्तर द्याहटवा