मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

मॉन्सून २०१२



मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु असला तरी, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) नोंदींनुसार ३० सप्टेंबरला यंदाचा मॉन्सून संपला. मॉन्सून तारखा पाळून येत- जात नसला तरी, दीर्घकाळातील नोंदींना काहीतरी प्रमाण असावे म्हणून सरकारी नोंदीप्रमाणे एक जून ते ३० सप्टेंबर असा मॉन्सूनचा हंगाम धरला जातो. सुरवातीला हे वर्ष दुष्काळी ठरणार असं म्हटलं जात होतं. मात्र एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशाच्या हंगामातील सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला आहे. संपूर्ण देशात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी किंवा त्याहीपेक्षा कमी हवा. मात्र पाऊस त्याच्या आतच असल्यामुळे २०१२ हे वर्ष देशासाठी हवामानशास्त्रीयदृष्ट्या दुष्काळी मानले जाणार नाही.
महाराष्ट्रात हवामानशास्त्रीयदृष्ट्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे चार विभाग येतात. त्यांपैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र दुष्काळी स्थिती आहे. संपूर्ण हंगामात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी, तर मराठवाड्यात ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशातील एकूण ३६ हवामानशास्त्रीय विभागांपैकी १३ विभागांमध्ये दुष्काळी स्थिती आहे.
देशात यंदा सर्वात कमी पाऊस पंजाबमध्ये झाला असून (-४६ टक्के), धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या या राज्याला या वर्षी कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्या खालोखाल हरयाणा (-३९ टक्के), उत्तर कर्नाटक (-३६ टक्के), सौराष्ट्र- कच्छ (-३४ टक्के) आणि मराठवाडा (-३३ टक्के) या विभागांमध्ये सरासरीपेक्षा बरच कमी पाऊस नोंदला गेला आहे. 
हंगामाच्या पूर्वार्धात कमी दाबाच्या क्षेत्राअभावी आणि मोसमी वाऱ्यांच्या प्रतिकुलतेमुळे कमी पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये त्याची भरपाई होऊन पावसाचे आकडे सुधारले. मॉन्सून परतीच्या वाटेवर असताना, सध्या बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, त्यामुळेही पाण्याची टंचाई काही प्रमाणात भरून निघत आहे.
थोडक्यात देशभराचा विचार केल्यास यंदाचा मॉन्सून सामान्यच राहिला असून, देशात यंदा दुष्काळ नाही. मात्र पूर्वार्धात दिलेल्या ओढीमुळे महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला डिसेंबरनंतर पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा