सोमवार, २५ जुलै, २०११

प्रोजेक्ट मेघदूत: 'महाराष्ट्रातील मॉन्सून'



'महाराष्ट्रातील मॉन्सून' 

पाहता पाहता पावसाळा मध्यावर येऊन ठेपला. मॉन्सूनच्या पहिल्या वाऱ्यांचे स्वागत करायला आम्ही पश्चिम घाटाकडे निघालो या घटनेला दोन महिने झाले. २९ मे रोजी केरळमध्ये आलेले नैऋत्य मोसमी वारे ४१ दिवसांनी ९ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापून पाकीस्तानात पोचले. या वाऱ्यांनी समुद्रावरून आणलेल्या ढगांखालून, त्यांच्याच वेगाने पश्चिम घाटातून आठवडाभर सहप्रवासी म्हणून मनसोक्त फिरलो. पावसाचा - निसर्गाचा संवाद ऐकला, नवनिर्माणाचे नाजूक क्षण जवळून अनुभवले, सामान्यांच्या जीवनावरील परिणाम पाहिला, बदलत्या हवामानातील बदलते व्यवहार अभ्यासले. आपल्याबरोबर नवा ऋतू आणणाऱ्या या वाऱ्यांनी निसर्गात मारलेले रंगेबिरंगी फटकारे त्यांच्याच स्वभावाच्या छटा दर्शवत होते. मॉन्सूनच्या रंगांची उधळण अजूनही सुरूच आहे. कोंब, पालवीचा आषाढ मागे सरून मुक्त बहरणारा श्रावण दारात उभा आहे. 


'प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या सिझनचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी यापेक्षा कोणता वेगळा मुहूर्त हवा? ऊन- पावसाच्या लहरी लपंडावाबरोबर मॉन्सून आणि महाराष्ट्राचे नाते उलगडण्याचा प्रयत्न या प्रवासातून करण्यात येणार आहे. विविध विभागांनुसार पावसाच्या बदलत्या वितरणाचा महाराष्ट्रातील निसर्गावर, लोकांच्या दैनंदिन जीवनावर, शेतीवर, संस्कृतीवर झालेला परिणाम अभ्यासणे हे या टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट. चार महिने धोक्याच्या सूचना ऐकून हताश झालेले कोकणातील मच्छीमार, पश्चिम महाराष्ट्रातील सधन बागायती शेतकरी, सतत आत्महत्येचा पर्याय मनात घेऊन वावरणारा विदर्भातील शेतकरी, चमत्कारी पावसाची अपेक्षा ठेऊन आकाशाकडे डोळे लावून असणारा मराठवाड्यातील शेतकरी यांच्याशिवाय मॉन्सूनचे बदलते रंग कोण व्यक्त करू शकेल? राज्याच्या सर्व विभागांत जाऊन त्या विभागाच्या नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मॉन्सूनची नेमकी भूमिका याचे स्केच प्रवासाशेवटी रेखाटले जाण्याची अपेक्षा आहे. अर्थात महाराष्ट्रातील पावसाच्या परिपूर्ण चित्राचे रंग पुढील पाच वर्षांत यथावकाश भरले जातीलच.

एक ऑगस्टपासून सर्वप्रथम कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मध्य- पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र- विदर्भ आणि शेवटी मराठवाडा असा साधारण प्रवासक्रम आहे. हा प्रवास आवश्यकतेनुसार कार, बस, रेल्वे, बाईक, पायी असा करण्याचे ठरविले आहे. सरसकट महिनाभर सुट्टी मिळणे अवघड असल्यामुळे विविध टप्प्यांमध्ये आपल्या सोयीनुसार सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. मॉन्सूनवर (किंवा पावसावर) प्रेम असणारे, धावपळ सहन करू शकणारे, निसर्ग तसेच लोकांविषयी कुतूहल असणारे आणि या सर्वासाठी आपापला खर्च करण्यास तयार असणारे कोणीही यात सहभागी होऊ शकतात. सह्याद्री- दख्खनशी मॉन्सूनचा संवाद 'रंग मॉन्सून'चे मधून आपल्या समोर उलगडत राहीलच.

शनिवार, २३ जुलै, २०११

पुन्हा तारकांच्या विश्वात..



ओळखीच्या दगडी इमारतीच्या मधल्या चौकातून गोलाकार वळणे घेत जाणाऱ्या जीन्याची एक एक पायरी काठीने टेकत शेवटच्या मजल्यावर पोचायला बराच वेळ लागला. मुला- नातवंडांचा आधार घेत वयोवृद्ध आजी आजोबा अखेर शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या पांढऱ्या घुमटाखाली विसावले. दरवाजा बंद झाला, तसे घुमटाचे लालसर- निळ्या आकाशात रुपांतर झाले. कृत्रिम संधिप्रकाश अंधुक होत असतानाच आकाशात अस्पष्ट ठिपके चमकू लागले. संधिप्रकाश जाऊन पूर्ण काळोख पसरला.. तसे संपूर्ण आकाश तेजस्वी चांदण्यांनी व्यापले. मार्गदर्शकाचे बोल कानावर पडत होते.. सात ताऱ्यांचा तो सप्तर्षी.. चार ताऱ्यांच्यामध्ये तीन ताऱ्यांची रेषा.. ते मृग नक्षत्र.. तासाभरात नकळतपणे सर्वजण ५० वर्षांपूर्वीच्या दुनियेत फिरून आले.. ५० वर्षात किती बदल झाले.. पण आकाश तेच आणि ताऱ्यांचे तेजही तेच..उपस्थितांपैकी प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांमध्ये चांदण्यांनी भरलेले ते आकाश साठवून घेत होता.. आशिया खंडातील पहिल्या तारांगणाचा मान असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रोडच्या कुसुमबाई मोतीचंद तारांगणाचे आकाश २० वर्षांनी पुन्हा ताऱ्यांनी चमकले तेव्हा माजी विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
एकेकाळी पुण्यातील आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या या तारांगणाने सलग ३६ वर्षे देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना तारकांच्या विश्वाची सफर घडवत वैज्ञानिक संस्कार केलेले. पुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा झगमगाट घेऊन आलेली देशभरातील इतर तारांगणे गर्दी खेचत असतानाच प्रोजेक्टरचा मुख्य दिवा बंद पडण्याचे निमित्त झाले आणि या तारांगणाचा लोखंडी दरवाजा १९९० मध्ये बंद झाला.. तो थेट २० वर्षांनीच उघडला. २००९ हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष होते. त्या निमित्ताने हे ऐतिहासिक तारांगण पुन्हा सुरु व्हावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही सदस्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. देशभरतील तज्ञांना, खगोल अभ्यासकांना पाचारण करण्यात आले. मात्र तारांगणाच्या डोममध्ये प्रवेश करताच ६० वर्षे जुन्या प्रोजेक्टरची अवस्था पाहून सर्वांनीच 'अशक्य!. काहीही होऊ शकत नाही' असेच उत्तर दिले. नवी यंत्रणा बसवायचाही विचार झाला, तर कोटेशन्स होती ६० लाखांपासून ३ कोटींपर्यंत. मात्र काही झाले तरी पुण्यातले एकमेव तारांगण सुरु करायचेच असे ठरवलेल्या या सदस्यांना शेवटी पराग महाजनी हे खगोल अभ्यासक येऊन मिळाले आणि खरोखर अशक्याचे शक्य झाले.

असे झाले पुनरुज्जीवन 
महाजानींच्याच भाषेत सांगायचे झाले तर, आम्ही सर्वप्रथम डोममध्ये प्रवेश केला, तसा धुळीमुळे ठसका लागला. अनेक वर्षे बंद असल्यामुळे जळमटे आणि पालींचे साम्राज्य होते. सर्वप्रथम ते सर्व साफ करून घेतले. डोमच्या मधोमध एका लाकडी टेबलवर ६० वर्षे जुना स्पिट्झ लैबोरेटरीचा मोठा प्रोजेक्टर अक्षरशः पुराण वस्तूसारखा गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या अवस्थेत आढळून आला. जवळ जाऊन एक एक भाग तपासायला सुरवात केली, तर गंजल्यामुळे सर्व भाग जाम झालेले. अथक प्रयत्नांनी सर्व भाग वेगळे केले. स्पिरीट आणि कापसाच्या साह्याने अनेक तास घासल्यावर प्रोजेक्टरचे खरे रूप दिसायला लागले. काही भाग जळालेले, काही गंजून बंद पडलेले, काही भाग असे होते, की त्यांचे नेमके काम काय हेच समजत होते. ६०- ७० वर्षांपूर्वी तयार झालेल्या या प्रोजेक्टरची आणि त्याच्या सुट्या भागांची निर्मिती बंद होऊनही चार दशके झाली असतील.
प्रोजेक्टर साफ केल्यावर सर्वप्रथम आम्ही त्याच्या वायरिंगची व्यवस्थित कागदावर आखणी करून घेतली, त्यावरून प्रत्येक भागाचे कार्य कसे चालते हे समजू लागले. दरम्यान, इंटरनेटद्वारे जगभरातील तारांगणतज्ञांशी संपर्क साधून त्यावेळच्या तारांगणान्ची माहितीपत्रके मागून घेतली. शक्य तेवढे वायरिंग बदलायचा प्रयत्न केला. पण जुन्या पद्धतीचे सोल्डरिंग काढायला थेट ईंडस्ट्रीयल गन आणावी लागली. काही सुटे भाग कोठेही मिळेनात तेव्हा त्याची डिझाइन्स तयार करून ते नव्याने करून घेतले. प्रोजेक्टरवरचे ताऱ्यांचे सर्व ठिपके बुजलेले होते. ते साफ करून घेतलेच, पण ताऱ्यांच्या रंगांनुसार आवश्यक त्या ठिपक्याला ठराविक रंगही दिले. त्यावेळच्या मोटर आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीची कोणी खात्री देईनात. पण अनेक दुकाने पालथी घातल्यावर काही जणांनी आमची अडचण समजून घेतली आणि कौशल्याने अनेक वर्षे बंद असणारे भाग सुरु करून दिले. या कामात मॉडर्न ऑप्टिक्सच्या गानू, अत्यंत क्लिष्ट मर्क्युरी स्वीचसाठी श्री करंदीकर, मोटरसाठी खोले, ट्रान्सफॉर्मरसाठी भोपटकर आदी पुणेकरांची मदत झाली. आणि पुण्याची शान असणारा हा प्रोजेक्टर खऱ्या अर्थाने पुणेकरांनीच सुरु केला. 

स्पिट्झ प्रोजेक्टरचा इतिहास 
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे रहणाऱ्या आर्मांड स्पिट्झ या पेपरविक्रेत्याला १९३६ च्यादरम्यान एके दिवशी त्याच्या मुलीने आकाशातील तार्यांविषयी काही प्रश्न विचारले. तिला उत्तरे देण्यासाठी आर्मांड याने पुठ्ठ्यापासून काही मॉडेल तयार केली. त्यातच सुधारणा करता करता त्याने गोलाचा उपयोग करून तारांगणाचा प्रोजेक्टर बनवला. मुलीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच, पण प्रोजेक्टरमुळे हा विषयही सोप्या पद्धतीने मुलांसमोर मांडता येऊ लागला. त्याचे कार्यक्रम गर्दी खेचू लागले. एकदा त्याचा शो बघण्यासाठी स्वतः अल्बर्ट आईंस्टाईन आले. त्यांनी त्या प्रोजेक्टरमधील भौमितिक त्रुटी दाखवून देतानाच त्या ऐवजी १२ पंचकोन वापरून डिझाईन सुधारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार स्पिट्झ याने 'डोडेका हेड्रोन' प्रकारचा नवा प्रोजेक्टर विकसित केला. या प्रोजेक्टरला मोठे यश आले. त्यातून त्याने स्वतःची कंपनी सुरु करून सुमारे १५० 'डोडेका हेड्रोन' जगभरात विकले. त्यापैकी १९५४ मध्ये आशिया खंडात पाहिला प्रोजेक्टर पाठवला, तो पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. आईंस्टाईन यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला चालू स्थितीतील जगातला हा एकमेव प्रोजेक्टर आहे.
या प्रोजेक्टरमधून साध्या डोळ्यांना दिसणारे सर्व तारे, पाच ग्रह, आयनिकवृत्त, सूर्य- चंद्राची स्थिती, पृथ्वीचा नकाशा अशा सर्व गोष्टी ३० फुट व्यासाच्या डोमवर दाखवता येतात. इलेक्ट्रोनिक्स युगाच्यापूर्वी याची निर्मिती असल्यामुळे त्याची रचना पूर्णपणे मेकॅनिकॅल आणि इलेक्ट्रिकल आहे. हेच त्याचे वैशिष्ट्य असून, त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्यही आहे. दुरुस्त झालेल्या स्थितीतील हा प्रोजेक्टर पुढील किमान २० वर्षे तरी कोणत्याही मोठ्या बीघाडाशिवाय सुरु राहील असा दावा महाजनी करतात.

न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाचा इतिहास
राष्ट्रीय शिक्षणाची परंपरा असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. ऐतिहासिक नानावाड्यातून न्यू इंग्लिश स्कूलचे टिळक रस्त्यावरील नव्या इमारतीत स्थलांतराचे निश्चित झाले, त्याचवेळी ही इमारत वैशिष्ट्यपूर्ण असावी असा आग्रह प्राचार्य पु. ना. वीरकर यांनी धरला. त्यांच्याच पुढाकाराने शाळेची 'वाय' आकाराची इमारत आणि त्यावर मध्यभागी डोम अशी रचना करण्यात आली. ३० फुटी व्यासाच्या या डोममध्ये तारांगण सुरु करण्याचा ठराव डिईएसने पारित केला. त्यासाठी देशा- विदेशात प्रतिनिधी पाठवून प्रोजेक्टर्सची पाहणी करण्यात आली. मोतीचंद शाह यांनी दिलेल्या ५० हजार रुपयांच्या देणगीतून स्पिट्झ प्रोजेक्टर आणून १९५४ मध्ये हे तारांगण सुरु झाले. त्यावेळी आशिया खंडातील हे पहिलेच तारांगण होते.
नव्याने तारांगण सुरु करण्यात मोलाचा वाटा असणारे न्यू इंग्लिश स्कूलचे विज्ञान शिक्षक विनायक रामदासी यांच्या माहितीनुसार, १९५४ ते १९९० या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल तारांगणाचे शो गुरुवार, शुक्रवार आणि सुटीच्या दिवशी अखंड सुरु होते. फक्त पुण्यातूनच नाही, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली येत असत. प्रा. गिझरे, प्रा. पाठक, प्रा. विनायक जोशी आदी मंडळींनी तारांगणाद्वारे हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना आकाशदर्शन घडवले होते. 

पुन्हा तारकांच्या विश्वात
महाजनी आणि रामदासी यांच्याबरोबर तारांगण समितीचे सचिव दिलीप कोटीभास्कर, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रा. एस. जी. कुलकर्णी, तंत्रज्ञ हरीभाऊ पवार तसेच एकनाथ बुरसे, प्रल्हाद शिंदे आणि सु. भ. मुंडे या तीन मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांमुळेच तारांगणाला पुन्हा पूर्वीचे दिवस येऊ शकले. येत्या काळात तारांगणाला वातानुकुलीत करण्याबरोबर रेलिंगच्या नव्या खुर्च्या बसवण्याचा डिईएसचा विचार आहे. त्याचप्रमाणे खगोल शास्त्राच्या दालनाची निर्मिती, विद्यार्थी आणि हौशी नागरिकांसाठी अभ्यासक्रम, नियमित शोही नियोजनात आहेत.   
 मागीलवर्षी दसऱ्याचा मुहूर्त साधून सुरु झालेले हे ऐतिहासिक आणि पुण्यातील एकमेव तारांगण आता पुन्हा गर्दी खेचू लागले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी तारांगणाचे १२ शो झाले असून, चंद्रग्रहण आणि पिधनाच्यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगा, त्यांचे ग्रह- ताऱ्यांचे आकर्षण, कुतूहलाने विचारलेले प्रश्न यामुळे तारांगणाला जिवंतपणा आला आहे. गेली दोन दशके फक्त इतिहास सांगणारा डोम पुन्हा विज्ञान शिकवू लागला आहे!

-----------------------------------------
तारांगणाच्या शोची नोंदणी  
तारांगणाचे शो सध्या फक्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून, एका वेळी १०० विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश दिला जातो. ११ ते ६ या शाळेच्या वेळेच्या आधी आणि नंतर हे शो होतात. तारांगणाच्या शोसाठी नोंदणी करण्यासाठी शाळांनी २४३३६०२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------------------------------------
विद्यार्थीदशेत  डॉ. नारळीकरांचीही  भेट         
अनेक मान्यवर आपल्या विद्यार्थी दशेत न्यू इंग्लिश स्कूलच्या तारांगणाला भेट दिल्याचे आवर्जून सांगतात. त्यापैकी सर्वात महत्वाचे नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ- डॉ. जयंत नारळीकर. बनारसमध्ये बीएस्सी केल्यावर सुट्टीसाठी पुण्यात आले असताना डॉ. नारळीकर यांनी १९५७ मध्ये तारांगणाला भेट दिली होती. प्रथमच अंधारात कृत्रिम तारे बघून त्यावेळी या विषयाबद्दल कुतूहल वाटल्याचे डॉ. नारळीकर सांगतात. 'हे तारांगण मला त्या आधी १० वर्षे म्हणजेच शालेय वयात पाहायला मिळाले असते, तर खगोलशास्त्राविषयी तेव्हाच जिज्ञासा निर्माण होऊन मी त्या दृष्टीने तयारी सुरु केली असती. पुढे आयुष्यात जगभरातील अनेक अत्याधुनिक तारांगणे पाहायला मिळाली. मात्र, न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण पाहताना मनात निर्माण झालेली उत्सुकता आणि कुतूहल काही औरच होते,' असे त्यांनी म. टा.शी बोलताना सांगितले.

- मयुरेश प्रभुणे 
रविवार महाराष्ट्र टाईम्स (२४ जुलै, २०११)

रविवार, १० जुलै, २०११

मॉन्सून डायरी: १० जुलै, २०११



कोवलमच्या उसळलेल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन, अगस्ती पर्वताभोवती खेळून, पश्चिम घाटाच्या रांगांचा आधार घेत उत्तरेकडे आगेकूच करणारे वारे, आलेप्पीच्या जालाशयांवर मुसळधार वृष्टी देणारे वारे, डोंगरमाथ्यावरील आगुम्बेच्या जंगलात घोंघावणारे वारे, सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरून, चंबळच्या खोऱ्यात विसावून, राजस्थानच्या वाळवंटाकडे मार्गस्थ झाले. दुसरीकडून अंदमानच्या समुद्रातून ऊर्जा घेत, ईशान्येच्या पर्वतीय जंगलांमध्ये शिरलेल्या वाऱ्यांनी हिमालयाच्या पायथ्याचा आधार घेत विस्तीर्ण गंगेच्या मैदानात प्रवेश केला. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीकडून आलेल्या मरुतांनी एकत्रितपणे दिल्लीला जलाभिषेक घालून आपले मार्गक्रमण सुरु ठेवले. देशाच्या सर्व भागांतील मातीचे अंश घेऊन या वाऱ्यांनी कोणत्याही सीमांची तमा न बाळगता सतलजचे पात्र ओलांडून सिंधूच्या प्रदेशात प्रवेश केला. तिथेही ते तसेच बरसले. मात्र या धारांना गंध होता गंगेच्या पवित्रतेचा, हिमालयातील हिमकणांचा, नालन्दाच्या खंडहर भिंतींचा, पानिपतच्या लाल मातीचा आणि पावसाच्या आगमनाची वाट पाहत सीमेपलीकडे शेतीची मशागत करणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या घामाचा.. या पवित्र जलधारांचा गंध सिंधूच्या खोऱ्यात नांगरणाऱ्या बळीराजाच्या अत्यंत परिचयाचा. त्याचे आणि त्या गंधाचे नाते तितकेच जुने, जितके हे वारे! शतके सरली, सीमा बदलत राहिल्या पण भारतवर्षाचा गंध मॉन्सूनच्या जलधारांबरोबर सिंधूच्या मातीशी एकरूप होतच राहिला. सिंधूचा तो शेतकरी या धारांमध्ये भिजत असताना त्याच्या मनात भाव असतात परिपूर्णतेचे आणि अभिमानाचे. सीमेचे बंधन त्याला खिन्न करीत नाही. त्याला माहित आहे.. मानवाने आखलेल्या या सीमा आज आहेत, उद्या नाहीत. त्याला अशा आहे, हेच वारे आज ना उद्या आपल्या जोरदार धडकेने आणि वाहून आणलेल्या जलधारांनी या मानवनिर्मित सीमा पुसून टाकतील आणि सीमा आखणाऱ्यांना भारतीय उपखंडाची नैसर्गिक, शाश्वत अखंडता पटवून देतील.
मॉन्सूनने शनिवारी (९ जुलै, २०११ ) संपूर्ण भारत व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. 

मंगळवार, ५ जुलै, २०११

मॉन्सून डायरी: ५ जुलै, २०११


यावर्षी नियोजित वेळेआधीच केरळमध्ये आणि पुढे महाराष्ट्रातही मॉन्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का बसला होता. मॉन्सूनच्या आगमनादरम्यान हवामान अनुकूल असल्यामुळे पावसाने सर्वदूर हजेरी लावत शेतीच्या कामांनाही सुरवात करून दिली. मात्र, काही दिवसातच पावसाचा जोर कमी होत होत, त्याने दडीही मारली. कागदावर मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला, तरी मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात ढग 'गरजले पण बरसलेच' नाहीत अशीच स्थिती राहिली. मॉन्सूनचा पूर्वार्ध चांगला राहणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला असताना पावसाचा पत्ता नाही, तर उत्तरार्धात ज्यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यावेळी कशी स्थिती असेल अशी शंका उपस्थित होऊ लागली. 
आषाढ सुरु होतानाच मान्सूनच्या वाऱ्यांनी वायव्य भारताचा काही भाग सोडता बहुतांश भारत व्यापला आहे. आयएमडीच्या नकाशावर जरी मान्सूनने बहुतांश भारत व्यापला असला तरी बहुतांश भारतात तो सक्रीय नाही हे वास्तव आहे. हवामानशास्त्रीय भाषेत याला 'मान्सून ब्रेक' म्हणतात. क्षीण नैऋत्य मोसमी वारे, कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव अशी मान्सूनमध्ये खंड पडण्याची अनेक कारणे आहेत. पण ती समजून घेण्याआधी मान्सूनचे आगमन आणि सक्रीय स्थिती समजून घ्यायला हवी.

मान्सून म्हणजे पाऊस का?
सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात पडणाऱ्या पावसाला मॉन्सून म्हणून संबोधले जाते. मात्र, आयएमडीचे मान्सूनच्या आगमनाचे निकष पहिले, तर मान्सून म्हणजे सर्वदूर पडणाऱ्या पावसाबरोबर, नैरुत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे, वातावरणाचा विशिष्ट दाब यांची एकत्रित हवामानाची स्थिती असते. या निकषानुसार एखाद्या विभागात सलग दोन दिवस ६० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रात अडीच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास मॉन्सूनचे आगमन झाल्याचे घोषित करण्यात येते. अर्थात वारे आणि दाब हे दोन्ही निकषही गृहीत धरण्यात येतात. या निकषानुसार सध्याचे चित्र पाहिल्यास महाराष्ट्रात ज्या भागात मॉन्सून पोचल्याचे जाहीर करण्यात आले, तिथे सलग दोन दिवस किमान अडीच मिलीमीटर पाऊस पडला होताच. मात्र, नंतर अनुकूल हवामानाची जोड न मिळाल्यामुळे पाऊस सक्रीय राहिला नाही. 

