शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

वेदनादायी पुरावा


   
एखादी नवी गोष्ट सर्वप्रथम आपल्याला दिसणे, एखाद्या सिद्धांताचा पहिला पुरावा आपल्याला मिळणे, निसर्गात नव्यानेच घडणारी एखादी घटना सर्वप्रथम जगासमोर आणणे हि गोष्ट विज्ञानाच्या अभ्यासकांसाठी किती आनंददायी असते. आठ वर्षांच्या प्रयत्नातून असाच एक पुरावा नुकताच हाती लागला. मात्र, निसर्गात घडणारी एक नवी प्रक्रिया जगासमोर आणल्याचे समाधान वाटण्यापेक्षा यातून वेदना अधिक होत आहेत. आणि 'अज्ञानात सुख' का असते हेही समजत आहे.
लोणार संशोधन आणि संवर्धन कार्यक्रमांतर्गत लोणार विवर आणि त्यातील खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी जानेवारी २०१० पासून खगोल विश्वच्या पुढाकाराने सर्वेक्षण प्रकल्प सुरु झाला. प्रत्येक ऋतूमध्ये लोणारमध्ये होणारे बदल अभ्यासून त्यातील मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण किती हे पाहण्यासाठी लोणारचे विविधांगाने निरीक्षण सुरु झाले. या प्रकल्पात पुण्यातील एनसीसीएस, आघारकर संशोधन संस्था आणि पुणे विद्यापीठातील संशोधकांसह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि निसर्ग प्रेमींनी उस्फुर्त सहभाग घेतला. प्रत्येकाच्या निरीक्षणांतून समोर आलेली मुख्य गोष्ट म्हणजे लोणार विवरामध्ये अद्यापही असे अनेक घटक आहेत, जे जगासमोर आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरात सर्वच विज्ञानशाखांना अजूनही संशोधनासाठी खूप वाव आहे.
या प्रकल्पांतर्गत एप्रिल २०११ मध्ये प्रथमच लोणारचे रात्रीचे निरीक्षण सुरु होते. १३-१४ जण रात्रीच्या अंधारात दबकत एकमेकांचा आधार घेत सरोवराच्या काठावरून पुढे सरकत होते. वाटेत वाघ महादेव हे वाटवाघळांनी वसती केलेले मंदिर लागले. दिवसा या मंदिरात शेकडोंच्या संख्येनी वाटवाघळे असतात. रात्री मात्र त्यांपैकी एकही जण मंदिरात नव्हते. थोडं पुढे जाऊन आम्ही सरोवराच्या जवळ गेलो. रात्रीच्या वेळी सरोवरातील शैवालांची वागणूक कशी असते ते पहायचे होते. टोर्चच्या प्रकाशात झूम मध्ये शूटिंग सुरु केले. त्याचवेळी महादेव गायकवाड हा शैवालांवर पीएचडी करणारा संशोधक विद्यार्थी सैम्पल्स घेत होता. त्याच ठिकाणी मी कॅमेरा झूम केला आणि पाण्याखाली काहीतरी वळवळताना दिसले. थोडावेळ निरखून पाहिल्यावर तिथे समूहांनी काही छोटेसे किडे असल्याचे आढळून आले. आठ वर्षांच्या आमच्या दौऱ्यांमध्ये आज पर्यंत लोणारच्या पाण्यात कोणताही जलचर आढळला नव्हता. लोणारच्या प्रचंड क्षारतेमुळे येथे असे जीव जगूच शकत नाहीत. मग हे किडे इथे कसे काय? कदाचित जमिनीवरचे किडे चुकून पाण्यात गेले असतील, किंवा हि त्यांची पाण्यातील एकमेव वसाहत असेल, असे समजून फक्त शूटिंग घेऊन आम्ही त्यांचे सैम्पल्स घेणे टाळले. विवरातून वर परतत असताना मात्र या किड्यांच्या विचारांनी पुरते घेरले होते. ते किडे लोणारच्या पाण्यात असे वावरत होते, जसे ते इथलेच आहेत. ते पाहुणे असावेत कि येथील नवे रहिवासी? पुण्याला आल्यावर काही तज्ञांना शूटिंग दाखवल्यावर ते गोड्या पाण्यातील बीटल असल्याचे समजले. आता जर ते बीटल इथले रहिवासी होत असतील तर, ते विवरामध्ये पुढील ऋतूमधेही  सापडणे आवश्यक होते.
पावसाळ्यात १५ ऑगस्टला केलेल्या सर्वेक्षणादरम्यान पश्चिमेकडून येणारे वारे जोरात होते. त्यामुळे सरोवराच्या काठावर लाटा आदळत होत्या. अशा अस्थिर पाण्यात ते किडे आढळणे शक्यच नव्हते. दरम्यान 'प्रोजेक्ट मेघदूत'निमित्त अमरावतीमध्ये असताना विद्यापीठातील ज्येष्ठ किटकतज्ञ डॉ. वानखेडे यांना त्या किटकांचे व्हीडिओ दाखवले. त्यांनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. हे किटक लोणारच्या पाण्यात सापडणे शक्यच नाही, मात्र जर ते या पाण्यात आले असतील, तर परिस्थिती गंभीर आहे असे त्यांनी सांगितले. त्या कीटकांचा शोध घेण्यासाठी एक - दोन ऑक्टोबरला लोणारचा तातडीचा दौरा ठरवण्यात आला. खगोल विश्वचे सहा निरीक्षक पुण्यावरून आणि अमरावतीवरून दोन पत्रकार यात सहभागी झाले. दोन ऑक्टोबरला सकाळी आठ च्या दरम्यान आम्ही विवरात उतरून रामगया मंदिरावरून सरळ जाणाऱ्या रस्त्याने सरोवरापर्यंत पोचलो. किनाऱ्यावरील पहिल्याच पॉईन्टवर पाण्यात निरखून पाहिल्या पाहिल्या तळाशी बीटल्स चा समूह खेळताना दिसला. तळाशी जमलेल्या अल्गीवरून सतत धावपळ करणारे हे छोटे किटक मधेच पाण्याच्या पृष्ठ भागावर येऊन ऑक्सिजन घेऊन जात होते. यावेळी आम्हाला त्यांचे सैम्पल्स घ्यायचे होते. मात्र वेगाने फिरणाऱ्या त्या छोट्या जीवांना पकडण्यासाठी आमच्याकडे नेट नव्हती. शेवटी ओंजळीने एक एक किटक पकडून बाटलीत टाकायला सुरुवात केली. एक किटक तळाशी बसलेला असताना त्याला पकडायला अलगद हात पाण्यात घातला, तर त्या कीटकाच्या बाजूला शैवालावर असणारा एक बारीकसा धागा पटकन आत गेला. तिथे असेच आणखीही पांढरे गवतासारखे उगवलेले दिसले. त्या प्रत्येक जवळ बोट नेल्यावर सगळेच धागे शेवला खाली लपले. मग अलगदपणे बाटलीच्या टोपणाने ते शैवालाच उचलले तेव्हा त्या धाग्याचे रहस्य समजले. त्या शैवालाखाली अळीसारखा एक जीव होता, ज्याची सोंड त्याने वर काढलेली होती. आता हा आणखी एक जीव. जे काही घडत होते, ते खरोखर थक्क करणारे होते. लोणार च्या पाण्यात आज पर्यंत अशा प्रकारचे जीव आम्ही कधीच पहिले नव्हते. दोन्ही जीवांची ५-६ सैम्पल्स आणि ते राहत असलेली शिवले आणि तेथीलच पाणी घेऊन आम्ही वर परतलो. पुण्याला येईपर्यंत जीव खालीवर होत होता. ती सैम्पल्स जगणे आवश्यक होते.
घरी पोचल्यावर सर्वप्रथम सैम्पल ट्यूब, बिकर वगैरे साहित्य विकत आणले. पाण्याची पीएच तपासली- ती १०.० होती. मग सगळे जीव वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये घेऊन मैक्रोवर शूटिंग केले. दोन्ही प्रकारचे त्यातील बहुतांश जीव जिवंत होते. शूटिंगमधून त्यांच्या हालचाली टिपल्या आणि त्यातून त्या जीवांनी जे काही दाखवले तेव्हाच हे लोणारचे नवे रहिवासी झाल्याचे स्पष्ट झाले. सोंड असणाऱ्या अळीचे शरीर पारदर्शक होते आणि आणि त्यातील सर्व भाग व्यवस्थित पाहता येत होते. एक गोष्ट आश्चर्य कारक होती, ती म्हणजे त्या अळीने खाल्लेले शैवालहि तिच्या पोटात स्पष्टपणे दिसत होते. तशीच तऱ्हा किटकाचीही तळाशी जमा झालेल्या शैवालाचे चर्वण करताना मधूनच वर झेप घेऊन ऑक्सिजन घेणारे बीटल्स कॅमेरामध्ये कैद झाले. गुगल वरून या दोन्ही जीवांची बरीच माहितीही काढली.
दुसऱ्या दिवशी दोन्ही जीवांचे सैम्पल्स घेऊन ज्येष्ठ प्राणी शास्त्रज्ञ डॉ. हेमंत घाटे यांच्या कडे गेलो. त्यांनी पाहता क्षणी दोन्ही जीवांचे आयडेंटीफिकेशन केले. अळीसदृश जीव म्हणजे दलदलीच्या प्रदेशात राहणाऱ्या 'एरीस्टेलीस' या माशीची 'लारवा' होती, तर दुसरा किटक म्हणजे 'कोरीग्झा' नावाचा 'बग'- एक पाणकिटक होता. डॉ. घाटे यांच्या म्हणण्यानुसार एरीस्टेलीस लारवा हि फक्त ड्रेनेज किंवा घाण पाण्यातच आढळते. लोणारच्या पाण्यात ती सापडली याचा अर्थ तेथे सिवेज येत असावे.. मी म्हटलं.. ''अगदी बरोबर, गेली अनेक वर्षे लोणार गावचे ड्रेनेज लोणार सरोवरात सोडले जात आहे.'' डॉ. घाटे म्हणाले,"हा त्याचाच परिणाम आहे. त्या ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणात ओरगानिक पदार्थ सरोवरात येऊन त्यावर जगणारे नवे जीव येथे येऊ लागले आहेत. आणि दुसरा कोरीग्झा हा एवढ्या क्षरातेच्या पाण्यात जगणे शक्य नाही. नक्कीच लोणारच्या पाण्याची क्षारता कमी होत आहे. ते म्हणाले, '' हे दोनच जीव तुम्हाला दिसले, असे जीव एकटे नसतात..त्यांच्या बरोबर असेच आणखीही २०-२५ वेगवेगळे जीव तेथे सापडतील. पुढच्या वेळेस माझे काही विद्यार्थी तुमच्या सोबत येतील आपण एकत्रित सर्व्हे करू. या जीवांचे लोणार मधील अस्तित्व म्हणजे तेथील जीव संथ बदलायला सुरुवात झाली याचा हा पुरावा आहे..''
डॉ. घाटे यांनी सांगितलेले दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे होते.. सरोवरात प्रमाणाबाहेर जमा होणारे ओरगानिक पाणी आणि सरोवराची कमी होणारी क्षारता या दोन्ही गोष्टी सरोवरात बाहेरचे जीव येऊन वसण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि हि दोन्ही कारणे मानवी हस्तक्षेपाचे थेट पुरावे आहेत. लोणार गावचे ड्रेनेजचे सरोवरात जमा होणारे पाणी सरोवरात ओरगानिक पदार्थ आणत आहे. आणि लोणार सरोवराजवळ बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे पाणी झिरपून सरोवरातील क्षारता कमी करीत आहे.
एकीकडे लोणारच्या पाण्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण झालेली सूक्ष्म जीवसृष्टी डोळ्यासमोर येते. अशनीच्या धडकेनंतर कोणत्याही प्रकारच्या जीवांसाठी प्रतिकूल बनलेल्या या विवरामध्ये गेल्या २०-२५ हजार वर्षांमध्ये नव्याने जीवसृष्टी निर्माण झाली. तिचा विकास अजूनही सुरूच आहे. या जीवसृष्टीच्या अभ्यासातून पृथ्वीवर जीव अवकाशातून आला का, याचेही उत्तर मिळू शकणार आहे.. पृथ्वीवर इतरत्र कोठेही नसलेली हि जीव सृष्टी संपूर्ण पृथ्विसाठीच एक ठेवा आहे..
दुसरीकडे डोळ्यासमोर येते लोणार गावचे तुंबलेले आणि सतत सरोवराच्या पाण्यात वाहणारे ड्रेनेज.. मग विचार येतो ..ते ड्रेनेज खरतर प्रतीक आहे.. मराठी माणसाच्या लोणारविषयी असणाऱ्या आस्थेचे आणि निष्क्रिय वांझोट्या सहानुभूतीचे.. या दोन नव्या जीवांचा शोध वेदना देतो तो या साठीच !!   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा