शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

सिटीझन सायन्स सेंटर

आज आपण जगाच्या इतिहासाच्या अशा टप्प्यात जगात आहोत, जिथे दैनंदिन जीवनात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सर्वाधिक फायदे माणूस मिळवत आहे. विज्ञान- तंत्रज्ञान निर्मितीचा वापर प्राचीन काळापासून माणूस आपल्या फायद्यासाठी करत आला असला, तरी आजच्या इतकी वैविध्यता, विस्तार आणि निर्मितीचा वेग पूर्वी कधी नव्हता आणि तो सतत वाढतही आहे. याला कारणीभूत ठरली ती आजची सुसंघटीत संस्थात्मक व्यवस्था. पूर्वी शोध शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक कल्पनाशक्तीच्या आणि त्याने निर्माण केलेल्या उपकरणांच्या जोरावर लागत असत. एखाद्या संशोधनाची व्याप्ती, त्यासाठी येणारा खर्च आणि सुरक्षेसारखी इतर कारणे लक्षात घेता पुढे अशा प्रकारच्या व्यक्तिगत संशोधनाला मर्यादा आल्या आणि विज्ञान संशोधन संस्थांचा विकास झाला. खर्चाच्या आणि सुरक्षेच्या कारणाने बहुसंख्य संशोधन संस्था सरकारी अधिपत्याखाली आल्या किंवा सरकारच्या पुढाकारानेच उभारल्या गेल्या. या गोष्टीचा विज्ञानाला फायदा नक्कीच झाला. मात्र तोटाही झाला. विज्ञानाचे सरकारीकरण झाले आणि आणि औपचारिकतेने विज्ञानाला ग्रासले. विज्ञानाची निर्मिती ही फक्त विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या पदवीधरांकडून संशोधन संस्थांमध्येच होऊ शकते असा समज रूढ झाला आणि सर्वसामान्य माणूस (समाजातला बहुसंख्य वर्ग) विज्ञान निर्मितीपासून सतत दूर राहिला.
वैज्ञानिक शोधांची निर्मितीच मुळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणाऱ्या प्रश्नांतून होत असते. संशोधन संस्था त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक असणारी साधन- सामग्री पुरवतात, तर विज्ञानाचे औपचारिक शिक्षण त्या व्यक्तीला आतापर्यंतच्या विज्ञानाच्या विकासाची पार्श्वभूमी उपलब्ध करून देते. मात्र, वैज्ञानिक शोधांसाठी मूलभूत निकष साधन सामग्रीची उपलब्धता आणि औपचारिक शिक्षण हा नसून व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी केली जाणारी धडपड हा आहे. भारताचा विचार केल्यास नेमकी याच गोष्टीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. दुसऱ्या चांगल्या आर्थिक पर्यायांमुळे असेल, विज्ञानाविषयीच्या पारंपरिक समजांमुळे असेल किंवा काही घरगुती कारणांमुळे असेल, कल्पकता अंगी असूनही विद्यार्थी विज्ञानाला करिअर म्हणून निवडत नाहीत आणि संशोधन संस्थांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाकडे कल्पकता असतेच असे नाही. परिणामी विज्ञान निर्मितीची क्षमता असणारा एक मोठा वर्ग कायम औपचारिकतेमुळे विज्ञानापासून दूर राहतो आणि नुकसान विज्ञानाचे होते.
संशोधन संस्थांना त्यांना अपेक्षित असलेले उमेदवार कधी मिळतील हे सांगणे कठीण आहे. मात्र समाजात विज्ञानाची मनापासून आवड असणारा, आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड करणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. त्याचे वय दहा वर्षापासून सत्तर- ऐंशी वर्षेही असू शकेल. त्याने विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेले असेलच असे नाही. त्यातील एखाद्याचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले असेल, एखाद्याकडे अशी नाविन्यपूर्ण कल्पना असेल, की जिच्या आधारे समाजातील एखाद्या गंभीर समस्येवर उपाय मिळू शकेल, एखाद्याची चिकाटी निसर्गातील अज्ञात तत्वही उलगडू शकेल. अशा वर्गाला केवळ औपचारिकतेच्या नावाखाली विज्ञानापासून दूर ठेवणे भारताला आणि विज्ञानाला परवडणार आहे का?