कमी दाबाची क्षेत्रे आवश्यकच 
वर्षभर सर्वच महिन्यात पाऊस होत असतो. मात्र, मॉन्सूनच्या काळातील पावसाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रभाव. मॉन्सूनचे महिने सोडून इतर कालावधीत होणारा पाऊस हा स्थानिक पातळीवर बाष्पाचे प्रमाण आणि तापमान वाढून पडत असतो. असा पाऊस मर्यादित क्षेत्रात विजांच्या कडकडाटासह पडतो. या उलट मॉन्सून काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेची कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतात. अशा क्षेत्रांना समुद्रातून मोठी ऊर्जा आणि बाष्प प्राप्त होते. त्यांचा प्रभाव शेकडो किलोमीटरपर्यंत असतो. ही कमी दाबाची क्षेत्रे जशी किनारपट्टीजवळ येतील तसा त्यांच्यापासून जमिनीवर मोठ्या क्षेत्रात पाऊस मिळतो. महाराष्ट्राचा विचार करता अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो. सह्याद्रीच्या रांगांमुळे अंतर्गत महाराष्ट्राला या कमी दाबाच्या क्षेत्रांचा विशेष फायदा होत नाही. 
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला मॉन्सूनकाळात मिळणारा बहुतांश पाऊस हा बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे असतो. आंध्रप्रदेश आणि ओरिसाच्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा मोठा फायदा महाराष्ट्राला होतो. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या तीव्रतेवरही पावसाचे प्रमाण अवलंबून असते. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन), चक्रीवादळ (सायक्लोन) या क्रमाने त्यांची तीव्रता वाढत जाते आणि तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या पावसाचे प्रमाणही. ही कमी दाबाची क्षेत्रे शेवटी जमिनीवर प्रवेश करतात आणि ज्या भागातून त्यांचा प्रवास होतो त्या भागात मोठा पाऊस देतात. जमिनीवर आल्यावर मात्र त्यांची तीव्रता झपाट्याने कमी होते. सर्वसाधारणपणे एका कमी दाबाच्या क्षेत्राचे आयुष्य आठवडाभर असते. एका हंगामात कमी दाबाची क्षेत्रे जितकी अधिक निर्माण होतील, तेवढे पावसाचे प्रमाण चांगले राहील असे मानले जाते.



पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती (ऑफ शोर ट्रफ)
मॉन्सून सक्रीय असल्याचे हे महत्वाचे चिन्ह मानले जाते. मॉन्सून काळात दक्षिण गुजरात ते केरळदरम्यान पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असते. त्याची रुंदी फार नसते, मात्र उत्तर- दक्षिण लांबी चारशे - पाचशे किलोमीटरपर्यंत असते. ट्रफ सक्रीय असताना हवेचा दाब समुद्र सपाटीपासून वातावरणात वर वाढत जातो. दाबाच्या या निमुळत्या आकाराला द्रोणीय स्थिती म्हणतात. या भागात बाष्प एकवटून वातावरणात उंच गेल्याने मुसळधार पाऊस देणाऱ्या मोठ्या ढगांची निर्मिती होते. मॉन्सून सक्रीय असताना पश्चिम किनारपट्टीला बहुतांश पाऊस 'ऑफ शोर ट्रफ' मुळे मिळतो. 

'मॉन्सून ट्रफ' आणि पावसातील खंड 
मॉन्सूनचे वारे उत्तर भारतात अंतिम टप्प्यात पोचले की त्यांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळण घेते. ज्या भागातून मॉन्सूनचे वारे वळण घेतात त्या भागात वायव्येकडून आग्नेयेकडे असा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. याला हवामानशास्त्रीय भाषेत 'मॉन्सून ट्रफ' म्हणतात. मॉन्सून ट्रफची निर्मिती हे मॉन्सूनने बहुतांश भारत व्यापल्याचे द्योतक म्हणायला हवे. भारताच्या उत्तरेकडून पूर्वेकडे पसरलेल्या हिमालयाच्या रांगांना 'मॉन्सून ट्रफ' समांतर असतो. या मॉन्सून ट्रफची निर्मिती नैरुत्येकडून मान्सूनचे येणारे वारे हिमालयाच्या रांगांना धडकून वायव्येकडे वळल्यामुळे होत असावी, असा पूर्वी समज होता. मात्र, आधुनिक निरीक्षणांनुसार हिमालयाशी मॉन्सून ट्रफचा संबंध नसून, त्याची निर्मिती मॉन्सून काळात वातावरणात येणाऱ्या आणि वातावरणातून बाहेर जाणाऱ्या ऊर्जेच्या बदलत्या प्रमाणामुळे होत असावी असे मानले जाते. 
मॉन्सून ट्रफची सामान्य स्थिती वायव्य भारतातून सुरु होऊन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमार्गे बंगालच्या उपसागर अशी असते. मात्र हंगामात हा पट्टा अनेकदा या सामान्य स्थितीच्या उत्तर- दक्षिणेला सरकतो. हा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा बराच उत्तरेला म्हणजेच हिमालयाच्या पायथ्यापाशी पोचला की, हिमालयाच्या पायथ्याशी पावसाचे प्रमाण वाढते आणि देशातील बहुतांश भागातून पाऊस गायब होतो. यालाच 'मॉन्सून ब्रेक' म्हणतात. 'मॉन्सून ब्रेक'चा सर्वाधिक फटका पर्जन्यछायेचा प्रदेश असणाऱ्या मराठवाडा, रायलसीमासारख्या भागांना बसतो. देशाच्या बहुतांश भागात ज्यावेळी पावसात खंड पडलेला असतो, त्यावेळी मात्र हिमालयाच्या परिसरात आणि ईशान्य भारतात चांगला पाऊस होतो. गेला आठवडाभर मॉन्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण स्थानापासून बराच उत्तरेला सरकलेला असल्यामुळे महाराष्ट्र, दक्षिण भारतासह मध्य भारतातही पावसात मोठा खंड पडला, मात्र त्याचवेळी हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पूर आले. हा मॉन्सून ट्रफ आता दक्षिणेला त्याच्या सामान्य स्थितीकडे सरकत आहे. तो त्याच्या मूळ स्थानावर आल्यावर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यामुळे येत्या आठवड्यात मध्य भारतासह महाराष्ट्रातही पावसाचे पुनरागमन होऊ शकेल अशी अशा करायला हरकत नाही.



महाराष्ट्रातील जूनचा पाऊस 
महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन ३ जूनला वेंगुर्ल्यात झाले. त्यानंतर मॉन्सून ४ जूनला पुण्यापर्यंत, तर ५ जूनला नाशिकपर्यंत पोचला. त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनचा प्रवास रोखला जाऊन १५ जूनपर्यंत त्यामध्ये प्रगती झाली नाही. १५ जूनला त्याने मराठवाड्याचा काही भाग व्यापला. त्यानंतर २० जूनला विदर्भाचा बहुतांश भाग व्यापतानाच २४ जूनला त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन जरी नियोजित वेळेआधी ३ दिवस झाले असले, तरी अनुकूल स्थिती अभावी मॉन्सूनचा राज्यातील प्रवास सुमारे १० दिवस रोखला गेला. याला मुख्य कारण अरबी समुद्रातील प्रतिकूल स्थिती.             
या कालावधीत झालेल्या पावसाचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंत फक्त कोकणात पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. कोकणात जूनच्या सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ टक्के कमी  , मराठवाड्यात ५० टक्के कमी, तर विदर्भात जूनच्या सरासरीच्या १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात मॉन्सून पोचायला वेळ लागला असला तरी, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्या तुलनेत मराठवाडा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणच्या अनुकूल स्थिती पासून वंचित राहिला. म्हणूनच जूनमध्ये तेथील पर्जन्यमान सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी आहे. खरीपासाठी हि स्थिती चांगली नसून  येत्या काळात मराठवाड्यात चांगला पाऊस न झाल्यास चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते.

आयएमडीचा दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज        
- दरम्यान २१ जूनला आयएमडीने अद्ययावत निरीक्षणाच्या आधारावर मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजामधून आयएमडीने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या सरासरीच्या ९८ टक्के पावसाचे प्रमाण बदलून ९५ टक्के केले. म्हणजे आधीच्या अंदाजापेक्षा हंगामात कमी पाऊस पडणार. त्यातहि +/- ४ टक्के एरर गृहीत धरला आहे. 
- दुसऱ्या एका अंदाजानुसार देशभरात जुलैमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९३ टक्के, तर ऑगस्टमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९४ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (एरर +/- ९ टक्के)
- तिसऱ्या अंदाजानुसार संपूर्ण हंगामात वायव्य भारतात तेथील सरासरीच्या ९७ टक्के, ईशान्य भारतात तेथील सरासरीच्या ९५ टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणाऱ्या मध्य भारतात सरासरीच्या ९५ टक्के, तर दक्षिण भारतात सरासरीच्या ९४ टक्के पावसाची शक्यता आहे.
जुलै आणि ऑगस्ट हे भारतातील मॉन्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणारे महिनेच या अंदाजाची पडताळणी करतील.  


प्रोजेक्ट मेघदूत (१२ मे, २०११)


प्रोजेक्ट मेघदूत (१२ मे, २०११)  
  
अगदी लहानपणी पाऊस म्हणजे घराशेजारी साचणाऱ्या डबक्यात डुंबणे, रेल्वेस्टेशन जवळच्या तलावात मासे पकडायला जाणे, महत्वाचं म्हणजे शाळेला दांडी मारायचं हक्काचं कारण. पुढे थोडं मोठं झाल्यावर पावसात सायकलवरून स्वच्छंदी बागडणे, साप, खेकडे, बेडूक पकडणे, भर पावसात चिखलात माखून, घसरत फुटबॉल खेळणे, शाखेची वर्षासहल काढणे असे उद्योग असायचे. कॉलेज सुरु झाल्यावर 'मॉन्सून'चे संदर्भ बदलले. मुसळधार पावसात, 'तिच्या' हातात हात घालून कुडकुडत बिनधास्त फिरणे, ट्रेकवरून येताना १०-१० कप चहा पिणे.. पावसाच्या आठवणी आहेत त्या अशा..
पुढे खगोलशास्त्राचा अभ्यास सुरु केला, तेव्हा पावसाळ्याचे चार महिने शत्रूसारखे वाटत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात एखाद दुसरा दिवस आकाश स्वच्छ मिळायचं. मग यावर रेडीओ निरीक्षणांचा तोडगा काढून वेळ मारून न्यायची. मात्र इतकी वर्षे कधीही चार महिने आकाशात दाटणाऱ्या ढगांच्याकडे विशेष लक्ष गेले नाही. कधी त्यामधून कोसळणाऱ्या जलधारांचे आश्चर्यही वाटले नाही. पावसाळा म्हटलं कि पाऊस पडणारच त्यात कुतूहल ते काय?
पुढे 'सकाळ'साठी हवामान कव्हर करायला सुरवात केली, तेव्हा २००७ चा उन्हाळा सुरु होता. रोजच्या रोज उन्हाची बातमी देऊनच घाम फुटायचा. उष्णतेची लाट, उष्माघाताचे बळी अशा बातम्या देता देता एकदा मॉन्सूनच्या अंदाजाची बातमी समोर आली. तीहि एप्रिलमध्ये. बातमी लिहिण्यासाठी अंदाजामध्ये लिहिलेल्या त्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी थेट पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याकडे गेलो. मी शिकाऊ आहे, हे लक्षात येऊनहि त्यांनी त्यावेळी अख्खा मॉन्सून अंदाज अगदी सोपा करून सांगितला. मॉन्सूनचे त्यांनी त्यावेळी सांगितलेले विज्ञान आजहि डोक्यात अगदी पक्के बसले आहे. सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन, विविध महासागरांच्या पृष्ठभागांचे तापमान, भारतीय उपखंडातील उन्हाळ्यातील तापमान, अशा वेगवेगळ्या बाबींचा मॉन्सूनवर काय परिणाम होतो, मॉन्सूनची निर्मिती कशी होते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची भारतीय उपखंडात वाटचाल कशी होते, चार महिने कोसळून झाल्यावर मॉन्सूनचे वारे माघारी कसे फिरतात या सगळ्या गोष्टींबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण झाले.
त्यावर्षीचा मॉन्सून बातम्यांच्या निमित्ताने पूर्ण अभ्यासता आला. जो मॉन्सून आतापर्यंत माझ्या डोक्यावरील ढग आणि त्यातून पडणाऱ्या पावसाच्या धारांपर्यंतच मर्यादित होता, तो मॉन्सून एक जागतिक आणि किचकट घटना कशी आहे ते लक्षात येऊ लागले. कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे, द्रोणीय स्थिती- बातम्यांमध्ये वारंवार वापराव्या लागणाऱ्या या शब्दांच्या संकल्पना समजू लागल्या, काही दिवसांनी तर अगदी आज पाऊस पडणार कि नाही, याचा माझा अंदाजहि बरोबर येऊ लागला. यातून 'मॉन्सून'शी नाते घट्ट होत गेले. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पावसावर अवलंबून कसे आहेत, पूर, चक्रीवादळांच्या वेळी निर्माण होणारी आपत्कालीन स्थिती, पावसाने दडी मारल्यावर होणारी पाणी आणि वीजकपात, दुष्काळी वर्षानंतर देशभर पेटणारी  महागाई, या काळात निर्माण होणारे साथीचे रोग यावरून मॉन्सून हा फक्त छत्री, रेनकोट आणि घराबाहेर कधी पडायचं एवढ्या पुरता मर्यादित विषय नसून भारतीय उपखंडाची ती नैसर्गिक ओळख असल्याचे स्पष्ट झाले. खरच 'मॉन्सून'शिवाय भारत..विचार तरी करता येईल का?
मॉन्सून 'कव्हर' करण्याचं हे माझं पाचवं वर्ष आहे. या दरम्यानचा प्रत्येक मॉन्सून वेगळा होता. कधी नॉर्मल, कधी दुष्काळ, कधी सरासरीपेक्षा जास्त. कधी एका भागावर रुसून दुसरीकडे पूर आणणारा, तर कधी अनेक दिवस दडी मारून शेतकऱ्यांना सतावणारा, कधी चक्रीवादळामधून सगळे बाष्प गमावणारा, तर कधी वादळे नसतानाही मोठा पाऊस देणारा...सतत हूल देणारा लहरी मॉन्सून मला पूर्ण समजलंय असा सांगणारा एकही हवामानशास्त्रज्ञ आपल्याला भेटणार नाही.  
वेदांमधेही समुद्राकडून विशिष्ठ कालावधीत जमिनीवर येणाऱ्या मॉन्सूनच्या (नैऋत्य मौसमी) बाष्पयुक्त वाऱ्यांचा उल्लेख आढळतो. रामायण, महाभारतापासून, भारतातील अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भारताच्या या अविभाज्य घटकाचा ठीकठिकाणी उल्लेख आढळतो. आर्यभट्ट, वराहमिहीरासारख्या शास्त्रज्ञांनी मॉन्सूनच्या लहरीपणाच्या नोंदी ठेवल्या होत्या. इंग्रजांचे भारतावर जे जे उपकार आहेत, त्यापैकी महत्वाचा म्हणजे, भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या मॉन्सूनच्या नियमितपणे देशभरातून घेतलेल्या नोंदी. त्यांचा वारसा 'आयएमडी' आजही चालवत आहे. 
मॉन्सूनची इतिहासातील सर्वात महत्वाची शास्त्रीय आणि कलात्मक नोंद म्हणून कालिदासाच्या 'मेघदूत'ची ओळख आहे. आपल्या प्रेयसी- पत्नीच्या विरहाचे दुःख सहन न झालेल्या यक्षाला आकाशातील ढगांकडे पाहून आनंद होतो, कि याच ढगांचा प्रवास 'तिच्या' जवळूनही होऊ शकेल.. त्या ढगांकडे तो आपल्या विरह भावना व्यक्त करून आपला संदेश धाडतो.. दूत म्हणून भूमिका निभावणाऱ्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन 'मेघदूत' या अजरामर काव्यात कालिदासांनी केले आहे. काव्यातील मेघाचा प्रवास तंतोतंत मॉन्सूनच्या वाऱ्यांशी मिळतो हे आजच्या वैज्ञानिकांसाठीहि आश्चर्य आहे.
मॉन्सून समजून घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक पिढ्यांनी आपापल्या परेनी केला आहे. कृत्रिम उपग्रहांसह अत्याधुनिक यंत्रणांच्या साह्याने  मॉन्सूनचे विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न आजचे शास्त्रज्ञ करीत असले तरी, मॉन्सून ला फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून अभ्यासणे परिपूर्ण ठरणार नाही..(अगदी माणसाचा अभ्यास फक्त एक शरीर म्हणून करता येणार नाही तसाच)..हजारो लाखो वर्षे भारतीय उपखंडावर न चुकता कोसळणारा मॉन्सून हा भारतीय संस्कृतीच्या रोमा रोमात भिनला आहे. पश्चिम घाटातल्या आणि ईशान्येच्या सदाहरित वनांना, त्यात राहणाऱ्या असंख्य जीवांना तो पोसतो, सह्याद्रीतल्या नद्यांना तो वाहते करतो, भू मातेच्या पोटात बीजे पेरून वाट पाहणाऱ्या कोट्यावधी शेतकऱ्यांचे शिवार तो फुलवतो. उन्हाने लाही लाही झालेल्या जीवांना गारवा देतो, पाणी देतो, वीज देतो, भुकेल्यांना अन्न देतो, देशाला समृद्धी देतो...
देवाइतके महत्वाचे स्थान असणाऱ्या या मॉन्सूनचे स्वागतहि तसे झाले नाही, तर नवलच. झाडे- वेली, पशु- पक्षी सर्वच जण मॉन्सूनचे स्वागत आपापल्या 'अंदाजा'ने करतात. गायकाच्या गळ्यातून अपोआप 'मेघ मल्हार' बाहेर पडतो, कवीचे हात बाहेर पडणाऱ्या जलधारांना शब्दाचे रूप देऊन कागदावर उमटवतात, फोटोग्राफरचा कॅमेरा अपोआप फ्रेम पकडतो, संपूर्ण निसर्गच जणू फेर धरून नाचू लागतो..बाहेर जशी स्थिती तसाच असंख्य मनातहि हा सोहळा सुरु असतो..
या सर्व गोष्टी कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळ, एल निनो इतक्याच महत्वाच्या नाहीत का? या सर्व गोष्टींशिवाय मॉन्सूनचा परिपूर्ण अभ्यास शक्य आहे का? वेदांपासून मॉन्सून समजून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, आपल्या पिढीकडून शास्त्रज्ञ त्यांच्या परेने मॉन्सूनचे भौतिक पैलू समजून घेत आहेत, मग या इतर पैलूंचे काय? 'प्रोजेक्ट मेघदूत' आकाराला येतोय मॉन्सूनची हि दुसरी बाजू अभ्यासण्यासाठी. पुढील काही वर्षे मॉन्सून आणि भारताचा संवाद विविधांगानी अभ्यासण्याचा प्रयत्न 'प्रोजेक्ट मेघदूत'द्वारे करण्यात येणार आहे. म्हटलं तर हा मॉन्सूनचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, म्हटलं तर आपण स्वतः मॉन्सूनशी साधलेला संवाद.
१९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक, लेखक अलेक्झांडर फ्रेटर याने सर्व प्रथम मॉन्सूनचा पाठलाग केला, काहीसा मेघदूताच्या मार्गाने. अगदी दक्षिणेकडील त्रिवेंद्रमपासून ते दिल्लीपर्यंत. या काळात त्याला मॉन्सूनचे साग्रसंगीत स्वागत करणारे मल्याळी भेटले, दक्षिण भारतातील पर्जन्यदेवतेची पूजा त्याने पाहिली. आयएमडीच्या शास्त्रज्ञांकडून त्याने मॉन्सूनचे विज्ञान समजून घेतले. चेरापुंजीचा प्रचंड पाऊस अनुभवला. शेतकऱ्यांबरोबर पेरणी केली. त्याने केलेल्या या ध्येयवेड्या कामाला तोड नाही. नेहमीप्रमाणे बाहेरील नागरिकानेच आपल्याला आपल्या देशाच्या एका पैलूचे दर्शन घडवले. पुढे त्याने त्याच्या या मॉन्सूनच्या पाठलागाचा अनुभव 'चेसिंग द मॉन्सून' या पुस्तकाद्वारे जगासमोर आणला. या पुस्तकावर आधारित 'बीबीसी'ने एक डॉक्युमेंटरीहि बनवली. हा झाला इतिहास.
मॉन्सूनचे असंख्य पैलू अजूनहि जगासमोर आलेले नाहीत. त्या पैलूंची विविध पद्धतींनी नोंद करणे आवश्यक आहे. 'प्रोजेक्ट मेघदूत'द्वारे आपण तेच करायचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित हे काम करता करता, अनेक कोडी उलगडतहि जातील, एक सर्वसमावेशक 'मॉन्सून कोश'हि तयार होईल. हि अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया समजून घेण्याची जी मोहीम शतकानुशतके चालू आहे, त्यात आपल्या पिढीकडून काहीशी भरहि पडेल. अर्थात हे एका वर्षाचे काम नाही. सतत काही वर्षे पंढरपूरच्या वारीसारखा 'मॉन्सून'चा पाठलाग करावा लागेल, तेव्हा दरवेळी त्याचे वेगवेगळे पैलू समोर येतील. देशातील सर्व भाग एकाच प्रवासात पूर्ण होणे शक्य नाही, ते हि वेगवेगळ्या वर्षी करावे लागतील. 
मॉन्सून अशा प्रकारे अभ्यासावा असं गेली तीन वर्षे मनात होतं. पण काहीना काही कारणांनी ते राहत होतं. या वर्षी या पहिल्या 'मॉन्सून वारी'चा मुहूर्त लागतोय. येत्या २७ मे ते ४ जून च्या दरम्यान केरळ ते महाराष्ट्रादरम्यान मॉन्सूनचा पाठलाग करण्याचे निश्चित केले आहे. मॉन्सूनचे स्वागत आणि त्याचा पाठलाग विविध नजरांमधून झाला तर? एकाच वेळी त्याचे विविध पैलूही समोर येतील, त्याचे स्वागतही विविध अंदाजांनी होईल, पश्चिम घाटात या वर्षी जेव्हा सर्व प्रथम मॉन्सूनचे वारे धडकतील, तेथील डोंगरांवरून जेव्हा पहिल्या पाण्याचे धबधबे कोसळू लागतील, आपल्या तारणहाराच्या स्वागताला असंख्य जीव जेव्हा फेर धरून गाऊ लागतील, तेव्हा त्या आवाजात आवाज मिसळायला आपणहि तिथे असायला हवे.. मॉन्सूनच्या स्वागताला यावेळी हवामानशास्त्रज्ञ हवेत, निसर्ग अभ्यासक हवेत, वनस्पती-प्राणी शास्त्रज्ञ हवेत. कवी हवेत, संगीतकार हवेत, ते क्षण टिपायला चित्रकार हवेत, फोटोग्राफर हवेत.. मॉन्सूनचे पश्चिम घाटातले स्वागत अशा विविध भाव स्वभावांद्वारे त्या निसर्गाच्या संवादाचाच एक भाग होऊन करणे किती अद्भुत असेल, याचा विचार येऊनच मन पावसाच्या धारांनी न्हाऊन निघतंय..मॉन्सूनविषयी कोणत्याही दृष्टीतून कुतूहल असणारं कोणीही यात सहभागी होऊ शकेल (अर्थात हा पाठलाग झेपू शकेल असंच). तयारीला लागायला हवं, येताय ना?