प्रोजेक्ट मेघदूत (१२ मे, २०११)
अगदी लहानपणी पाऊस म्हणजे घराशेजारी साचणाऱ्या डबक्यात डुंबणे, रेल्वेस्टेशन जवळच्या तलावात मासे पकडायला जाणे, महत्वाचं म्हणजे शाळेला दांडी मारायचं हक्काचं कारण. पुढे थोडं मोठं झाल्यावर पावसात सायकलवरून स्वच्छंदी बागडणे, साप, खेकडे, बेडूक पकडणे, भर पावसात चिखलात माखून, घसरत फुटबॉल खेळणे, शाखेची वर्षासहल काढणे असे उद्योग असायचे. कॉलेज सुरु झाल्यावर 'मॉन्सून'चे संदर्भ बदलले. मुसळधार पावसात, 'तिच्या' हातात हात घालून कुडकुडत बिनधास्त फिरणे, ट्रेकवरून येताना १०-१० कप चहा पिणे.. पावसाच्या आठवणी आहेत त्या अशा..
पुढे खगोलशास्त्राचा अभ्यास सुरु केला, तेव्हा पावसाळ्याचे चार महिने शत्रूसारखे वाटत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात एखाद दुसरा दिवस आकाश स्वच्छ मिळायचं. मग यावर रेडीओ निरीक्षणांचा तोडगा काढून वेळ मारून न्यायची. मात्र इतकी वर्षे कधीही चार महिने आकाशात दाटणाऱ्या ढगांच्याकडे विशेष लक्ष गेले नाही. कधी त्यामधून कोसळणाऱ्या जलधारांचे आश्चर्यही वाटले नाही. पावसाळा म्हटलं कि पाऊस पडणारच त्यात कुतूहल ते काय?
पुढे 'सकाळ'साठी हवामान कव्हर करायला सुरवात केली, तेव्हा २००७ चा उन्हाळा सुरु होता. रोजच्या रोज उन्हाची बातमी देऊनच घाम फुटायचा. उष्णतेची लाट, उष्माघाताचे बळी अशा बातम्या देता देता एकदा मॉन्सूनच्या अंदाजाची बातमी समोर आली. तीहि एप्रिलमध्ये. बातमी लिहिण्यासाठी अंदाजामध्ये लिहिलेल्या त्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी थेट पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याकडे गेलो. मी शिकाऊ आहे, हे लक्षात येऊनहि त्यांनी त्यावेळी अख्खा मॉन्सून अंदाज अगदी सोपा करून सांगितला. मॉन्सूनचे त्यांनी त्यावेळी सांगितलेले विज्ञान आजहि डोक्यात अगदी पक्के बसले आहे. सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन, विविध महासागरांच्या पृष्ठभागांचे तापमान, भारतीय उपखंडातील उन्हाळ्यातील तापमान, अशा वेगवेगळ्या बाबींचा मॉन्सूनवर काय परिणाम होतो, मॉन्सूनची निर्मिती कशी होते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची भारतीय उपखंडात वाटचाल कशी होते, चार महिने कोसळून झाल्यावर मॉन्सूनचे वारे माघारी कसे फिरतात या सगळ्या गोष्टींबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण झाले.
त्यावर्षीचा मॉन्सून बातम्यांच्या निमित्ताने पूर्ण अभ्यासता आला. जो मॉन्सून आतापर्यंत माझ्या डोक्यावरील ढग आणि त्यातून पडणाऱ्या पावसाच्या धारांपर्यंतच मर्यादित होता, तो मॉन्सून एक जागतिक आणि किचकट घटना कशी आहे ते लक्षात येऊ लागले. कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे, द्रोणीय स्थिती- बातम्यांमध्ये वारंवार वापराव्या लागणाऱ्या या शब्दांच्या संकल्पना समजू लागल्या, काही दिवसांनी तर अगदी आज पाऊस पडणार कि नाही, याचा माझा अंदाजहि बरोबर येऊ लागला. यातून 'मॉन्सून'शी नाते घट्ट होत गेले. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पावसावर अवलंबून कसे आहेत, पूर, चक्रीवादळांच्या वेळी निर्माण होणारी आपत्कालीन स्थिती, पावसाने दडी मारल्यावर होणारी पाणी आणि वीजकपात, दुष्काळी वर्षानंतर देशभर पेटणारी महागाई, या काळात निर्माण होणारे साथीचे रोग यावरून मॉन्सून हा फक्त छत्री, रेनकोट आणि घराबाहेर कधी पडायचं एवढ्या पुरता मर्यादित विषय नसून भारतीय उपखंडाची ती नैसर्गिक ओळख असल्याचे स्पष्ट झाले. खरच 'मॉन्सून'शिवाय भारत..विचार तरी करता येईल का?
मॉन्सून 'कव्हर' करण्याचं हे माझं पाचवं वर्ष आहे. या दरम्यानचा प्रत्येक मॉन्सून वेगळा होता. कधी नॉर्मल, कधी दुष्काळ, कधी सरासरीपेक्षा जास्त. कधी एका भागावर रुसून दुसरीकडे पूर आणणारा, तर कधी अनेक दिवस दडी मारून शेतकऱ्यांना सतावणारा, कधी चक्रीवादळामधून सगळे बाष्प गमावणारा, तर कधी वादळे नसतानाही मोठा पाऊस देणारा...सतत हूल देणारा लहरी मॉन्सून मला पूर्ण समजलंय असा सांगणारा एकही हवामानशास्त्रज्ञ आपल्याला भेटणार नाही.
वेदांमधेही समुद्राकडून विशिष्ठ कालावधीत जमिनीवर येणाऱ्या मॉन्सूनच्या (नैऋत्य मौसमी) बाष्पयुक्त वाऱ्यांचा उल्लेख आढळतो. रामायण, महाभारतापासून, भारतातील अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भारताच्या या अविभाज्य घटकाचा ठीकठिकाणी उल्लेख आढळतो. आर्यभट्ट, वराहमिहीरासारख्या शास्त्रज्ञांनी मॉन्सूनच्या लहरीपणाच्या नोंदी ठेवल्या होत्या. इंग्रजांचे भारतावर जे जे उपकार आहेत, त्यापैकी महत्वाचा म्हणजे, भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या मॉन्सूनच्या नियमितपणे देशभरातून घेतलेल्या नोंदी. त्यांचा वारसा 'आयएमडी' आजही चालवत आहे.
मॉन्सूनची इतिहासातील सर्वात महत्वाची शास्त्रीय आणि कलात्मक नोंद म्हणून कालिदासाच्या 'मेघदूत'ची ओळख आहे. आपल्या प्रेयसी- पत्नीच्या विरहाचे दुःख सहन न झालेल्या यक्षाला आकाशातील ढगांकडे पाहून आनंद होतो, कि याच ढगांचा प्रवास 'तिच्या' जवळूनही होऊ शकेल.. त्या ढगांकडे तो आपल्या विरह भावना व्यक्त करून आपला संदेश धाडतो.. दूत म्हणून भूमिका निभावणाऱ्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन 'मेघदूत' या अजरामर काव्यात कालिदासांनी केले आहे. काव्यातील मेघाचा प्रवास तंतोतंत मॉन्सूनच्या वाऱ्यांशी मिळतो हे आजच्या वैज्ञानिकांसाठीहि आश्चर्य आहे.
मॉन्सून समजून घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक पिढ्यांनी आपापल्या परेनी केला आहे. कृत्रिम उपग्रहांसह अत्याधुनिक यंत्रणांच्या साह्याने मॉन्सूनचे विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न आजचे शास्त्रज्ञ करीत असले तरी, मॉन्सून ला फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून अभ्यासणे परिपूर्ण ठरणार नाही..(अगदी माणसाचा अभ्यास फक्त एक शरीर म्हणून करता येणार नाही तसाच)..हजारो लाखो वर्षे भारतीय उपखंडावर न चुकता कोसळणारा मॉन्सून हा भारतीय संस्कृतीच्या रोमा रोमात भिनला आहे. पश्चिम घाटातल्या आणि ईशान्येच्या सदाहरित वनांना, त्यात राहणाऱ्या असंख्य जीवांना तो पोसतो, सह्याद्रीतल्या नद्यांना तो वाहते करतो, भू मातेच्या पोटात बीजे पेरून वाट पाहणाऱ्या कोट्यावधी शेतकऱ्यांचे शिवार तो फुलवतो. उन्हाने लाही लाही झालेल्या जीवांना गारवा देतो, पाणी देतो, वीज देतो, भुकेल्यांना अन्न देतो, देशाला समृद्धी देतो...
देवाइतके महत्वाचे स्थान असणाऱ्या या मॉन्सूनचे स्वागतहि तसे झाले नाही, तर नवलच. झाडे- वेली, पशु- पक्षी सर्वच जण मॉन्सूनचे स्वागत आपापल्या 'अंदाजा'ने करतात. गायकाच्या गळ्यातून अपोआप 'मेघ मल्हार' बाहेर पडतो, कवीचे हात बाहेर पडणाऱ्या जलधारांना शब्दाचे रूप देऊन कागदावर उमटवतात, फोटोग्राफरचा कॅमेरा अपोआप फ्रेम पकडतो, संपूर्ण निसर्गच जणू फेर धरून नाचू लागतो..बाहेर जशी स्थिती तसाच असंख्य मनातहि हा सोहळा सुरु असतो..
या सर्व गोष्टी कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळ, एल निनो इतक्याच महत्वाच्या नाहीत का? या सर्व गोष्टींशिवाय मॉन्सूनचा परिपूर्ण अभ्यास शक्य आहे का? वेदांपासून मॉन्सून समजून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, आपल्या पिढीकडून शास्त्रज्ञ त्यांच्या परेने मॉन्सूनचे भौतिक पैलू समजून घेत आहेत, मग या इतर पैलूंचे काय? 'प्रोजेक्ट मेघदूत' आकाराला येतोय मॉन्सूनची हि दुसरी बाजू अभ्यासण्यासाठी. पुढील काही वर्षे मॉन्सून आणि भारताचा संवाद विविधांगानी अभ्यासण्याचा प्रयत्न 'प्रोजेक्ट मेघदूत'द्वारे करण्यात येणार आहे. म्हटलं तर हा मॉन्सूनचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, म्हटलं तर आपण स्वतः मॉन्सूनशी साधलेला संवाद.
१९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक, लेखक अलेक्झांडर फ्रेटर याने सर्व प्रथम मॉन्सूनचा पाठलाग केला, काहीसा मेघदूताच्या मार्गाने. अगदी दक्षिणेकडील त्रिवेंद्रमपासून ते दिल्लीपर्यंत. या काळात त्याला मॉन्सूनचे साग्रसंगीत स्वागत करणारे मल्याळी भेटले, दक्षिण भारतातील पर्जन्यदेवतेची पूजा त्याने पाहिली. आयएमडीच्या शास्त्रज्ञांकडून त्याने मॉन्सूनचे विज्ञान समजून घेतले. चेरापुंजीचा प्रचंड पाऊस अनुभवला. शेतकऱ्यांबरोबर पेरणी केली. त्याने केलेल्या या ध्येयवेड्या कामाला तोड नाही. नेहमीप्रमाणे बाहेरील नागरिकानेच आपल्याला आपल्या देशाच्या एका पैलूचे दर्शन घडवले. पुढे त्याने त्याच्या या मॉन्सूनच्या पाठलागाचा अनुभव 'चेसिंग द मॉन्सून' या पुस्तकाद्वारे जगासमोर आणला. या पुस्तकावर आधारित 'बीबीसी'ने एक डॉक्युमेंटरीहि बनवली. हा झाला इतिहास.
मॉन्सूनचे असंख्य पैलू अजूनहि जगासमोर आलेले नाहीत. त्या पैलूंची विविध पद्धतींनी नोंद करणे आवश्यक आहे. 'प्रोजेक्ट मेघदूत'द्वारे आपण तेच करायचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित हे काम करता करता, अनेक कोडी उलगडतहि जातील, एक सर्वसमावेशक 'मॉन्सून कोश'हि तयार होईल. हि अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया समजून घेण्याची जी मोहीम शतकानुशतके चालू आहे, त्यात आपल्या पिढीकडून काहीशी भरहि पडेल. अर्थात हे एका वर्षाचे काम नाही. सतत काही वर्षे पंढरपूरच्या वारीसारखा 'मॉन्सून'चा पाठलाग करावा लागेल, तेव्हा दरवेळी त्याचे वेगवेगळे पैलू समोर येतील. देशातील सर्व भाग एकाच प्रवासात पूर्ण होणे शक्य नाही, ते हि वेगवेगळ्या वर्षी करावे लागतील.
मॉन्सून अशा प्रकारे अभ्यासावा असं गेली तीन वर्षे मनात होतं. पण काहीना काही कारणांनी ते राहत होतं. या वर्षी या पहिल्या 'मॉन्सून वारी'चा मुहूर्त लागतोय. येत्या २७ मे ते ४ जून च्या दरम्यान केरळ ते महाराष्ट्रादरम्यान मॉन्सूनचा पाठलाग करण्याचे निश्चित केले आहे. मॉन्सूनचे स्वागत आणि त्याचा पाठलाग विविध नजरांमधून झाला तर? एकाच वेळी त्याचे विविध पैलूही समोर येतील, त्याचे स्वागतही विविध अंदाजांनी होईल, पश्चिम घाटात या वर्षी जेव्हा सर्व प्रथम मॉन्सूनचे वारे धडकतील, तेथील डोंगरांवरून जेव्हा पहिल्या पाण्याचे धबधबे कोसळू लागतील, आपल्या तारणहाराच्या स्वागताला असंख्य जीव जेव्हा फेर धरून गाऊ लागतील, तेव्हा त्या आवाजात आवाज मिसळायला आपणहि तिथे असायला हवे.. मॉन्सूनच्या स्वागताला यावेळी हवामानशास्त्रज्ञ हवेत, निसर्ग अभ्यासक हवेत, वनस्पती-प्राणी शास्त्रज्ञ हवेत. कवी हवेत, संगीतकार हवेत, ते क्षण टिपायला चित्रकार हवेत, फोटोग्राफर हवेत.. मॉन्सूनचे पश्चिम घाटातले स्वागत अशा विविध भाव स्वभावांद्वारे त्या निसर्गाच्या संवादाचाच एक भाग होऊन करणे किती अद्भुत असेल, याचा विचार येऊनच मन पावसाच्या धारांनी न्हाऊन निघतंय..मॉन्सूनविषयी कोणत्याही दृष्टीतून कुतूहल असणारं कोणीही यात सहभागी होऊ शकेल (अर्थात हा पाठलाग झेपू शकेल असंच). तयारीला लागायला हवं, येताय ना?
अरे वा...फारच छान कल्पना सुचलीये..मला आवडेल यायला.
उत्तर द्याहटवानम्रता भिंगार्डे
शिकाऊ पत्रकार
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा