सोमवार, १३ जून, २०११

मॉन्सून डायरी: १३ जून, २०११

एका वेगळ्याच विश्वाची शोधयात्रा करून ८ जूनला पुण्यात परतलो. खरतर त्या विश्वाची खोली, व्याप्ती, ऊर्जा पाहता त्याला फक्त वारीच म्हणता येईल. त्या विश्वाचा परिपूर्ण शोध मानवाच्या जन्माच्या आवाक्यातला नाही. एकीकडे विठ्ठल दर्शनाचा अवर्णनीय आनंद असतानाच दुसरीकडे मनातील असंख्य प्रश्न तसेच..पुढील वारीसाठी राखून ठेवलेले. देवाचा स्वतःचा प्रदेश- केरळ त्याच्या निर्मितीच्या म्हणजेच प्रत्यक्ष मॉन्सूनच्या काळात पाहणे खरोखर विठ्ठल दर्शनासमानच.३० मे नंतरच्या मॉन्सून डायरीची पाने अपडेट केली नसली, तरी लवकरच ती आपल्यासाठी खुली होतील. दिवसागणिक त्यात पडणाऱ्या अनुभवांची खोली पाहता, ते अनुभव वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर आणावेत असा विचार आला. लवकरच 'मॉन्सून डायरी' विस्तृत स्वरुपात आकर्षक छायाचित्रांसह पुस्तकरूपात याच सिझनमध्ये आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न आहे. 

दरम्यान आतापर्यंत झालेल्या मॉन्सूनच्या प्रगतीचा आढावा घेऊ-
सर्वसाधारणपणे १५ ते २० मेच्या दरम्यान मॉन्सून अंदमानात दाखल होतो असे मानले जाते. मात्र या वर्षी २५ मे उलटूनही मॉन्सून अंदमानात दाखल न झाल्याने तर्क- वितर्कांना उधाण आले. अंदमानात मॉन्सून आल्यावर आठवडाभराने केरळ मध्ये दाखल होतो असा प्रघात असल्यामुळे केरळमधेही तो उशिरा पोचणार अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. आमचा पुण्यावरून त्रिवेंद्रमच्या दिशेने प्रवास सुरु झाला तेव्हा आयएमडीचे अंदाज सुरु झाले होते. मॉन्सून अंदमानात ४८ तासांत, तर त्यानंतर २-३ दिवसात केरळ मध्ये दाखल होणार. मात्र हवामानाची स्थिती वेगाने बदलत २४ तासात अंदमानात नंतर ४८ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अपडेट आला. २९ मे रोजी तामिळनाडूमधून केरळमध्ये दाखल होताना पडणारा पाऊस मॉन्सूनचा आहे हे समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. मॉन्सूनने आपला नवा रंग दाखवत अंदमान आणि केरळच्या बहुतांश भागात एकाच वेळी आगमन करून दमदार एन्ट्री केली आणि पुढील काळात तशीच दमदार हजेरी लावून सेहवागच्या ओपनिंगची आठवण करून दिली.

मॉन्सूनच्या अंदमानातील आगमनाला झालेला उशीर हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांना त्यावेळी अपेक्षित जोर नसल्यामुळे असल्याचा निर्वाळा हवामान तज्ञांनी दिला. मात्र २८ मे दरम्यान लक्षद्वीप ते अंदमान दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे एकाएकी अनुकूल वातावरण निर्माण झाले. भारताच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात जमा झालेले बाष्प त्याच्या सोबतीला होतेच. या भागात सर्वदूर पाऊस सुरु झाला. नैरुत्ये कडून येणारे वारे, अपेक्षित दाब आणि २४ तासांमध्ये सर्वदूर झालेला पाऊस पाहून आयएमडीने हा मॉन्सूनच असल्याचे जाहीर केले.

आयएमडीच्या ३१ मेच्या अंदाजाच्या दोन दिवस आधीच मॉन्सून केरळ मध्ये दाखल झाला. (हा प्रघात मात्र मॉन्सून ने पाळला. मागील काही वर्षांचे आयएमडीचे मॉन्सूनच्या आगमनाचे अंदाज आणि प्रत्यक्ष मॉन्सूनचे आगमन पहिले, तर बहुतेकवेळा मॉन्सून अंदाजाच्या दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्याचे दिसून येईल. २९ मे रोजी मॉन्सूनची उत्तरसीमा कालिकत वरून जात होती. पुढील दोन दिवसत तो कर्नाटकच्या बहुतांश भागात पोचण्याची स्थिती निर्माण झाली. या कालावधीत आम्ही केरळच्या दक्षिण भागात होतो. मात्र तुरळक सरी सोडता पावसाची विशेष उपस्थिती जाणवली नाही.

३१ मेच्या रात्री आम्ही त्रिवेंद्रम सोडून उत्तरेला अलेप्पीच्या दिशेने निघालो तेव्हापासून ७ जूनला पश्चिम घाट सोडेपर्यंत पावसाने आमची साथ सोडली नाही. यावर्षी आगमनापासून मॉन्सूनची पश्चिमेकडील शाखा अधिक सक्रीय राहिली आहे. त्याचाच परिणाम म्हणून टप्प्या- टप्प्याने मॉन्सून ठराविक अंतर कापत पुढे सरकत राहिला आणि ज्या भागात जाईल तेथे चांगला बरसला. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात मॉन्सूनच्या आगमनापासून अस्तित्वात असलेले कमी दाबाचे क्षेत्र. (पुढे याचे अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र - डिप्रेशनहि झाले) आणि त्या क्षेत्रापासून लक्षद्वीपपर्यंत निर्माण झालेला किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा (ट्रफ). या ट्रफचा परिणाम आम्ही प्रत्यक्ष अलेप्पी, कालिकत, मंगलोर येथून पहिला. ट्रफ सक्रीय असताना किनारपट्टीचा पाऊस आणि खवळलेला समुद्र पाहण्याचा आनंद काही औरच.मॉन्सून २ जूनला मंगलोर, ३ ला वेंगुर्ला, तर ४ जूनला पुण्यात पोचला. ५ जूनला डहाणू, नाशिक, गुलबर्गा अशी मॉन्सूनची उत्तरसीमा होती. ती १२ जूनपर्यंत कायम होती. या कालावधीत आपण पहिले तर, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रुपांतर झालेले. हे डिप्रेशन १२ जूनला गुजरात कडे सरकले आणि समुद्रावरून बाजूला गेल्याने त्याची तीव्रता कमी झाली. आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या प्रवासात अरबी समुद्राप्रमाणे बंगालच्या उपसागरातूनहि मॉन्सूनची प्रगती झालेली दिसते. महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होत असताना ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगालचा काही भाग मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील शाखेद्वारे व्यापला आहे. लवकरच उत्तर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्याचा परिणाम म्हणून पूर्वेकडून मॉन्सून वेगाने पुढे सरकू शकेल.

महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्यापासून कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस बरसत आहे. याचे कारण सरळ आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस मिळतो तो अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे. अरबी समुद्रातील वारे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमुळे अडले जात असल्यामुळे अरबी समुद्र जवळ असूनही  अंतर्गत भागाला त्याचा विशेष लाभ होत नाही. (मात्र तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबई आणि लगतच्या परिसरात सक्रीय असल्यास त्याचा लाभ सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काही वेळा होतो. सध्या पुणे आणि मध्य महाराष्ट्राला मिळालेला पाऊस त्या पैकीच होता.) मात्र, घाटाच्या पूर्वेकडील भागात पाऊस हवा असेल, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे गरजेचे असते. (साधारणपणे आंध्रप्रदेश - ओरिसा दरम्यान किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र असल्यास महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होतो. 
मुंबईजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या इतर भागातील मॉन्सूनची वाटचाल आतापर्यंत रोखलेली होती. हे क्षेत्र आता गुजरातकडे गेल्याने येत्या २ दिवसात मॉन्सूनची गाडी रूळावर येईल असे मानले जात आहे. कृपया नोंद घ्यावी: मॉन्सूनने अद्याप संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. मराठवाडा आणि विदर्भाच्या मोठ्या भागात मॉन्सून अद्याप पोहोचायचा आहे. काल काही वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये मराठवाड्यात मॉन्सून बरसला असे वृत्त दिले गेले. मुळात पाऊस पडला म्हणजे मॉन्सून आला हि संकल्पनाच चुकीची आहे. मागे सांगितल्याप्रमाणे पाऊस हा मॉन्सूनचा एक भाग आहे. त्यासाठी नैरुत्येकडून येणारे वारे आणि ठराविक दाब आवश्यक असतो. मराठवाड्यात काल ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या सरी या पूर्वमोसमी पावसाच्या सरी होत्या (ज्याला थंडर शोवर्स म्हणतात). मॉन्सूनचा पाऊस सर्वदूर, एका लयीत बरसतो. त्यात वेगाने बदल घडत नाहीत. उलट थंडर शोवर्स दुपारनंतर एका एकी भरून येऊन पडतात. विजा कोसळतात. आणि हा पाऊस स्थानिक असतो.

आयएमडीचा येत्या २-३ दिवसांचा अंदाज: येत्या २४ ते ४८ तासांत उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सूनची आगेकूच होऊ शकेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकल्याने सध्या पावसात खंड पडला आहे. पण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या अंतर्गत भागात सर्वदूर पावसाला सुरवात होऊ शकेल.       

३ टिप्पण्या: