सोमवार, २५ जुलै, २०११

प्रोजेक्ट मेघदूत: 'महाराष्ट्रातील मॉन्सून''महाराष्ट्रातील मॉन्सून' 

पाहता पाहता पावसाळा मध्यावर येऊन ठेपला. मॉन्सूनच्या पहिल्या वाऱ्यांचे स्वागत करायला आम्ही पश्चिम घाटाकडे निघालो या घटनेला दोन महिने झाले. २९ मे रोजी केरळमध्ये आलेले नैऋत्य मोसमी वारे ४१ दिवसांनी ९ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापून पाकीस्तानात पोचले. या वाऱ्यांनी समुद्रावरून आणलेल्या ढगांखालून, त्यांच्याच वेगाने पश्चिम घाटातून आठवडाभर सहप्रवासी म्हणून मनसोक्त फिरलो. पावसाचा - निसर्गाचा संवाद ऐकला, नवनिर्माणाचे नाजूक क्षण जवळून अनुभवले, सामान्यांच्या जीवनावरील परिणाम पाहिला, बदलत्या हवामानातील बदलते व्यवहार अभ्यासले. आपल्याबरोबर नवा ऋतू आणणाऱ्या या वाऱ्यांनी निसर्गात मारलेले रंगेबिरंगी फटकारे त्यांच्याच स्वभावाच्या छटा दर्शवत होते. मॉन्सूनच्या रंगांची उधळण अजूनही सुरूच आहे. कोंब, पालवीचा आषाढ मागे सरून मुक्त बहरणारा श्रावण दारात उभा आहे. 


'प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या सिझनचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी यापेक्षा कोणता वेगळा मुहूर्त हवा? ऊन- पावसाच्या लहरी लपंडावाबरोबर मॉन्सून आणि महाराष्ट्राचे नाते उलगडण्याचा प्रयत्न या प्रवासातून करण्यात येणार आहे. विविध विभागांनुसार पावसाच्या बदलत्या वितरणाचा महाराष्ट्रातील निसर्गावर, लोकांच्या दैनंदिन जीवनावर, शेतीवर, संस्कृतीवर झालेला परिणाम अभ्यासणे हे या टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट. चार महिने धोक्याच्या सूचना ऐकून हताश झालेले कोकणातील मच्छीमार, पश्चिम महाराष्ट्रातील सधन बागायती शेतकरी, सतत आत्महत्येचा पर्याय मनात घेऊन वावरणारा विदर्भातील शेतकरी, चमत्कारी पावसाची अपेक्षा ठेऊन आकाशाकडे डोळे लावून असणारा मराठवाड्यातील शेतकरी यांच्याशिवाय मॉन्सूनचे बदलते रंग कोण व्यक्त करू शकेल? राज्याच्या सर्व विभागांत जाऊन त्या विभागाच्या नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मॉन्सूनची नेमकी भूमिका याचे स्केच प्रवासाशेवटी रेखाटले जाण्याची अपेक्षा आहे. अर्थात महाराष्ट्रातील पावसाच्या परिपूर्ण चित्राचे रंग पुढील पाच वर्षांत यथावकाश भरले जातीलच.

एक ऑगस्टपासून सर्वप्रथम कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मध्य- पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र- विदर्भ आणि शेवटी मराठवाडा असा साधारण प्रवासक्रम आहे. हा प्रवास आवश्यकतेनुसार कार, बस, रेल्वे, बाईक, पायी असा करण्याचे ठरविले आहे. सरसकट महिनाभर सुट्टी मिळणे अवघड असल्यामुळे विविध टप्प्यांमध्ये आपल्या सोयीनुसार सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. मॉन्सूनवर (किंवा पावसावर) प्रेम असणारे, धावपळ सहन करू शकणारे, निसर्ग तसेच लोकांविषयी कुतूहल असणारे आणि या सर्वासाठी आपापला खर्च करण्यास तयार असणारे कोणीही यात सहभागी होऊ शकतात. सह्याद्री- दख्खनशी मॉन्सूनचा संवाद 'रंग मॉन्सून'चे मधून आपल्या समोर उलगडत राहीलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा