कोवलमच्या उसळलेल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन, अगस्ती पर्वताभोवती खेळून, पश्चिम घाटाच्या रांगांचा आधार घेत उत्तरेकडे आगेकूच करणारे वारे, आलेप्पीच्या जालाशयांवर मुसळधार वृष्टी देणारे वारे, डोंगरमाथ्यावरील आगुम्बेच्या जंगलात घोंघावणारे वारे, सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरून, चंबळच्या खोऱ्यात विसावून, राजस्थानच्या वाळवंटाकडे मार्गस्थ झाले. दुसरीकडून अंदमानच्या समुद्रातून ऊर्जा घेत, ईशान्येच्या पर्वतीय जंगलांमध्ये शिरलेल्या वाऱ्यांनी हिमालयाच्या पायथ्याचा आधार घेत विस्तीर्ण गंगेच्या मैदानात प्रवेश केला. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीकडून आलेल्या मरुतांनी एकत्रितपणे दिल्लीला जलाभिषेक घालून आपले मार्गक्रमण सुरु ठेवले. देशाच्या सर्व भागांतील मातीचे अंश घेऊन या वाऱ्यांनी कोणत्याही सीमांची तमा न बाळगता सतलजचे पात्र ओलांडून सिंधूच्या प्रदेशात प्रवेश केला. तिथेही ते तसेच बरसले. मात्र या धारांना गंध होता गंगेच्या पवित्रतेचा, हिमालयातील हिमकणांचा, नालन्दाच्या खंडहर भिंतींचा, पानिपतच्या लाल मातीचा आणि पावसाच्या आगमनाची वाट पाहत सीमेपलीकडे शेतीची मशागत करणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या घामाचा.. या पवित्र जलधारांचा गंध सिंधूच्या खोऱ्यात नांगरणाऱ्या बळीराजाच्या अत्यंत परिचयाचा. त्याचे आणि त्या गंधाचे नाते तितकेच जुने, जितके हे वारे! शतके सरली, सीमा बदलत राहिल्या पण भारतवर्षाचा गंध मॉन्सूनच्या जलधारांबरोबर सिंधूच्या मातीशी एकरूप होतच राहिला. सिंधूचा तो शेतकरी या धारांमध्ये भिजत असताना त्याच्या मनात भाव असतात परिपूर्णतेचे आणि अभिमानाचे. सीमेचे बंधन त्याला खिन्न करीत नाही. त्याला माहित आहे.. मानवाने आखलेल्या या सीमा आज आहेत, उद्या नाहीत. त्याला अशा आहे, हेच वारे आज ना उद्या आपल्या जोरदार धडकेने आणि वाहून आणलेल्या जलधारांनी या मानवनिर्मित सीमा पुसून टाकतील आणि सीमा आखणाऱ्यांना भारतीय उपखंडाची नैसर्गिक, शाश्वत अखंडता पटवून देतील.
मॉन्सूनने शनिवारी (९ जुलै, २०११ ) संपूर्ण भारत व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा