सोमवार, ६ जून, २०११

मॉन्सून डायरी: ३० मे, २०११

२९ मे, २०११ (रात्री उशीरा, त्रिवेंद्रम) 
२९ ला रात्री उशीरा त्रिवेंद्रममध्ये पोचलो. महात्मा गांधी (एम जी) रोड या शहरातील सर्वात बिझी असणाऱ्या भागात आम्ही प्रतिभा हेरीटेज या लॉजवर उतरलो. इस्रोच्या एका माजी इंजिनिअरचा हा लॉज आहे. मागे सायन्स कॉंग्रेस कव्हर करायला आलो होतो त्यावेळी इथे जवळ जवळ १५ दिवस काढले होते. लकीली मला 'माझीच' रूम मिळाली. पुण्यातून निघाल्यावर बरोबर दोन दिवसांनी आम्ही त्रिवेंद्रमला पोचलो. 'सकाळ'चे येथील प्रतिनिधी अजय कुमार आम्ही येणार म्हणून आमच्या लॉजसमोरच असणाऱ्या त्यांच्या ऑफिसवर वाट पाहत थांबले होते. वातावरणात कमालीचा उकाडा होता. रस्ते ओले होते. मात्र पाऊस नव्हताच. एक 'दीर्घ मिटिंग' झाल्यावर सर्वजण लगेचच झोपी गेले. 

३० मे, २०११ 
प्रोजेक्ट मेघदूतच्या पहिल्या प्रवासात त्रिवेंद्रमला विशेष महत्व आहे. भारतात अरबी समुद्रातून येणारे पहिले नैऋत्य मोसमी वारे त्रिवेंद्रममध्ये सर्वप्रथम प्रवेश करून मग पश्चिम घाटाचा आधार घेत उत्तरेकडे सरकू लागतात. थोडक्यात त्रिवेंद्रम हे भारतातील मॉन्सूनचे प्रवेशद्वारच. केरळ ची राजधानी असूनही शांत असणाऱ्या या शहराला स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व आहे. फ्रेटरच्या म्हणण्यानुसार,'या मार्कसिस्ट शहरातील  बहुतेक पुरुषांचे आवडते काम..वर्तमान पत्र वाचणे आणि चालू राजकीय घडामोडींवर विश्लेषकाचा आव आणून चर्चा करणे, इथे दिल्लीपेक्षा मॉस्को अधिक जवळचे आहे.' फ्रेटरने १९८७ मध्ये केलेल्या या वर्णनात आता बराच बदल झाला आहे. आता 'मोस्को'चे तर अस्तित्व नाहीच  पण हे मार्क्सिस्ट शहरही कात टाकू लागले आहे.
आमच्यासाठी या शहराचे वैशिष्ट्य म्हणंजे भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुख्य संस्था- विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि भारतातील सर्वात जुन्या हवामान वेधशाळेचे अस्तित्व.
मोठ्या प्रवासामुळे सर्वजण कमालीचे थकलेले होते. त्यामुळे दिवसाची सुरवातच झाली, ती सकाळी ११ वाजता. सचिवालय, राजा रवी वर्मा संग्रहालय सोडून थोडं पुढे गेल्यावर एक जुनी टेकडी लागते. या टेकडीवरून शहराचे आणि त्या पलीकडील समुद्राचे सर्वदूर दर्शन घडते. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या अभ्यासासाठी ब्रिटीश खगोल शास्त्रज्ञांनी १८३६ मध्ये येथे वेधशाळा सुरु केली. स्वातंत्र्यानंतरही काही काळ या वेधशाळेची जबाबदारी ब्रिटीश मातृसंस्थेकडे होती. पूर्वीच्या जुन्या ब्रिटीश इमारतीच्या पुढे आय एम डी ने नवी तीन माजली इमारत उभी करून जुनी इमारत झाकून टाकली आहे.
त्रिवेंद्रम वेधशाळेचे संचालक डॉ. के. संतोष त्यांच्या केबिन मध्ये फोन वर बोलत होते. 'हो काल दाखल झाला. सध्या मॉन्सूनची उत्तर सीमा कालिकत वरून जात आहे.. आणखी दोन दिवसात पावसाचा जोर वाढेल.' आम्हाला पाहताच हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत सर्वांना बसायला सांगितले. डॉ. मेधा खोलेंची ओळख सांगितल्यावर त्यांना आम्ही कशासाठी आलो आहोत हे लक्षात आलं. 'हो,,माझा फोन झाला होता, त्यावेळी त्या बोलल्या होत्या, कि तुम्ही येणार आहात म्हणून.. तर तुम्ही मॉन्सून चा पाठलाग करणार आहात..' मी म्हटलं, पाठलाग आहेच, पण त्याचे पश्चिम घाटातील आगमनाचे विविध पैलूही अभ्यासणार आहोत. आमच्या आधी फ्रेटर सोडून असा प्रयत्न कोणी केला आहे का? म्हणजे तसं तुम्हाला कोणी भेटून गेलय का? ते म्हणाले, 'मागे जपानचे काही अभ्यासक येऊन गेले होते. पण त्यांचं स्वरूप वेगळं होतं. आणि तुम्ही करत आहात एवढा प्रवास त्यांनी केला नव्हता. काही न्यूज चैनेलकडून असा प्रयत्न झाला होता. मात्र, फ्रेटर सोडल्यास मॉन्सूनचा असा व्यापक अभ्यास, त्याचे विविध पैलू कोणी कव्हर केलेले नव्हते.'
मॉन्सून आणि केरळ यांचं नातं डॉ. संतोष सांगत होते..'मॉन्सूनच्या वाऱ्यांचा पश्चिमेकडून मुख्य भूमीत प्रवेश आणि त्याच्या स्वागताला सज्ज असणाऱ्या पश्चिम घाटाच्या असामान्य योगायोगामुळे या भागात वार्षिक ३१०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. पश्चिमघाट उत्तर केरळमध्ये उंच आणि व्यापक असून, दक्षिणेकडे तो ठेंगणा होतो. त्यामुळे उत्तर भागात मॉन्सूनचे बाष्पयुक्त वारे अधिक अडवले जाऊन दक्षिण केरळपेक्षा तिथे जास्त पाऊस पडतो. या मध्ये आणखी एक मजेशीर बाब अशी कि, मॉन्सूनचे वारे पश्चिमेकडून केरळ मध्ये येताना दक्षिण केरळमध्ये ते आणखी वळतात आणि त्रिवेंद्रम मध्ये प्रवेश करताना त्यांची दिशा नैऋत्य नाही, तर वायव्य असते. थोडक्यात. संपूर्ण देशात मॉन्सून आला हे समजण्यासाठी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर पहिला जातो. मात्र, ज्या त्रिवेंद्रम परिसरात तो प्रथम येतो त्याला मात्र हे वारे वायव्येकडून मिळतात.'
या वर्षीच्या मॉन्सूनच्या आगमनाबद्दल विचारतानाच मान हलवत ते बोलू लागले.. कदाचित हा प्रश्न त्यांना काल पासून अनेकांनी विचारला असावा. 'मॉन्सून केरळ आणि अंदमानमध्ये एकाच वेळी आला आहे ही दुर्मिळ गोष्ट असली तरी, हे पहिल्यांदाच घडले असे नाही. खरं सांगायचं तर मी इथे गेली १५ वर्षे आहे. या १५ वर्षात मी १५ वेगवेगळे मॉन्सून पहिले. प्रत्येक मॉन्सून हा स्वतंत्र, नवा असतो. त्यामुळे अशी गोष्ट घडणे अस्वाभाविक नाही. लक्षद्वीप ते अंदमानच्या समुद्रापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सूनचे केरळमध्ये लवकर आगमन झाले. सध्या दक्षिण केरळमध्ये तो चांगला सक्रीय असून,  सध्याची स्थिती पाहता येत्या २-३ दिवसात त्याची प्रगती होऊ शकेल.'
सूर्यास्त जवळ आला होता. आम्ही गाडी थेट कोवलम बीचवर घेतली. त्रिवेंद्रम शहराच्या दक्षिणेकडे सुमारे १५ किलोमीटरवर असणाऱ्या या बीचवरूनच मॉन्सूनचे पहिले वारे प्रवेश करतात. १९८७ मध्ये फ्रेटर याच बीचशेजारी असणाऱ्या हॉटेलमध्ये उतरले होते. या बीचवर मॉन्सूनच्या आगमनाच्या दिवशी त्यांना पहिल्या वाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक लोकांची बीचकडे जाणारी रांग दिसली. फेर धरून नाचताना मल्याळी दिसले. काही जण असे होते कि जे या दिवशी दरवर्षी देशाच्या विविध भागांतून कोवलमवर हजर असतात.. असं चित्र आपल्यालाही बघायला मिळेल या आशेनी आम्ही गाडी पार्क करून उतारावर चालू लागलो, तोच खवळलेल्या समुद्राचा 'इशारा' कानावर पडला. कोवलम अलेप्पी बीचपेक्षा खूपच निराळा भासला. मॉन्सून सक्रीय असल्यामुळे बऱ्याच आतपर्यंत येणाऱ्या लाटा किनाऱ्याला धुऊन काढत होत्या. वाळूचा सोनेरी रंग बदलून काळपट झालेला. मॉन्सून आल्याचा हा आणखी एक पुरावा.
किनाऱ्यावर उलट्या करून ठेवलेल्या अनेक होड्या होत्या. त्याच्यावर बसून अनेकांचं फोटो शूट सुरु होतं.  बीचवर गर्दी तशी कमीच होती. ढगांमागून सूर्य समुद्रामागे लपण्यासाठी तयार होता.एका अनाथाश्रमाची सहल तेथे आली होती. आठ - दहा वर्षांची मुले आपल्याच विश्वात दंग होऊन लाटांशी शिवणापाणी खेळत होती. दोन गार्ड शिट्या वाजवून लाटान्जवळ जाणाऱ्या अतिउत्साही नागरिकांना हटकत होते. पण दोन तरुण लाटांच्या अगदी जवळ जाऊन वाळूत काहीतरी शोधत होते. लाट जवळ येताना दिसली की पाय भिजू नये म्हणून मागे पळत यायचे आणि लाट माघारी फिरली कि परत तिचा पाठलाग करत, वाळूत काहीतरी शोधायचे. बराच वेळ हे सुरु असताना न राहवून आम्ही गार्डला विचारलं, ' हे काय चाललाय?' आणि तुम्ही त्यांना हटकलं का नाही.
गार्डने माझ्या हातातला कॅमेरा पाहून पत्रकार असल्याचं ओळखलं. टीव्हीवर दिसणार असं वाटून तो तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलू लागला. 'फिशरमन सर..' फिशरमन? अहो मग मासे असे पकडतात का? यापुढे त्याने दिलेल्या माहितीवरून मॉन्सूनचा दक्षिणेतील दैनंदिन जीवनावर होणारा पहिला परिणाम समोर आला.
तो म्हणाला, 'मासे असे नाहीच पकडत. त्या पहा किनाऱ्यावर त्यांच्या बोटी. आता ३-४ महिने त्यांचे काही काम नाही. हे गरीब मच्छीमार आहेत. दहा पंधरा जण मिळून या बोटी समुद्रात वल्हवत नेतात आणि जे काही हाती लागेल, ते समान वाटून घेतात. प्रत्येकी दिवसाचे २००, तर कधी ५०० रुपये मिळतात. पण, मॉन्सूनचे आगमन होताच समुद्र आपला रंगच बदलतो. या काळात सामान्य मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी असते. यातील बहुतेक लोक कमी शिकलेले असतात. त्यांना दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे अनेकदा उपाशी राहायची वेळ येते. मग काही जण इथे समुद्राकडे पाहण्यासाठी येऊन बसतात. ..मी म्हटलं उगाच? ..हो मग अजून काय करू शकतात ते..तिकडे बघा त्या बोटींना रेलून बसलेले ते मच्छीमार. गेला आठवडाभर इथे नुसतेच येऊन बसतात. आणि ते दोघे? मी लाटांशी खेळ करणाऱ्या तरुणांकडे बोट दाखवून विचारलं. ते शिंपले शोधतायत. हा उसळलेला समुद्र यांना आत येण्याची परवानगी देत नाही. पण त्यांच्यासाठी आपल्या पोटातून काही न काही काठावर आणून देतो. ते जमा करून हे बाजारात विकतात किंवा घरी नेतात...पण एवढं पुरतं का?.. कसं पुरेल? पण पर्याय नाही. अहो ते किमान तेवढं तरी करतायत.
मासेमारी पावसाळ्यात बंद होते, तर मग मल्याळी लोक खातात काय? मासे तर त्यांच्या जेवणाचा अविभाज्य भाग ना? तो उत्तरला. 'अहो मासेमारी पूर्णपणे बंद होत नाही. या हाताने चालवायच्या बोटी या काळात बंद असतात. ज्यांच्याकडे मोटारबोट आहे ते इशाऱ्याचे दिवस सोडून रोज आत जातात. मग हे लोक तशा बोटी का वापरत नाहीत? .. एक बोट आणि जाळी किमान दोन लाख रुपयांची. दिवसाला २०० रुपये कमावणारे हे मच्छिमार तशा बोटी कधी घेणार? हे चार महिने म्हणजे यांच्यासाठी परीक्षाच असते.
मी कॅमेरा बंद करता करता म्हणालो..'म्हणजे मॉन्सून येथील मच्छिमारांसाठी शापच म्हणायचा तर.'.यावर गार्ड म्हणाला..'नो सर.. तो फक्त गरिब मच्छीमारांसाठी शाप म्हणता येईल..' त्याच्या या वाक्यावर विचार करतच आम्ही रूमवर परतलो.  

1 टिप्पणी: