राज्याच्या पश्चिम भागात रविवारची (५ एप्रिल) सकाळ उजाडली तीच धूसर- धुकेसदृश हवेसोबत. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भर उन्हाळ्यात दुपारी पार्किंग लाईट लावून वाहने धावतायत असे दुर्मिळ दृश्य यावेळी पाहायला मिळाले. घाटात कोणत्याही दिशेला पाहिले तरी एक किलोमीटर पलिकडचे सर्वच अस्पष्ट. हे धुके किंवा धुराचे प्रदूषण नसून, चक्क अखाती देशांतून आलेले धुळीचे वादळ असल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी लगेच स्पष्ट केले.
या घटनेच्या चार दिवस आधी महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून साधारण दोन हजार किलोमीटरवर सौदी अरेबियाच्या प्रदेशात हे धुळीचे प्रचंड वादळ तयार झाले. नारिंगी, पिवळ्या रंगाच्या धुळीचे दाट आच्छादन पसरल्यामुळे एक एप्रिलला तेथील दैनंदीन व्यवहार ठप्प झाले. दुसऱ्याच दिवशी- दोन एप्रिलला पूर्वेकडे सरकत धुळीच्या लोटांनी दुबई व्यापली. 'सध्या दुबईत मंगळावर असल्याचा भास होत आहे,' अशा प्रकारच्या ट्वीट आणि स्टेटसमधून अनेकांनी या नारिंगी हवामानातील सेल्फीही अपलोड केले. अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे सर्व प्रकारची वाहतूक जवळजवळ ठप्प झाली. काही भागांत संपर्क यंत्रणाही कोलमडली. दुबईत दिवसभरात अनेक अपघातही नोंदले गेले. पुढील काही दिवस श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन अनेकांनी डॉक्टरांकडे रांगा लावल्या.
बहुतांश भाग वळवंटाचा असल्यामुळे धुळीची वादळे अखाती देशांना नवी नाहीत. मात्र, इतक्या तीव्रतेचे वादळ गेल्या काही वर्षांत बघितले नसल्याचे निरीक्षण दुबई, सौदी अरेबियातील अनेकांनी नोंदवले.
पुढील तीन दिवसांत पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांत मिसळून धुळीचे हे लोट अरबी समुद्र ओलांडून महाराष्ट्राच्या उत्तर आणि पश्चिम भागांत पोचले. पाच आणि सहा एप्रिलला धुळीने पश्चिम महाराष्ट्राची हवा व्यापली. या घटनेची शास्त्रीय नोंद इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रोपिकल मेट्रीओलॉजीच्या (आयआयटीएम) सफर प्रकल्पातील मुंबई आणि पुण्यातील केंद्रांनी घेतली. मुंबईतील केंद्रामध्ये दोन एप्रिलला पीएम २.५ (पार्टीक्युलेट मैटर - २. ५ मायक्रोन किंवा त्यापेक्षा कमी आकारमानाचे सूक्ष्मकण) कणांचे प्रमाण एक घनमीटर हवेत ७० मायक्रोग्राम होते. ते पाच एप्रिलला १४२ झाले. त्याचप्रमाणे पुण्यात सहा एप्रिलला पीएम १० आणि पीएम २.५ कणांचे प्रमाण तब्बल २०० मायक्रोग्रामच्यावर पोचले. हवेतील या सूक्ष्मकणांनी धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे तज्ञांनी सावधानतेचा इशाराही दिला. दरम्यान, हवेच्या प्रवाहासोबत धुळीचे लोट सात एप्रिलला दक्षिणेकडे कर्नाटक, तर पूर्वेकडे विदर्भापर्यंत पोचले. मात्र त्यांची हवेतील घनता कमी असल्यामुळे त्या भागांत त्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. मुंबई- पुण्यातील हवेत अद्यापही वादळातील धुळीचे कण असल्याचे सफरच्या नोंदींवरून दिसून येत आहे.
अशी निर्माण होतात धुळीची वादळे
धुळीची वादळे हे उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या लगतच्या प्रदेशांतील (सबट्रोपिकल रिजन) हवामानाचे वैशिष्ट्य मानले जाते. अटलांटिक समुद्रापासून चीनपर्यंतच्या पट्ट्यादरम्यान आफ्रिकेचे वाळवंट, अरेबियाचे वाळवंट, भारतातील थरचे वाळवंट, मंगोलियामधील गोबीचे वाळवंट ही धुळीची वादळे निर्माण होणारी प्रमुख ठिकाणे मानली जातात. कोरडे हवामान आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण ही धुळीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी पहिली अवस्था. अशा प्रदेशांतून जमिनीलगत वेगाने वारे वाहत असतील तर जमिनीवरून मातीचे कण विलग होऊन त्यांपासून रेतीची आणि धुळीची टप्प्याटप्प्याने निर्मिती होते. जमिनीची धूप होणारी ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहिल्यास त्यांपासून पुढे वाळवंटाची निर्मिती होते.
या प्रदेशांतून वाऱ्यांच्या साह्याने धुळीचे मोठ्या प्रमाणात जमिनीला समांतर किंवा लंबरूप दिशेने वहन सुरु झाले त्याला धुळीचे वादळ म्हटले जाते. अशा वाऱ्यांची निर्मिती ही वाळवंटाच्या आसपासच्या प्रदेशांत दोन विरुद्ध दाबाची क्षेत्रे तयार झाल्यास होऊ शकते. अशा वेळी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहू लागतात आणि त्यांसोबत धुळीचे लोटही वाहिले जातात. इराकच्या प्रदेशातून अरेबियाच्या दिशेने अशाप्रकारे सातत्याने धुळीची वादळे वाहत असतात. दुसऱ्या स्थितीत, शुष्क प्रदेशांत उन्हाळ्यात जमिन मोठ्या प्रमाणात तापून त्यालगतची हवा वातावरणात वर चढत जाते आणि तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या हवेसोबत धुळीचे लोटही उसळून हवेच्या वरच्या थरापर्यंत म्हणजे सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पोचतात. अशा प्रकारचे धुळीचे लोट वातावरणात उंचावरून पूर्व किंवा पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमध्ये मिसळल्यास ते हजारो किलोमीटर दूरपर्यंत प्रवास करू शकतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पोचलेले धुळीचे लोट अशाच प्रकारे पश्चिमेकडील वाऱ्यांच्या साह्याने प्रवास करून आले होते. अशाच प्रकारचे धुळीचे लोट चीनपासून निघून प्रशांत महासागर पार करून अमेरिकेच्या पश्चिम भागांत पोचल्याच्याही नोंदी आहेत.
धुळीच्या वादळांचे बरे- वाईट परीणाम
जमिनीवर असणारे रेतीचे आणि धुळीचे साठे वाऱ्याच्या साह्याने वातावरणात उसळले की त्याला धुळीचे वादळ म्हटले जाते. अशा वादळांची व्याप्ती अगदी स्थानिक पातळीपासून आंतरखंडीयही असू शकते. धुळीचे हे कण काही मायक्रॉनचे असतात (एक मायक्रॉन = एक मिलीमीटरचा हजारावा भाग). अत्यंत हलके असल्यामुळे हे सूक्ष्मकण हवेत बरेच दिवस तरंगू शकतात. या कणांमध्ये सर्वसाधारणपणे सिल्टचे कण (आकार- ०.००२ मिमी ते ०.५ मिमी) आणि क्लेचे कण (आकार- ०.००२ मिमीपेक्षा कमी) असतात. पण त्यांचा आधार घेऊन त्यावर सूक्ष्मजीवही तग धरतात.
मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर परीणाम: असे सूक्ष्मकण श्वासावाटे फुफ्फुसात गेले तर अस्थमा, कर्करोग, तसेच हृदयविकारही होऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. मानवी वायू प्रदूषणातूनही असे कण हवेत मिसळले जात असल्यामुळे धुळीचे वादळ नसले तरी शहरांमध्ये अशा सूक्ष्मकणांपासून मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्याला धोका असतोच.
वनस्पती आणि पिकांवर परीणाम: वादळांमधून उसळलेल्या धूळीचा थर पानांवर बसल्यामुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा निर्माण होतो आणि पिकांची योग्य वाढ होत नाही. तसेच या थरांमुळे तापमान वाढून पिके सुकूनही जाऊ शकतात. वादळांच्या काळात रेतीचा मारा बसून फळा- फुलांना त्याचा तडाखा बसतो. धुलीकणांसोबत कीडही येत असल्यामुळे त्यांपासून पिकांना रोगाचीही लागण होऊ शकते. रेती मिश्रीत धुळीचे थर जमिनीवर साचल्यास जमिनीची गुणवत्ता बदलते. या सर्वांपासून मोठे आर्थिक नुकसानही संभवते. अर्थात वादळाच्या तीव्रतेवर हे अवलंबून आहे.
साथीच्या रोगांचे वाहक: हवेतील जिवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ धुलीकणांवर होत असल्याचे दिसून आले आहे. एका प्रदेशातील सूक्ष्मजीव या वादळांच्या साह्याने दुसऱ्या प्रदेशात जाऊन तिथे साथीचे रोग पसरवू शकतात. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या फैलावाला नियंत्रित करणे अशक्यप्राय असते.
समुद्री जीवांसाठी लाभदायक: धुळीच्या वादळांमधून अनेक खनिजांचे सूक्ष्मकणही वाहिले जात असतात. या धुळीमधील लोहाचा वापर करून सुमुद्रातील सायनोबैक्टेरीया हवेतील नायट्रोजनचे अमोनियम आणि नायट्रेटमध्ये रुपांतर करतात. जे समुद्रातील वनस्पती आणि प्राण्यांसाठी जीवनसत्त्व म्हणून लाभदायक ठरते. एकप्रकारे समुद्री जीवांना आवश्यक पोषकद्रव्ये पुरवण्याचे काम धुळीची वादळे करीत असतात.
हरीकेनवर काही प्रमाणात अंकुश: उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानातून अटलांटिक समुद्रात हरीकेन ही चक्रीवादळे तयार होत असतात. मात्र, धुळीच्या वादळांच्या दरम्यान सूर्याकडून खालपर्यंत येणारी उष्णता रोखली जाते. यामुळे समुद्राचे तापमान काही प्रमाणात कमी होऊन हरीकेन निर्मितीची प्रक्रिया मंदावते. अशा काळात निर्माण होणारी चक्रीवादळे कमी तीव्रतेची असतात असेही अभ्यासातून समोर आले आहे.
महाराष्ट्रातील धुळीच्या वादळाचा अभ्यास: उत्तर भारतात थरच्या वाळवंटामुळे उन्हाळ्यात धुळीची वादळे अनेकदा निर्माण होत असतात. मात्र महाराष्ट्र उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे धुळीची वादळे ही हवामानशास्त्रीय घटना आपल्यासाठी दुर्मिळ आहे. या आधी २२ मार्च २०१२ ला पुण्या- मुंबईत धुळीचे लोट आल्याची नोंद झाली होती. यंदा मात्र त्याची तीव्रता बरीच जास्त होती. अशा घटनांच्या पूर्वीच्या शास्त्रीय नोंदीही सहजतेने उपलब्ध नाहीत. आयआयटीएमच्या सफर प्रकल्पांतर्गत धुळीच्या वादळाच्या काळातील पुणे आणि मुंबईतील हवेच्या नोंदी घेण्यात आल्या असून, पुण्यातील मायक्रोबिअल कल्चर कलेक्शनच्या (एमसीसी) वतीने हवेचे नमुने जमा करण्यात आले आहेत. या धूळमिश्रित हवेत कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत याचा अभ्यास एमसीसीतर्फे करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे उत्तर भारतात घडणारी ही घटना महाराष्ट्रात कशी घडली, त्यामागे पश्चिमेकडील वाऱ्यांची काय भूमिका आहे याचा अभ्यास ज्येष्ठहवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी करीत आहेत. पुण्यातील सेंटर फॉर सिटीझन सायन्सतर्फे (सीसीएस) पाच ते आठ एप्रिल दरम्यान पुणे ते लोणावळा भागातून या घटनेच्या शास्त्रीय नोंदी घेतल्या. यामध्ये हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदींप्रमाणेच, नासाच्या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचे संकलन आणि धूळमिश्रित हवेचे नमुने जमा करण्यात आले. धुळीच्या वादळानंतर निर्माण झालेले ढग आणि त्यानंतर पडणाऱ्या पावसाचाही अभ्यास सीसीएसतर्फे करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा