शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

स्पेक्ट्रम



दुपारी तीनची वेळ असेल. राउंडटेबलच्या एका बाजूला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि जीएमआरटी या महाकाय रेडिओ दुर्बिणीचे निर्माते डॉ. गोविंद स्वरूप, एनसीआरएचे संचालक डॉ. एस. के घोष, डॉ. गोपाल कृष्णन, डॉ यशवंत गुप्ता, डॉ. ईश्वर चंद्र, तरुण शास्त्रज्ञ डॉ. संदीप सिरोथिया असे सर्व रथी महारथी आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील निवडक मराठी- इंग्रजी वर्तमानपत्रांचे बातमीदार. आजची पत्रकार परिषद जीएमआरटीतर्फे प्रथमच राबवण्यात येणाऱ्या एका महत्वाकांक्षी सर्वेक्षणाबाबत होती. १५० मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर जीएमआरटीच्या ३० रेडिओ दुर्बिणींच्या साह्याने भारतातून दिसणाऱ्या ९० टक्के आकाशाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या शब्दात या ९० टक्के आकाशाचे रेडिओ नकाशे तयार करण्याचे काम सुरु असून अंतिमतः यातून सुमारे २० लाख रेडिओस्रोतांची नोंद होण्याची अपेक्षा आहे. यापैकी हजारो स्रोत असे असतील जे प्रथमच नोंदले जातील.. म्हणजेच विश्वातील हजारो नव्या रेडिओस्रोतांचा शोध. यामध्ये मृत आकाशगंगांचे अवशेष असतील, कृष्णविवरे असतील, पल्सार, सक्रीय आकाशगंगा असतील. हि सर्व माहिती इंटरनेटवरून विद्यार्थी, संशोधकांसाठी मोफत उपलब्ध असेल.. प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सिरोथियांनी प्राथमिक माहिती दिल्यावर प्रश्नोत्तरे सुरु झाली.
खरतर अशी टेक्नीकल माहिती समोर बसलेल्या एखाद- दुसऱ्या पत्रकारालाच समजली. कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी. हि माहिती सायन्सच्या विद्यार्थ्यालाहि समजली असतीच असे नाही. मग आर्ट्स, कॉमर्स करून आलेल्या मराठी पत्रकारांना या माहितीतून बातमी शोधणे म्हणजे महाकठीण. पण मिळालेली माहिती मग ती कोणत्याही विषयाची असो, आधी आपण समजून घेऊन मग ती आपल्या वाचकांना समजेल अशा भाषेत बातमीच्या स्वरुपात बसवण्याची किमया पत्रकारांना रोजच साधावी लागते. प्रश्न सुरु झाले.. एकाने विचारले, हे सर्व ठीक आहे.. यामध्ये सर्वसामान्यांच्या इंटरेस्टचं काय आहे? गोपाल कृष्णन म्हणाले, "विज्ञान, खगोलशास्त्राबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी हेच पुरे आहे, कि भारतातर्फे हे प्रचंड व्याप्तीचे सर्वेक्षण होत आहे.. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कॅलटेकसारख्या विद्यापीठांतून दररोज हि माहिती डाऊनलोड केली जात आहे. यातून लागणारे शोध हे महत्वाचे आहेतच पण, भारताचे या क्षेत्रातील स्थान दरवर्षी विशेष उंची गाठणार आहे. आजपर्यंत वैज्ञानिक माहितीसाठी आपण जगावर अवलंबून होतो..आता जग आपल्या माहितीचा आधार घेत आहे. याविषयीचे संशोधन प्रसिद्ध होईल त्या प्रत्येकवेळी जीएमआरटीचे नाव अधोरेखित होईल.''
दुसरा प्रश्न आला, 'याच फ्रिक्वेन्सीवर सर्वेक्षण करण्याचे कारण काय, आधी असे सर्वेक्षण झाले आहे का?'
यावर ईश्वर चंद्र म्हणाले, "या रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे घेतलेल्या प्रतिमांचे रीझोल्यूशन अधिक चांगले आहे. याआधी अमेरिकेतून झालेल्या सर्वेक्षणाच्या प्रतिमा आणि या सर्वेक्षणाच्या प्रतिमांची आम्ही तुलना केली असता, एकाच प्रतिमेत अनेक नव्या गोष्टी सापडल्या, ज्या त्यांच्या दुर्बिणीतून दिसल्या नव्हत्या.'' ते पुढे म्हणाले,''तुम्हाला विद्युत चुंबकीय लहरींचा 'स्पेक्ट्रम' माहित असेलच. गैमा रे, एक्स रे, इन्फ्रा रेड, दृश्य प्रकाश किरण,  रेडिओ लहरी अशा विविध लहरी विश्वातील विविध घटकांपासून निघत असतात. एकाच घटकापासून विविध लहरी उत्सर्जित होतानाही दिसतात. उदा. एक आकाशगंगा दृश्य किरणांद्वारे एका ठिपक्यासारखी दिसत असेल, तर त्याचवेळी तिच्याकडून येणाऱ्या रेडिओ लहरी त्या आकाशगंगेची व्याप्ती त्या ठिपक्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे दाखवतात. म्हणजेच डोळ्यांना दिसत नसणाऱ्या अशा अनेक पदार्थांचा समावेश त्या आकाशगंगेत असतो. जोपर्यंत त्या आकाशगंगेकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या लहरींचा आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत ती आकाशगंगा नेमकी कशी आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला दिसणारे विश्व फक्त दहा टक्के आहे, ज्यांच्या पासून प्रकाश किरण येतात.  उर्वरित ९० टक्के विश्व समजून घेण्यासाठी इतर लहरींचा अभ्यास करावा लागतो. प्रत्येक लहारीसाठी स्वतंत्र दुर्बिणी बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी तुलनेनी  अधिक तरंगलांबीच्या रेडिओ लहरींना पकडण्याचे काम जीएमआरटीद्वारे करण्यात येते."
स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न आला, मग खरे विश्व समजून घेण्यासाठी अशा सर्व लहरींचा एकत्रित अभ्यास करण्यात येतो का? यावर डॉ. चंद्र यांनी काही विदेशी अभ्यासकांचा दाखला देऊन होकारार्थी उत्तर दिले. याला जोड म्हणून मीहि भारताच्या 'एस्ट्रोसैट'ची माहिती दिली. हा उपग्रह इस्रोतर्फे पुढीलवर्षी अवकाशात सोडणे अपेक्षित आहे. हे जगातील पहिले उपकरण असेल, जे अवकाशातील एकाच घटकाच्या एकाचवेळी विविध लहरींच्या साह्याने नोंदी घेईल. यामुळे त्या घटकाचे विविध पैलू त्याच्या एकाच दर्शनातून समोर येतील.. जीएमआरटीचा महत्वाकांक्षी सर्वेक्षणाचा प्रकल्प असो किंवा इस्रोचा 'एस्ट्रोसैट' भारताने या क्षेत्रात आता मोठी मजल मारलेली असून, त्यातील वैज्ञानिक माहितीसाठी जगाला आपल्याकडे येण्यास भाग पडले आहे.. आणखी काही प्रश्नोत्तरे झाली आणि प्रेस कॉन्फरन्समधून आम्ही बाहेर पडलो.. बाहेर पडताना एकजण म्हणाला, 'खूप दिवसांनी असं वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं.. सवय गेली होती चांगलं ऐकायची'.. त्याच्याकडे आधी क्राईम होतं.. नुकतच सायन्स- टेक्नोलोजी बिट आलय..  

पार्किंगमधून गाडी काढता काढता सोबतच्या बातमीदार मित्राला विचारलं, आज आणखी काय?..." आज बराच लोड आहे.. सकाळी विद्यापीठ होतच, आत्ता जीएमआरटी, थोड्या वेळानी रामदास आठवले, रावसाहेब कस्बेंचा 'सांस्कृतिक आव्हाने' विषयावर कार्यक्रम आहे.. कदाचित नाईटशिफ्टहि करावी लागेल..त्यामुळे अण्णा, पाऊस, क्राईम.." गाडीला किक मारून तो निघून गेला. मीहि गाडी सुरु करून निघालो.. वाटेत ठिकठिकाणी आठवलेंचे फ्लेक्स दिसत होते. मेनगेटच्या बाहेर अण्णांना पाठिंब्यासाठी रैलीची सुरवात झाली होती... एकाचवेळी एकाच आवारात किती भिन्न गोष्टी घडत होत्या.. सर्वांचे एकत्रित अस्तित्व सत्य!
गाडीवरून येता येता माझ्या मनात प्रेस कॉन्फरन्समधल्या त्या सगळ्या लहरी आणि बाहेर पडल्यावर या मित्राने सांगितलेल्या वेळापत्रकाने एकाचवेळी गर्दी केली. एकाच फेरीमध्ये जीएमआरटीची वैज्ञानिक माहितीची प्रेस कॉन्फरन्स, आठवलेंच राजकीय भाषण, अण्णांच्या समर्थनाची रैली, विद्यापीठ अशा भिन्न विषयांची माहिती घेऊन त्या- त्या मूडच्या बातम्या लिहिणं किती जिकिरीच काम. पण त्या सर्वांची दखल घेतली तरच वर्तमानपत्रातून त्या दिवसाचं एक परिपूर्ण चित्र तयार होतं. कोणतही एकच चित्र मांडलं तर ते अपूर्ण असेलच, पण तेच खरं मानलं तर गैरसमजहि होऊ शकतो.... अगदी आपल्याला दृश्य स्वरुपात दिसणारं विश्व हेच खरं असं मानण्यासारख.. यातून विविध लहरी एकाचवेळी पकडून विश्वाच्या वर्तमानाचं परिपूर्ण चित्र तयार करणाऱ्या 'एस्ट्रोसैट'ची आणि भिन्न विषयांची माहिती एकाचवेळी मिळवून मानवी वर्तमानाचं विविधांगी चित्रण करणाऱ्या पत्रकाराची नकळतपणे तुलना झाली..
अण्णांचा अपडेट पाहण्यासाठी घरी आल्यावर टीव्ही सुरु केला तेव्हा नेमकी आरडाओरड करून पहिल्या पासूनच या विषयाचं एकांगी दर्शन घडवणारा चैनल लागला.. त्यावरील चर्चा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर गैलिलीओच्या काळातील पृथ्वीकेंद्रित विश्व उभं राहिलं..