सुमारे बारा वर्षांच्या विज्ञान क्षेत्रातील अनुभवातून आणि दोन वर्षांच्या प्रत्यक्ष तयारीनंतर विज्ञानाला औपचारिकतेतून बाहेर काढून समाजाशी एकरूप करण्यासाठी आम्ही 'सिटीझन सायन्स मूव्हमेंट  ' सुरु करीत आहोत. 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' या सूत्राने ही चळवळ काम करणार आहे. ही कल्पना तशी नवी नाही. जगात अनेक ठिकाणी नागरी सहभागातून वैज्ञानिक अभियान राबवले जात आहेत. भारतातही विविध सर्वेक्षण आणि निरीक्षणांमध्ये सिटीझन साईंटिस्ट सहभागी होत असतात. मात्र, पुण्यात देशातील पाहिले सिटीझन सायन्स सेंटर सुरु करून सिटीझन साईंटिस्टच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पुण्यातील दहापेक्षा अधिक संशोधन संथांची मदत घेतली जात आहे. हे सेंटर नागरिक आणि संशोधन संस्थांमधील दुवा म्हणूनही कार्य करेल. संशोधन संस्थांना ज्या ठिकाणी नागरी सहभागाची गरज लागेल (निसर्ग, पर्यावरण, आरोग्य सर्वेक्षणे इ.), त्या ठिकाणी या सेंटरच्या माध्यमातून संशोधन संस्थांना सहकार्य करण्यात येईल, तर नागरिकांच्या कल्पनेतून उतरलेल्या संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन आणि प्रयोगाच्या सुविधा संशोधन संस्थांकडून पुरवण्यात येतील. विविध शहरी, पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवरही विज्ञानाच्या आधारे तोडगा काढण्यासाठी हे केंद्र काम करेल. नागरिकांमधून उच्च दर्जाचे विज्ञान संशोधन घडावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा हा या उपक्रमाचा अंतिम हेतू आहे.
'सिटीझन साईंटिस्ट' हे कोणीही असू शकतील. आयटी प्रोफेशनल, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, राजकारणी, कलाकार, गृहिणी, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी.. अगदी कोणीही. यात सहभागी होण्यासाठी आवश्यक निकष आहे- 'विज्ञानाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती'. सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडत्या विषयाचा शास्त्रीय अभ्यास आणि संशोधन करू शकतील. त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, प्रयोगासाठीच्या सुविधा, जर्नल्स, लायब्ररी सेन्टरच्या माध्यमातून पुरवण्यात येतील (अर्थात सेन्टरच्या स्वतःच्या सुविधा टप्प्या- टप्प्याने निर्माण करण्यात येतील). सिटीझन साईंटिस्टकडून पूर्ण होणारे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जर्नलही सुरु करण्यात येणार आहे. जे देशभरातील शिक्षण संस्था, शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांमध्ये वितरीत करण्यात येईल. सिटीझन साईंटिस्ट हे निरनिराळ्या पार्श्वभूमीतून येणार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची समान पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी वर्षभर वैज्ञानिक व्याख्याने, सायन्स फिल्म क्लब, विविध विषयांच्या कार्यशाळा, संस्था भेटी, सर्वेक्षणे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बीएस्सी, एमएस्सी, बीईच्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून करता येतील. सिटीझन साईंटिस्टकडे स्वतःचा ठोस प्रकल्प नसल्यास सिटीझन सायन्स सेन्टरच्या पुढाकाराने सुरु झालेल्या 'प्रोजेक्ट मेघदूत', लाईट पोल्युशन मैपिंग, लोणार कन्झर्वेशन सारख्या प्रकल्पांत सहभागी होता येईल. पुण्यातील संशोधन संस्थांना त्यांच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमामधेही सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडीप्रमाणे सहकार्य करू शकतील. सहभाग घेऊ शकतील.


विज्ञान संशोधनाला संशोधन संस्थांच्या भिंतीआडून थेट समाजामध्ये रुजवण्याच्या प्रयत्नाला पुणेकर नक्की स्वीकारतील याचा आम्हाला विश्वास आहे. माणसाला आपल्या पारंपरिक समजामधून मुक्त करून वास्तव दाखवण्याचे काम विज्ञान करीत असते. यातूनच माणूस उत्तरोत्तर समृद्ध होत जातो. सिटीझन सायन्स मूव्हमेंटच्या माध्यमातून भक्कम तटबंदीच्या आड औपचारिकतेमध्ये अडकलेल्या विज्ञान संशोधनाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भारतातील विज्ञान काही अंशी तरी समृद्ध होईल याची खात्री वाटते. आपणही या मूव्हमेंटमध्ये सहभागी व्हा. आपल्या एकत्रित प्रयत्नातूनच 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' साध्य होऊ शकेल !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा