बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

शुक्र- सूर्याचे मिलन

कच्छच्या वाळवंटात प्रवेश केला तेव्हा आमच्याकडच्या तापमापकावर ४५ अंश तापमान दिसत होते. मोठ्या हेअर ड्रायरचा गरम झोत अंगावर घेऊन शरीरातील उरल्या सुरल्या पाण्याची वाफ होत आहे असाच भास होत होता. अशा स्थितीत काही मिनिटेही काढणे शक्य नव्हते, तरी आमच्यापैकी प्रत्येक जण अगदी उत्साहात होता. कारणच असे होते. पृथ्वीवर आज जगत असलेल्यांना दिसू शकणारे शेवटचे शुक्र अधिक्रमण दुसऱ्या दिवशी आम्हाला दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मॉन्सूनने कर्नाटकपर्यंत मजल मारली होती आणि देशाच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान होते. अशा स्थितीत जिथे वर्षातले ३० दिवस ढगाळ हवामान असते अशा कच्छच्या वाळवंटातील धोलाविरा या हडप्पाकालीन नगराची आम्ही निवड केली होती आणि ती योग्यच असल्याचे आकाशाकडे पाहून सिद्ध झाले होते.
टिपिकल कच्छी घरांची रचना असणाऱ्या गेस्ट हाउसच्या आवारात आम्ही पहाटेच टेलीस्कोप, कॅमेरे पूर्वेच्या दिशेने सज्ज केले. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास शुक्राच्या काळ्या प्रतिमेचा सूर्यबिम्बावरून प्रवास सुरु झाला होता. आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या भागात सूर्योदयापर्यंत शुक्राचा सूर्यावरील प्रवासाचा मध्य येणार होता. आदल्या दिवशी या भागात धुळीचे वादळ सुरु झाल्यामुळे आकाशाला एक पिवळट छटा मिळाली होती. तेव्हाच या धुळीच्या पडद्यामुळे शुक्राचे अधिक्रमण पाहणे सुखावह होणार असल्याचे जाणवले. संधीप्रकाश जाऊन आता लख्ख उजेड पडला होता. घड्याळातील वेळ या ठिकाणी सूर्योदय झाल्याचे दाखवत होती. मात्र, त्याच धुळीच्या पडद्यामुळे क्षितिजावर सूर्य अजूनही नजरेस पडत नव्हता. सात वाजून ४५ मिनिटे झाली असतील, तेव्हा क्षितिजापासून पाच एक अंशांवर एक हलकीशी सफेद गोलाकार प्रतिमा दिसू लागली.. अगदी मायलर फिल्ममधून दिसेल असा सूर्य आम्ही सध्या डोळ्यांनी पाहत होतो. थोडे निरखून पाहिल्यावर त्यावर तीट लावल्याप्रमाणे शुक्राचा काळा ठिपकाही दिसला. सगळ्यांनी जल्लोष केला. शतकातील शेवटचे शुक्र अधिक्रमण आम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी याची डोळा पाहत होतो..
पृथ्वीवरून शुक्राचा पूर्ण गोलाकार आपण अधिक्रमणाशिवाय कधीच पाहू शकत नाही. शुक्राच्या चांदणीला दुर्बिणीतून पहिले तर कायमच आपल्याला चंद्राच्या कोरीप्रमाणे शुक्राची कोर दिसते. सूर्याभोवतीच्या शुक्राच्या प्रवासात त्याच्या एका बाजूला प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला सावली असल्यामुळे पृथ्वीवरून शुक्र पूर्ण दिसू शकेल अशी दोनच ठिकाणे असतात. एक.. पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेत सरळ मागे (जी अवस्था सूर्याने शुक्राला झाकल्यामुळे किंवा प्रखर सूर्यप्रकाशामुळे कधीही दिसू शकत नाही) आणि दुसरी पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेवर शुक्र मधोमध येईल तेव्हा.. अगदी सूर्य ग्रहणाप्रमाणे. ही स्थिती जुळून येणे तसे दुर्मिळ असते. शुक्राचे एक अधिक्रमण दिसले, की पुन्हा ते आठ वर्षांनी दिसते. मग १२१ वर्षांनी पुन्हा आठ वर्षांच्या अधिक्रमणाच्या जोड्या त्या नंतर १०५ वर्षांनी आठ वर्षांच्या अधिक्रमानाच्या जोड्या अशा फ्रिक्वेन्सीने ही घटना पृथ्वीवरून दिसत असते. आठ जून २००५ नंतर आठ वर्षांनी या शतकातले शेवटचे अधिक्रमण आम्ही पाहत होतो. या नंतरचे अधिक्रमण २११७ मध्ये होणार असल्यामुळे आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.
आठ ते दहा या वेळेत अधिक्रमणाच्या मध्यापासून शेवटपर्यंतच्या अवस्थांची फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी करून ही दुर्मिळ घटना आम्ही पुढच्या पिढीसाठी कॅमेरात कैद केली. रेंजमध्ये आल्यावर इंटरनेट सुरु केले तेव्हा समजले.. की पावसापासून बचावासाठी ज्या टीम्स ईशान्येकडे किंवा अगदी उत्तरेला लडाखला गेल्या होत्या त्यांनाही ढगाळ हवामानामुळे ही घटना नीटशी पाहता आली नाही. भारताच्या हवामानाचा जो काही थोडाफार अभ्यास केला आहे त्याचा फायदा आम्हाला २००९ चे खग्रास सूर्यग्रहण, २०१० चे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि आता २०१२ च्या शुक्र अधिक्रमणासाठीही झाला. या शतकात आता पुन्हा ही घटना दिसणार नसल्यामुळे धोलाविराच्या धुळीच्या पडद्यामागे रंगलेला सूर्य- शुक्राच्या मिलनाचा दुर्मिळ फोटो येत्या पिढीला शुक्र अधिक्रमण काय असते हे सांगू शकेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा