बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

प्रोजेक्ट मेघदूत- सिझन २

अल्लाह मेघ दे पानी दे छाया दे रे तू ..रामा मेघ दे.. श्यामा मेघ दे ..
आंखे फाडे दुनिया देखे आज ये तमाशा.. है ये विश्वास मेरे.. है मेरी आशा..
पूर्वोत्तर भागाचा काही अपवाद सोडता देशाच्या काना- कोपऱ्यातून व्यक्त होणारी ही आर्त साद मॉन्सूनच्या कोरड्या वाऱ्यांबरोबर दूर दूर वाहत चालली आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मॉन्सूनचे वारे कित्येक दिवस घोंघावत आहेत . मात्र, त्यांच्या सोबतीला जलधारांचे संगीत नाही आणि कृष्णमेघाचे धीर गंभीर सूरही नाहीत..
२०११ सालचा मॉन्सून गेल्या कित्येक वर्षातला सर्वोत्तम मानला गेला होता. सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडल्यामुळे पुढील वर्षी (म्हणजे २०१२) पावसाला थोडा विलंब झाला तरी चालेल एवढा पाऊस  झाल्याचे मानले जात होते. पावसाच्या आकड्यांनी निर्धास्त होऊन निसर्ग सदा सर्वकाळ एकाच प्रदेशावर मेहेरबान राहत नसतो हे साधे गणित आपण विसरलो. आकाशातून बरसलेली मोफत जलसंपत्ती आपण पुरेशी साठवली नाहीच , पण जी साठवली तिचाही वाट्टेल तसा वापर करून स्वतःची दयनीय अवस्था करून घेतली. हतबल अवस्थेत आकाशाकडे टक लावून बसण्याव्यतिरिक्त आता दुसरा पर्याय नाही. मॉन्सून दरवर्षी आपल्याला त्याचे विविध रंग दाखवत असतो.. गेल्या वर्षीच्या जलरंगानंतर आता काही कोरडे फटकारे!
मॉन्सूनच्या अशाच विविध रंगांचे प्रतिबिंब भारताच्या निसर्गात आणि समाजात त्या त्या वर्षी कसे उमटते हे अभ्यासण्यासाठी २०११ पासून 'प्रोजेक्ट मेघदूत'ला सुरुवात झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणलेल्या जलधारांच्या सोबतीनेच पश्चिम घाटातून पावसाचा पाठलाग करीत प्रोजेक्ट मेघदूतची टीम महाराष्ट्रापर्यंत पोचली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरून पावसाचे आणि त्या प्रदेशाचे नाते काय हे तपासण्याचाही प्रयत्न केला गेला. कोवलमच्या किनारी पालथ्या होड्यांवर बसून समुद्राकडे एकटक पाहणारा मल्याळी मच्छिमार असो किंवा पावसाळ्यात छत्र्यांचा व्यवसाय करून कोट्यावधी रुपये कमावणारा आलेप्पीचा बिझनेसमन असो..पावसाचे भारतीय जीवनावर किती थेट आणि खोल परिणाम होतात हे प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन १ मध्ये जवळून पाहता आले. त्याचप्रमाणे कोकणातील खारवी मच्छिमार, मेळघाटातला कोरकू आदिवासी, गडचिरोलीचा गोंड आदिवासी, कोल्हापूर जवळचा कुणबी शेतकरी, घाटातला धनगर आशा अनेकांशी संवाद साधून त्यांचे पावसाचे आडाखे आणि पिढीजात त्यांना मिळालेले निसर्ग निरीक्षणाचे ज्ञान समजावून घेतले. मुसळधार पावसात पहिल्या वर्षी दक्षिण भारत अनुभवून झाल्यानंतर यावर्षी प्रोजेक्ट मेघदूत पावसाबरोबर (?) ..खरतर मॉन्सूनबरोबर मध्य भारतातील स्थिती अभ्यासणार आहे. 


मध्य भारताचे मॉन्सूनच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. या भागात अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागाराकडून अशा दोन्ही बाजूंनी येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखांचा मिलाफ होतो आणि जलधारांचा वर्षाव होतो. सातपुडा, विन्ध्य पर्वतांबरोबर नर्मदेचे खोरे आणि घनदाट पेंच, बांधवगडसारख्या अभयारण्याने समृद्ध निसर्ग लाभलेल्या या प्रदेशाचे भारताच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्वही तितकेच आहे. भोजपूर, उज्जैन, चित्रकुट, इंदौर, मांडू, विदिशा ही ठिकाणे देशाच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य या बरोबरच ज्ञान- विज्ञानाच्या निर्मितीचा कळस या प्रदेशाने अनुभवला आहे. मौर्य, गुप्तांपासून मोघल, राजपूत, मराठा आणि इंग्रजांपर्यंत सर्व शासकांच्या खुणा या भागात घडलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय घटना आजही डोळ्यासमोर उभ्या करतात. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर या प्रदेशातील निसर्गात आणि समाजात काय बदल होतात हे पाहतानाच मॉन्सूनची या भागातील निसर्गाच्या, भूगोलाच्या आणि सामाजिक रचनेच्या जडणघडणीत नेमकी भूमिका काय हे अभ्यासण्याचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ मध्ये करण्यात येणार आहे. मध्य भारतातील पर्वतीय भागात राहणारे आदिवासी, तसेच  नर्मदेच्या खोऱ्यात शेती करणाऱ्या शेतकर्यांकडे मॉन्सूनबद्दल काय ज्ञान आहे तेही तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.
या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाकवी कालिदासाने त्याच्या मेघदूत या काव्यात मेघाला सांगितलेल्या मार्गावरून (मध्य भारतातील) हा प्रवास होणार आहे. या प्रवासात मेघदूतमध्ये उल्लेख केलेल्या विविध स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथून प्रत्यक्ष हवामानाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्या ठिकाणावरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची आणि ढगांची दिशा नेमकी काय आहे, त्याने उल्लेख केलेल्या प्रदेशातील निसर्गात आणि भूगोलात आता काय फरक झालेला आहे हेही तपासण्याचे उद्दिष्ट प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ साठी ठेवण्यात आले आहे. १९९३ मध्ये पुण्यातील नामवंत डॉक्टर एस. व्ही. भावे यांनी त्यांच्या स्वतःच्या विमानातून मेघदूतच्या मार्गाचा मागोवा घेतला होता. त्यांच्या अनुभवांचा आधार घेऊन त्या मार्गावरील जमिनीवरील स्थिती नेमकी काय आहे हे तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मेघदूत काव्यामधील हवामानशास्त्र तपासले जातानाच त्या काळात हे ज्ञान कसे निर्माण झाले याचेही उत्तर पुढील काळात मिळू शकणार आहे.     
मॉन्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबामुळे प्रोजेक्ट मेघदूतचा मध्य भारतातील प्रवास ३० जून ते १० जुलै या कालावधीत होणार आहे. नागपूरजवळील रामटेकपासून या प्रवासाला सुरवात होणार असून पेंच, पचमढी, भेडाघाट , जबलपूर, चित्रकुट, खजुराहो या मार्गाने पश्चिमेकडे विदिशा, भोपाळ, भीमबेटका, उज्जैन , इंदौर असा दहा दिवसांचा प्रवास राहणार आहे. शेतकरी, आदिवासी, विविध विषयांचे तज्ञ, पत्रकार, साहित्यिक, कलाकार यांच्या मुलाखती घेण्याबरोबर ठिकठिकाणी थांबून तेथील हवामानाच्या नोंदी घेण्याचे काम प्रोजेक्ट मेघदूतची टीम करणार आहे. या सर्व घटनांचे, तसेच निसर्गात आणि समाजात होणाऱ्या बदलांचे नियमितपणे छायाचित्रणही करण्यात येणार आहे. सिझन २ साठी १० जणांची टीम काम करीत असून, यामध्ये पत्रकार, आयटी प्रोफेशनल, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मॉन्सून म्हणजे फक्त पाऊस नाही हे माहित असूनही हा प्रवास मॉन्सूनच्या पावसाबरोबरच व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. म्हणूनच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कधी तयार होते आणि मॉन्सूनची दमदार प्रगती कधी सुरु होते याकडे आम्हा सर्वांचे लक्ष लागून आहे.

१५ जून २०१२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा