रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

माळीणची घटना, का आणि कशी ?

महाराष्ट्रासह मध्य भारतात २८ जुलैपासून पावसाने सर्वत्र जोर धरलेला. पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या मोसमात प्रथमच अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. अनेक लहान- मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असतानाच घाटात दरडी कोसळण्याच्या बातम्याही येऊ लागल्या. मान्सून काळात जुलै- ऑगस्टमध्ये अशा बातम्या नवीन नाहीत. मात्र, ३० जुलैच्या सकाळी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला. रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत बसलेले गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले. ४४ घरांत असणाऱ्या दीडशेहून अधिक जणांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. भारतात घडलेल्या दरडींच्या सर्वात भयंकर घटनांमध्ये माळीणच्या घटनेची नोंद झाली.  


माळीणच्या घटनेचे गेले चार दिवस इलेक्ट्रोनिक माध्यमे आणि वृत्तपत्रांमधून सविस्तर वार्तांकन सुरु आहे. घटनेचे विदारक चित्र मांडतानाच, या घटनेमागील कारणमीमांसाही करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगरउतारावरील शेतीला (पडकई), जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात येत आहे. या बाबींचा सह्याद्रीच्या नैसर्गिक स्वरूपावर परिणाम नक्कीच होतो. मात्र, माळीणच्या घटनेसाठी त्यांना सरसकट जबाबदार ठरवणारी ढोबळ विधाने करणे अशास्त्रीय ठरेल. अशा घाईने केलेल्या कारणमीमांसेचा आणखी एक धोका म्हणजे नेमके कारण न सापडल्यामुळे त्यावरील नेमका उपायही आपल्याला सापडणार नाही. स्वयंसेवी संस्थांच्या, माध्यमांच्या दबावामुळे कदाचित अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जातील, धोरणांमध्ये बदल केले जातील. पण हे करून घाटातील दरडी कोसळण्याच्या थांबतील का हा महत्वाचा प्रश्न आहे.

माळीणची भूरचना आणि भूगोल   
माळीणच्या घटनेमागील नेमकी कारणे शोधायची असल्यास तेथील नैसर्गिक स्थितीचे नेमके आकलन होणे आवश्यक आहे. डिंभे धरणाच्या जलाशयात पाणी जमा करणाऱ्या आंबेगावच्या खोऱ्यातील माळीण हे डोंगरपायथ्यावरील एक गाव. घाटाच्या पश्चिम कड्यापासून फक्त दहा किलोमीटरवर डोंगरांच्या कुशीत असल्याने स्वाभाविकपणे इथे पावसाचे प्रमाण मोठे आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हा भाग येत असला तरी, प्रचंड पावसामुळे बसाल्ट येथे मूळ रुपात नसून, त्यापासून तयार झालेल्या लाल मातीचे प्रमाण येथे जास्त आहे. पावसाळ्यात त्यात पाणी साठून राहते.  
उष्णकटिबंधीय हवामानात तीव्र उन्हाळा आणि मोठा पाऊस यांमुळे या खडकाची वेगाने झीजही होते. त्याला भेगा पडतात, त्याची बारीक खडी तयार होते, तसेच मृदा निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. या प्रक्रियेला हजारो वर्षे लागतात. अशा प्रकारचा खडक आणि मृदा महाराष्ट्रात कोकण, सह्याद्रीच्या माथ्यावर- माथेरान, भीमाशंकर - आंबेगावच्या खोऱ्यातील डोंगर अशा मोठ्या पावसाच्या प्रदेशात आढळून येते. मोठ्या पावसामध्ये या खडकाच्या छिद्रांत, भेगांत मोठ्या प्रमाणात पाणी साठते. पाणी धारण करण्याची क्षमता संपली की ते खडक डोंगरापासून निसटून उताराने खाली येतात. यालाच आपण दरड म्हणतो. मोठा पाऊस आणि जांभ्या खडकाची भूरचना हे दोन घटक एकत्र आले की, दरड आलीच. माळीणमध्ये, तसेच आंबेगावच्या आसपासच्या अनेक गावांत डोंगरावरून माती, खडी कमी जास्त प्रमाणात नेहमीच घसरून येत असल्याचे गावकरी सांगतात. दरड कोसळू शकणाऱ्या देशातील प्रमुख क्षेत्रांत सह्याद्रीच्या या भागाचाही समावेश होतो.

ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रमेश बडवे यांच्या म्हणण्यानुसार, "माळीणच्या ज्या डोंगरावरून दरड कोसळली, त्याचे पृष्ठ मुख्यत्वे लाल मातीचे असून, त्या मातीची खोलीही जास्त आहे. वाहून आलेला चिखल, तसेच दरडीच्या भागाचे जवळून निरीक्षण केल्यास त्यात खडकांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. मोठ्या पावसात या मातीत पाणी जमा होऊन भूजलाची पातळी एकाएकी वाढते. कमी कालावधीत मोठा पाऊस झाल्यास तीव्र उतारावरील माती आणि पाण्याचे हे मिश्रण गुरुत्वाकर्षणाने खाली घसरून येते. पाणी आणि चिकट मृदेचा निसटून आलेला हा लोट खडकांच्या दरडीपेक्षाही दूर पर्यंत वाहून जाऊ शकतो आणि वाटेत येईल त्या सगळ्या गोष्टींना व्यापू शकतो. माळीणची घटना ही भू- शास्त्रीय भाषेत 'मड फ्लो' (चिखलाचा प्रवाह) प्रकारची आहे.'       
                    

घटनेच्या दिवशीची हवामानाची स्थिती स्थिती
दरडीसाठी कारणीभूत असणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. २७ जुलै ते एक ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घटनेच्या दिवशी पश्चिम किनारपट्टीवर दीड किलोमीटर उंची पर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोर ट्रफ) सक्रीय होता. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सात किलोमीटर उंचीपर्यंत कमी दाबाचे तीव्र क्षेत्र अस्तित्वात होते. उत्तरेकडे पूर्व राजस्थानमध्ये वातावरणात चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. या सर्वांच्या जोडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह तीव्र होता. या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांत सर्वदूर मोठा पाऊस झाला. माळीण हे घाटाच्या पश्चिम सीमेजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर तुलनेने अधिक होता.'

माळीण गावात पर्जन्यमापाकाची सोय नाही. त्यामुळे आसपासच्या पर्जन्य मापन केंद्रांवरून तेथील पावसाचा अंदाज बांधावा लागेल. ३० जुलैला डिंभे धरणाच्या पर्जन्यमापकात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या ठिकाणी दररोज सकाळी आठला पाऊस मोजला जातो. ३० तारखेच्या पहाटे आंबेगाव - जुन्नरच्या खोऱ्यात दर तासाला पावसाची स्थिती कशी होती हे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या गोळेगाव- जुन्नर येथील स्वयंचलित पर्जन्यमापकावरून स्पष्ट होते. ३० तारखेच्या पहाटे ३:३० पर्यंत त्या केंद्रावर ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. साडेचारला त्याचे प्रमाण एकाएकी वाढून १०३ मिलीमीटर झाले. त्यानंतर ११२ (साडेपाच), १३४ (साडेसहा), १४६ (साडेसात) आणि सकाळी साडेआठपर्यंत १५६ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पाच तासांत ७८ मिलीमीटर पाऊस हा अतिवृष्टी मानला जातो. माळीणचे भौगोलिक स्थान पाहता गोळेगाव आणि डिंभेपेक्षा त्याठिकाणी अधिक पाऊस झाला असण्याची शक्यता आहे. माळीणमध्ये पाच तासांत १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. 

कमी कालावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे माळीणच्या डोंगरावरून पाण्याचे लोट वाहू लागले. उतारावरील भूजलाचे प्रमाण एकाएकी वाढले. मातीची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण झाली. मातीत जमा झालेल्या पाण्याला वाहून जाण्यास जागा न मिळाल्यामुळे मातीच्या ढिगासह पाण्याचा लोट गुरुत्वाकर्षणाने डोंगरमाथ्यापासून घसरून खाली आला आणि वाटेत येईल त्या सर्व गोष्टींचा त्याने नाश केला. मोठे वृक्ष, खडक, घरे, शाळा, माणसे, प्राणी सर्व काही त्या चिखलाच्या थरांखाली गाडले गेले. कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि मातीची भूरचना हीच या घटनेमागील मुख्य कारणे असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. 

पडकईचा आक्षेप अशास्त्रीय 
माळीणच्या घटनेला डोंगर उतारावरील शेती कारणीभूत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांतर्फे केली जात आहे. मात्र, शास्त्रज्ञ ती मानायला तयार नाहीत. माळीण गावापासून ५० मीटर उंचीवर भात शेती केली जात होती, तर त्या शेतीच्याही वर ९० मीटरवरून डोंगराचा भाग कोसळून खाली आला आहे. उलट पड्कईसाठी करण्यात आलेल्या पायरीसदृश सपाट भागामुळे चिखलाचा लोट गावावर येण्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला असे दिसून येत आहे. ज्या वावराच्या निर्मितीला या घटनेस कारणीभूत धरले जात आहे. त्या वावरालाही चिखलाने व्यापले असून, तेवढा चिखल गावावर न जाता काही घरांचे रक्षण झाले. मातीच्या डोंगरांमध्ये दरडीपासून रक्षण करण्यासाठी भूशास्त्रज्ञ डोंगर उतारावर पायऱ्या करण्याचा सल्ला देतात. तसेच, अशा भुरचनेत दरवर्षी ज्या दरडी कोसळतात त्या सर्व ठिकाणी शेती केली जाते असे नाही.  

वृक्षतोड हेही एक कारण काही जणांकडून दिले जात आहे. मात्र, माळीण, तसेच कोकणात या आधी घडलेल्या घटना पाहता. एकदा मातीत क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा झाले की, झाडांसह सगळा भाग वाहून खाली येतो असे तज्ञांचे मत आहे. माळीनच्या दरडीचा उगम डोंगर कड्याखाली झाडांच्याच भागात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. 

तातडीचा उपाय काय?
मोठा डोंगर आणि अतिवृष्टी या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे माणसाला शक्य नाही. माळीणसारखी अनेक गावे आंबेगावच्या खोऱ्यात डोंगरपायथ्याशी धोका घेऊन वसली आहेत. येथील भूरचना कमी अधिक प्रमाणात माळीणसारखीच आहे. हवामान खाते किंवा प्रशासन धोक्याची घंटा वाजवेल याची वाट न पाहता. ग्रामस्थांनी तास - दोन तास मुसळधार पाऊस सुरु राहिला तर, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे आणि तज्ञांच्या पाहणी नंतरच पुन्हा घरी परतावे. जीवासाठी एवढी कसरत करण्याला सध्यातरी त्यांच्यासमोर पर्याय नाही. 

३ टिप्पण्या:

  1. संदर्भासह स्पष्टकरीण देऊन लिहलेला हा माझ्या वाचनातला पहीला लेख. ईलेक्ट्रोनीक मिडीयातील उतावीळ लोकांनी हा जरूर वाचावा.

    उत्तर द्याहटवा
  2. शासनाने अशी ठिकाणे शोधुन त्या भागाचे पुन्ःवसन करावे जेणे करून अशा घटना टाळता येतील

    उत्तर द्याहटवा
  3. संदर्भासह स्पष्टकरीण देऊन लिहलेला हा माझ्या वाचनातला पहीला लेख. ईलेक्ट्रोनीक मिडीयातील उतावीळ लोकांनी हा जरूर वाचावा

    उत्तर द्याहटवा