सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

'ब्लैक' सायन्स डे..


स्थळ: आघारकर संशोधन संस्था, वेळ: सकाळी दहाची, निमित्त: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे.. भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे पद भूषवलेले आणि भारताला एकविसाव्या शतकात जगातील इतर अणूशक्तींच्या पंक्तीत बसवणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान सुरु असते... त्यांच्या व्याख्यानाला नेहमीप्रमाणेच सभागृह हाउसफुल्ल असते. आपल्या शांत, सोप्या शैलीत डॉ. काकोडकर देशाच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी आणि दिवसागणिक वाढणारी उर्जेची आवश्यकता भरून काढण्यासाठी अणूउर्जेला पर्याय कसा नाही हे शास्त्र शुद्धपद्धतीने मांडतात.. अणूउर्जेविषयी देशात सध्या निर्माण झालेल्या (किंवा जाणीवपूर्वक केलेल्या) संभ्रमावस्थेमुळे अपेक्षेप्रमाणे नागरिकांकडून जैतापूरवर प्रश्न येतात.. त्या प्रश्नातील अपप्रचार खोडून काढताना डॉ. काकोडकर नेमके वास्तव नागरिकांसमोर ठेवतात.. टाळ्यांचा गजर होतो.. आणि मानवाने शोध लावलेल्या या अनोख्या ऊर्जास्रोताचे स्वागत होते... त्याचवेळी एकाएकी सभागृहाबाहेर पत्रकारांची गर्दी होते.. डॉ. काकोडकरांची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॅमेरे सरसावतात.. मात्र जैतापूरविषयी प्रश्न विचारण्यास आयोजक प्रतिबंध घालतात.. डॉ काकोडकरही अशा प्रश्नांवर 'नो कमेंट्स' हे एकच उत्तर देतात...
दिवस तोच, स्थळ तेच.. वेळ सकाळी नऊची.. स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारे पाच- दहा तरुण संशोधन संस्थेच्या गेटवर एक 'फतवा' देतात.. 'डॉ काकोडकरांनी येथे जैतापूरबद्दल एकही अक्षर उच्चारू नये अन्यथा आम्ही 'आमच्या पद्धतीने' निदर्शने करू' असा मजकूर त्या 'फतव्या'मध्ये असतो.. आयोजकांकडूनही त्यांना तशीच ग्वाही दिली जाते.. दुर्दैवाने काकोडकरांच्या व्याख्यानानंतर झालेला नागरिकांच्या टाळ्यांचा गजर ऐकायला त्यांच्यापैकी एकही जण उपस्थित नसतो..
डॉ. काकोडकर यांच्या व्याख्यानाला झालेला हा पाहिला विरोध नाही.. याआधी लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य याबद्दल अखिल विश्वाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर असण्याच्या थाटात वावरणाऱ्या डाव्या विचाराच्या पुण्यातील एका संघटनेनेही अशाच प्रकारच्या निदर्शनांनी सभागृहाबाहेरूनच कार्यक्रम उधळून लावायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याही व्याख्यानाला आलेल्या नागरिकांनी व्याख्यानानंतर टाळ्यांच्या गजराने विज्ञानाच्या या आविष्काराला आपला पाठींबा दर्शवला होता. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. 'विरोधासाठी विरोध' या एकच तत्वाने प्रेरित झालेल्या या गटांना या विषयातील ज्ञानाच्या आपल्या मर्यादेबरोबर लोकांमध्ये अणूउर्जेविषयी असणारे कुतूहल लक्षात आल्याने शेवटी शास्त्रज्ञांना बोलूनच द्यायचे नाही हा मार्ग स्वीकारला.. मात्र असे करताना समाजाचे आपल्या दुटप्पी वर्तनावर लक्ष जाऊ शकते हे मात्र डावे - उजवे दोघेही विसरले. मागील वर्षी डाव्या संघटनेनी एका वादग्रस्त विषयावर आयोजित केलेला कार्यक्रम 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला होता. तेव्हा काकोडकरांचा कार्यक्रम उधळून लावणारे हेच लोक माध्यमांकडे 'लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्याची पायमल्ली' अशी पत्रके घेऊन फिरत होते. शिवसेनेकडून काल झालेले कृत्य अनपेक्षित नसले तरी, स्वतःच्याच वर्तमानपत्रातून 'बेभान'पणे लिखाण करताना याच स्वातंत्र्याचा पुरेपूर लाभ आपण उठवतो.. आपल्या भाषणांमधून तर मतस्वातंत्र्याचा अधिकाधिक फायदा किती उठवता येतो याची प्रचीती आपण नेहमीच देतो.. हे मात्र 'फतवे' काढायच्या आधी आपण सोयीस्करपणे विसरतो.
अणूऊर्जेबाबत समोरासमोर चर्चा करण्याची हिम्मत कोणत्याही विरोधकात नाही हे वास्तव आहे. कारण स्पष्ट आहे.. आपण 'रेटत' असलेल्या माहितीमागील सत्य उघडे पडण्याची चिंता डाव्या- उजव्या अशा दोघांनाही आहे. अणूऊर्जेविषयीची किंवा जैतापूरविषयीची तुमची भूमिका, तुमच्याकडे असणारी माहिती विविध माध्यमातून तुम्ही नागरिकांसमोर मांडत आहातच, मग शास्त्रज्ञांना त्यांची भूमिका, त्यांच्याकडे असणारी माहितीही मांडण्याचा अधिकार आहे. यापैकी कोणाला पाठींबा द्यायचा हे नागरिकांनाच ठरवूद्यात. 
साहित्य, इतिहास, कला या क्षेत्रांत दडपशाही करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असतानाच आता विज्ञानाच्या क्षेत्रातही ही घूसखोरी होऊ लागली आहे हे देशाचे खरोखर दुर्दैव म्हणावे लागेल. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रयोगशाळांचे दरवाजे सर्वसामन्यांसाठी खुले केले जातात. या वर्षीच्या विज्ञानदिनी एका संशोधन संस्थेला दरवाजे बंद करून आत कार्यक्रम घ्यावा लागतो आणि त्या बंद दरवाज्यांच्या आत शास्त्रज्ञांनी काय बोलावे काय बोलू नये हेही जेव्हा एखादा अज्ञानी ठरवतो (आणि शास्त्रज्ञही त्याला बळी पडतात).. तेव्हा वैज्ञानिक भारताचे स्वप्न आणखी किमान चारशे वर्षे लांब आहे याची खात्री पटते...


....कारण.. हा काळ आहे: सतरावे शतक आणि इथे धर्मसत्तेच्या आणि धर्मग्रंथातील दाखल्यांच्या विरोधात एक अवाक्षर काढण्याची मुभा नाही.. तो पहा गजाआड गैलिलिओ हतबद्ध बसला आहे.. त्याच्यावर गंभीर आरोप आहे..एका छोट्या नळकांडीतून तो जादुई दृश्ये दाखवतो आणि पृथ्वीभोवती ग्रह- तारे फिरत नाहीत असे काही तो बडबडतो.. धर्मग्रंथातील सृष्टीनियमांच्या हे विरुद्ध आहे.. भोग आता आपल्या कर्माची फळे !!