शनिवार, २३ जुलै, २०११

पुन्हा तारकांच्या विश्वात..ओळखीच्या दगडी इमारतीच्या मधल्या चौकातून गोलाकार वळणे घेत जाणाऱ्या जीन्याची एक एक पायरी काठीने टेकत शेवटच्या मजल्यावर पोचायला बराच वेळ लागला. मुला- नातवंडांचा आधार घेत वयोवृद्ध आजी आजोबा अखेर शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या पांढऱ्या घुमटाखाली विसावले. दरवाजा बंद झाला, तसे घुमटाचे लालसर- निळ्या आकाशात रुपांतर झाले. कृत्रिम संधिप्रकाश अंधुक होत असतानाच आकाशात अस्पष्ट ठिपके चमकू लागले. संधिप्रकाश जाऊन पूर्ण काळोख पसरला.. तसे संपूर्ण आकाश तेजस्वी चांदण्यांनी व्यापले. मार्गदर्शकाचे बोल कानावर पडत होते.. सात ताऱ्यांचा तो सप्तर्षी.. चार ताऱ्यांच्यामध्ये तीन ताऱ्यांची रेषा.. ते मृग नक्षत्र.. तासाभरात नकळतपणे सर्वजण ५० वर्षांपूर्वीच्या दुनियेत फिरून आले.. ५० वर्षात किती बदल झाले.. पण आकाश तेच आणि ताऱ्यांचे तेजही तेच..उपस्थितांपैकी प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांमध्ये चांदण्यांनी भरलेले ते आकाश साठवून घेत होता.. आशिया खंडातील पहिल्या तारांगणाचा मान असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रोडच्या कुसुमबाई मोतीचंद तारांगणाचे आकाश २० वर्षांनी पुन्हा ताऱ्यांनी चमकले तेव्हा माजी विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
एकेकाळी पुण्यातील आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या या तारांगणाने सलग ३६ वर्षे देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना तारकांच्या विश्वाची सफर घडवत वैज्ञानिक संस्कार केलेले. पुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा झगमगाट घेऊन आलेली देशभरातील इतर तारांगणे गर्दी खेचत असतानाच प्रोजेक्टरचा मुख्य दिवा बंद पडण्याचे निमित्त झाले आणि या तारांगणाचा लोखंडी दरवाजा १९९० मध्ये बंद झाला.. तो थेट २० वर्षांनीच उघडला. २००९ हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष होते. त्या निमित्ताने हे ऐतिहासिक तारांगण पुन्हा सुरु व्हावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही सदस्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. देशभरतील तज्ञांना, खगोल अभ्यासकांना पाचारण करण्यात आले. मात्र तारांगणाच्या डोममध्ये प्रवेश करताच ६० वर्षे जुन्या प्रोजेक्टरची अवस्था पाहून सर्वांनीच 'अशक्य!. काहीही होऊ शकत नाही' असेच उत्तर दिले. नवी यंत्रणा बसवायचाही विचार झाला, तर कोटेशन्स होती ६० लाखांपासून ३ कोटींपर्यंत. मात्र काही झाले तरी पुण्यातले एकमेव तारांगण सुरु करायचेच असे ठरवलेल्या या सदस्यांना शेवटी पराग महाजनी हे खगोल अभ्यासक येऊन मिळाले आणि खरोखर अशक्याचे शक्य झाले.

असे झाले पुनरुज्जीवन 
महाजानींच्याच भाषेत सांगायचे झाले तर, आम्ही सर्वप्रथम डोममध्ये प्रवेश केला, तसा धुळीमुळे ठसका लागला. अनेक वर्षे बंद असल्यामुळे जळमटे आणि पालींचे साम्राज्य होते. सर्वप्रथम ते सर्व साफ करून घेतले. डोमच्या मधोमध एका लाकडी टेबलवर ६० वर्षे जुना स्पिट्झ लैबोरेटरीचा मोठा प्रोजेक्टर अक्षरशः पुराण वस्तूसारखा गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या अवस्थेत आढळून आला. जवळ जाऊन एक एक भाग तपासायला सुरवात केली, तर गंजल्यामुळे सर्व भाग जाम झालेले. अथक प्रयत्नांनी सर्व भाग वेगळे केले. स्पिरीट आणि कापसाच्या साह्याने अनेक तास घासल्यावर प्रोजेक्टरचे खरे रूप दिसायला लागले. काही भाग जळालेले, काही गंजून बंद पडलेले, काही भाग असे होते, की त्यांचे नेमके काम काय हेच समजत होते. ६०- ७० वर्षांपूर्वी तयार झालेल्या या प्रोजेक्टरची आणि त्याच्या सुट्या भागांची निर्मिती बंद होऊनही चार दशके झाली असतील.
प्रोजेक्टर साफ केल्यावर सर्वप्रथम आम्ही त्याच्या वायरिंगची व्यवस्थित कागदावर आखणी करून घेतली, त्यावरून प्रत्येक भागाचे कार्य कसे चालते हे समजू लागले. दरम्यान, इंटरनेटद्वारे जगभरातील तारांगणतज्ञांशी संपर्क साधून त्यावेळच्या तारांगणान्ची माहितीपत्रके मागून घेतली. शक्य तेवढे वायरिंग बदलायचा प्रयत्न केला. पण जुन्या पद्धतीचे सोल्डरिंग काढायला थेट ईंडस्ट्रीयल गन आणावी लागली. काही सुटे भाग कोठेही मिळेनात तेव्हा त्याची डिझाइन्स तयार करून ते नव्याने करून घेतले. प्रोजेक्टरवरचे ताऱ्यांचे सर्व ठिपके बुजलेले होते. ते साफ करून घेतलेच, पण ताऱ्यांच्या रंगांनुसार आवश्यक त्या ठिपक्याला ठराविक रंगही दिले. त्यावेळच्या मोटर आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीची कोणी खात्री देईनात. पण अनेक दुकाने पालथी घातल्यावर काही जणांनी आमची अडचण समजून घेतली आणि कौशल्याने अनेक वर्षे बंद असणारे भाग सुरु करून दिले. या कामात मॉडर्न ऑप्टिक्सच्या गानू, अत्यंत क्लिष्ट मर्क्युरी स्वीचसाठी श्री करंदीकर, मोटरसाठी खोले, ट्रान्सफॉर्मरसाठी भोपटकर आदी पुणेकरांची मदत झाली. आणि पुण्याची शान असणारा हा प्रोजेक्टर खऱ्या अर्थाने पुणेकरांनीच सुरु केला. 

स्पिट्झ प्रोजेक्टरचा इतिहास 
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे रहणाऱ्या आर्मांड स्पिट्झ या पेपरविक्रेत्याला १९३६ च्यादरम्यान एके दिवशी त्याच्या मुलीने आकाशातील तार्यांविषयी काही प्रश्न विचारले. तिला उत्तरे देण्यासाठी आर्मांड याने पुठ्ठ्यापासून काही मॉडेल तयार केली. त्यातच सुधारणा करता करता त्याने गोलाचा उपयोग करून तारांगणाचा प्रोजेक्टर बनवला. मुलीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच, पण प्रोजेक्टरमुळे हा विषयही सोप्या पद्धतीने मुलांसमोर मांडता येऊ लागला. त्याचे कार्यक्रम गर्दी खेचू लागले. एकदा त्याचा शो बघण्यासाठी स्वतः अल्बर्ट आईंस्टाईन आले. त्यांनी त्या प्रोजेक्टरमधील भौमितिक त्रुटी दाखवून देतानाच त्या ऐवजी १२ पंचकोन वापरून डिझाईन सुधारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार स्पिट्झ याने 'डोडेका हेड्रोन' प्रकारचा नवा प्रोजेक्टर विकसित केला. या प्रोजेक्टरला मोठे यश आले. त्यातून त्याने स्वतःची कंपनी सुरु करून सुमारे १५० 'डोडेका हेड्रोन' जगभरात विकले. त्यापैकी १९५४ मध्ये आशिया खंडात पाहिला प्रोजेक्टर पाठवला, तो पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. आईंस्टाईन यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला चालू स्थितीतील जगातला हा एकमेव प्रोजेक्टर आहे.
या प्रोजेक्टरमधून साध्या डोळ्यांना दिसणारे सर्व तारे, पाच ग्रह, आयनिकवृत्त, सूर्य- चंद्राची स्थिती, पृथ्वीचा नकाशा अशा सर्व गोष्टी ३० फुट व्यासाच्या डोमवर दाखवता येतात. इलेक्ट्रोनिक्स युगाच्यापूर्वी याची निर्मिती असल्यामुळे त्याची रचना पूर्णपणे मेकॅनिकॅल आणि इलेक्ट्रिकल आहे. हेच त्याचे वैशिष्ट्य असून, त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्यही आहे. दुरुस्त झालेल्या स्थितीतील हा प्रोजेक्टर पुढील किमान २० वर्षे तरी कोणत्याही मोठ्या बीघाडाशिवाय सुरु राहील असा दावा महाजनी करतात.

न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाचा इतिहास
राष्ट्रीय शिक्षणाची परंपरा असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. ऐतिहासिक नानावाड्यातून न्यू इंग्लिश स्कूलचे टिळक रस्त्यावरील नव्या इमारतीत स्थलांतराचे निश्चित झाले, त्याचवेळी ही इमारत वैशिष्ट्यपूर्ण असावी असा आग्रह प्राचार्य पु. ना. वीरकर यांनी धरला. त्यांच्याच पुढाकाराने शाळेची 'वाय' आकाराची इमारत आणि त्यावर मध्यभागी डोम अशी रचना करण्यात आली. ३० फुटी व्यासाच्या या डोममध्ये तारांगण सुरु करण्याचा ठराव डिईएसने पारित केला. त्यासाठी देशा- विदेशात प्रतिनिधी पाठवून प्रोजेक्टर्सची पाहणी करण्यात आली. मोतीचंद शाह यांनी दिलेल्या ५० हजार रुपयांच्या देणगीतून स्पिट्झ प्रोजेक्टर आणून १९५४ मध्ये हे तारांगण सुरु झाले. त्यावेळी आशिया खंडातील हे पहिलेच तारांगण होते.
नव्याने तारांगण सुरु करण्यात मोलाचा वाटा असणारे न्यू इंग्लिश स्कूलचे विज्ञान शिक्षक विनायक रामदासी यांच्या माहितीनुसार, १९५४ ते १९९० या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल तारांगणाचे शो गुरुवार, शुक्रवार आणि सुटीच्या दिवशी अखंड सुरु होते. फक्त पुण्यातूनच नाही, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली येत असत. प्रा. गिझरे, प्रा. पाठक, प्रा. विनायक जोशी आदी मंडळींनी तारांगणाद्वारे हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना आकाशदर्शन घडवले होते. 

पुन्हा तारकांच्या विश्वात
महाजनी आणि रामदासी यांच्याबरोबर तारांगण समितीचे सचिव दिलीप कोटीभास्कर, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रा. एस. जी. कुलकर्णी, तंत्रज्ञ हरीभाऊ पवार तसेच एकनाथ बुरसे, प्रल्हाद शिंदे आणि सु. भ. मुंडे या तीन मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांमुळेच तारांगणाला पुन्हा पूर्वीचे दिवस येऊ शकले. येत्या काळात तारांगणाला वातानुकुलीत करण्याबरोबर रेलिंगच्या नव्या खुर्च्या बसवण्याचा डिईएसचा विचार आहे. त्याचप्रमाणे खगोल शास्त्राच्या दालनाची निर्मिती, विद्यार्थी आणि हौशी नागरिकांसाठी अभ्यासक्रम, नियमित शोही नियोजनात आहेत.   
 मागीलवर्षी दसऱ्याचा मुहूर्त साधून सुरु झालेले हे ऐतिहासिक आणि पुण्यातील एकमेव तारांगण आता पुन्हा गर्दी खेचू लागले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी तारांगणाचे १२ शो झाले असून, चंद्रग्रहण आणि पिधनाच्यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगा, त्यांचे ग्रह- ताऱ्यांचे आकर्षण, कुतूहलाने विचारलेले प्रश्न यामुळे तारांगणाला जिवंतपणा आला आहे. गेली दोन दशके फक्त इतिहास सांगणारा डोम पुन्हा विज्ञान शिकवू लागला आहे!

-----------------------------------------
तारांगणाच्या शोची नोंदणी  
तारांगणाचे शो सध्या फक्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून, एका वेळी १०० विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश दिला जातो. ११ ते ६ या शाळेच्या वेळेच्या आधी आणि नंतर हे शो होतात. तारांगणाच्या शोसाठी नोंदणी करण्यासाठी शाळांनी २४३३६०२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------------------------------------
विद्यार्थीदशेत  डॉ. नारळीकरांचीही  भेट         
अनेक मान्यवर आपल्या विद्यार्थी दशेत न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाला भेट दिल्याचे आवर्जून सांगतात. त्यापैकी सर्वात महत्वाचे नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ- डॉ. जयंत नारळीकर. बनारसमध्ये बीएस्सी केल्यावर सुट्टीसाठी पुण्यात आले असताना डॉ. नारळीकर यांनी १९५७ मध्ये तारांगणाला भेट दिली होती. प्रथमच अंधारात कृत्रिम तारे बघून त्यावेळी या विषयाबद्दल कुतूहल वाटल्याचे डॉ. नारळीकर सांगतात. 'हे तारांगण मला त्या आधी १० वर्षे म्हणजेच शालेय वयात पाहायला मिळाले असते, तर खगोलशास्त्राविषयी तेव्हाच जिज्ञासा निर्माण होऊन मी त्या दृष्टीने तयारी सुरु केली असती. पुढे आयुष्यात जगभरातील अनेक अत्याधुनिक तारांगणे पाहायला मिळाली. मात्र, न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण पाहताना मनात निर्माण झालेली उत्सुकता आणि कुतूहल काही औरच होते,' असे त्यांनी म. टा.शी बोलताना सांगितले.

- मयुरेश प्रभुणे 
रविवार महाराष्ट्र टाईम्स (२४ जुलै, २०११)

1 टिप्पणी:

  1. शाळेत नसलेले, पण विद्यार्थीच.. जे १०० च्या गटाने येऊ न शकणाऱ्या विद्यार्थीसाठी कशी सोय आहे..??

    उत्तर द्याहटवा