मंगळवार, ५ जुलै, २०११

मॉन्सून डायरी: ५ जुलै, २०११


यावर्षी नियोजित वेळेआधीच केरळमध्ये आणि पुढे महाराष्ट्रातही मॉन्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का बसला होता. मॉन्सूनच्या आगमनादरम्यान हवामान अनुकूल असल्यामुळे पावसाने सर्वदूर हजेरी लावत शेतीच्या कामांनाही सुरवात करून दिली. मात्र, काही दिवसातच पावसाचा जोर कमी होत होत, त्याने दडीही मारली. कागदावर मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला, तरी मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात ढग 'गरजले पण बरसलेच' नाहीत अशीच स्थिती राहिली. मॉन्सूनचा पूर्वार्ध चांगला राहणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला असताना पावसाचा पत्ता नाही, तर उत्तरार्धात ज्यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यावेळी कशी स्थिती असेल अशी शंका उपस्थित होऊ लागली. 
आषाढ सुरु होतानाच मान्सूनच्या वाऱ्यांनी वायव्य भारताचा काही भाग सोडता बहुतांश भारत व्यापला आहे. आयएमडीच्या नकाशावर जरी मान्सूनने बहुतांश भारत व्यापला असला तरी बहुतांश भारतात तो सक्रीय नाही हे वास्तव आहे. हवामानशास्त्रीय भाषेत याला 'मान्सून ब्रेक' म्हणतात. क्षीण नैऋत्य मोसमी वारे, कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव अशी मान्सूनमध्ये खंड पडण्याची अनेक कारणे आहेत. पण ती समजून घेण्याआधी मान्सूनचे आगमन आणि सक्रीय स्थिती समजून घ्यायला हवी.

मान्सून म्हणजे पाऊस का?
सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात पडणाऱ्या पावसाला मॉन्सून म्हणून संबोधले जाते. मात्र, आयएमडीचे मान्सूनच्या आगमनाचे निकष पहिले, तर मान्सून म्हणजे सर्वदूर पडणाऱ्या पावसाबरोबर, नैरुत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे, वातावरणाचा विशिष्ट दाब यांची एकत्रित हवामानाची स्थिती असते. या निकषानुसार एखाद्या विभागात सलग दोन दिवस ६० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रात अडीच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास मॉन्सूनचे आगमन झाल्याचे घोषित करण्यात येते. अर्थात वारे आणि दाब हे दोन्ही निकषही गृहीत धरण्यात येतात. या निकषानुसार सध्याचे चित्र पाहिल्यास महाराष्ट्रात ज्या भागात मॉन्सून पोचल्याचे जाहीर करण्यात आले, तिथे सलग दोन दिवस किमान अडीच मिलीमीटर पाऊस पडला होताच. मात्र, नंतर अनुकूल हवामानाची जोड न मिळाल्यामुळे पाऊस सक्रीय राहिला नाही. 

कमी दाबाची क्षेत्रे आवश्यकच 
वर्षभर सर्वच महिन्यात पाऊस होत असतो. मात्र, मॉन्सूनच्या काळातील पावसाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रभाव. मॉन्सूनचे महिने सोडून इतर कालावधीत होणारा पाऊस हा स्थानिक पातळीवर बाष्पाचे प्रमाण आणि तापमान वाढून पडत असतो. असा पाऊस मर्यादित क्षेत्रात विजांच्या कडकडाटासह पडतो. या उलट मॉन्सून काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेची कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतात. अशा क्षेत्रांना समुद्रातून मोठी ऊर्जा आणि बाष्प प्राप्त होते. त्यांचा प्रभाव शेकडो किलोमीटरपर्यंत असतो. ही कमी दाबाची क्षेत्रे जशी किनारपट्टीजवळ येतील तसा त्यांच्यापासून जमिनीवर मोठ्या क्षेत्रात पाऊस मिळतो. महाराष्ट्राचा विचार करता अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो. सह्याद्रीच्या रांगांमुळे अंतर्गत महाराष्ट्राला या कमी दाबाच्या क्षेत्रांचा विशेष फायदा होत नाही. 
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला मॉन्सूनकाळात मिळणारा बहुतांश पाऊस हा बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे असतो. आंध्रप्रदेश आणि ओरिसाच्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा मोठा फायदा महाराष्ट्राला होतो. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या तीव्रतेवरही पावसाचे प्रमाण अवलंबून असते. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन), चक्रीवादळ (सायक्लोन) या क्रमाने त्यांची तीव्रता वाढत जाते आणि तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या पावसाचे प्रमाणही. ही कमी दाबाची क्षेत्रे शेवटी जमिनीवर प्रवेश करतात आणि ज्या भागातून त्यांचा प्रवास होतो त्या भागात मोठा पाऊस देतात. जमिनीवर आल्यावर मात्र त्यांची तीव्रता झपाट्याने कमी होते. सर्वसाधारणपणे एका कमी दाबाच्या क्षेत्राचे आयुष्य आठवडाभर असते. एका हंगामात कमी दाबाची क्षेत्रे जितकी अधिक निर्माण होतील, तेवढे पावसाचे प्रमाण चांगले राहील असे मानले जाते.



पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती (ऑफ शोर ट्रफ)
मॉन्सून सक्रीय असल्याचे हे महत्वाचे चिन्ह मानले जाते. मॉन्सून काळात दक्षिण गुजरात ते केरळदरम्यान पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असते. त्याची रुंदी फार नसते, मात्र उत्तर- दक्षिण लांबी चारशे - पाचशे किलोमीटरपर्यंत असते. ट्रफ सक्रीय असताना हवेचा दाब समुद्र सपाटीपासून वातावरणात वर वाढत जातो. दाबाच्या या निमुळत्या आकाराला द्रोणीय स्थिती म्हणतात. या भागात बाष्प एकवटून वातावरणात उंच गेल्याने मुसळधार पाऊस देणाऱ्या मोठ्या ढगांची निर्मिती होते. मॉन्सून सक्रीय असताना पश्चिम किनारपट्टीला बहुतांश पाऊस 'ऑफ शोर ट्रफ' मुळे मिळतो. 

'मॉन्सून ट्रफ' आणि पावसातील खंड 
मॉन्सूनचे वारे उत्तर भारतात अंतिम टप्प्यात पोचले की त्यांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळण घेते. ज्या भागातून मॉन्सूनचे वारे वळण घेतात त्या भागात वायव्येकडून आग्नेयेकडे असा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. याला हवामानशास्त्रीय भाषेत 'मॉन्सून ट्रफ' म्हणतात. मॉन्सून ट्रफची निर्मिती हे मॉन्सूनने बहुतांश भारत व्यापल्याचे द्योतक म्हणायला हवे. भारताच्या उत्तरेकडून पूर्वेकडे पसरलेल्या हिमालयाच्या रांगांना 'मॉन्सून ट्रफ' समांतर असतो. या मॉन्सून ट्रफची निर्मिती नैरुत्येकडून मान्सूनचे येणारे वारे हिमालयाच्या रांगांना धडकून वायव्येकडे वळल्यामुळे होत असावी, असा पूर्वी समज होता. मात्र, आधुनिक निरीक्षणांनुसार हिमालयाशी मॉन्सून ट्रफचा संबंध नसून, त्याची निर्मिती मॉन्सून काळात वातावरणात येणाऱ्या आणि वातावरणातून बाहेर जाणाऱ्या ऊर्जेच्या बदलत्या प्रमाणामुळे होत असावी असे मानले जाते. 
मॉन्सून ट्रफची सामान्य स्थिती वायव्य भारतातून सुरु होऊन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमार्गे बंगालच्या उपसागर अशी असते. मात्र हंगामात हा पट्टा अनेकदा या सामान्य स्थितीच्या उत्तर- दक्षिणेला सरकतो. हा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा बराच उत्तरेला म्हणजेच हिमालयाच्या पायथ्यापाशी पोचला की, हिमालयाच्या पायथ्याशी पावसाचे प्रमाण वाढते आणि देशातील बहुतांश भागातून पाऊस गायब होतो. यालाच 'मॉन्सून ब्रेक' म्हणतात. 'मॉन्सून ब्रेक'चा सर्वाधिक फटका पर्जन्यछायेचा प्रदेश असणाऱ्या मराठवाडा, रायलसीमासारख्या भागांना बसतो. देशाच्या बहुतांश भागात ज्यावेळी पावसात खंड पडलेला असतो, त्यावेळी मात्र हिमालयाच्या परिसरात आणि ईशान्य भारतात चांगला पाऊस होतो. गेला आठवडाभर मॉन्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण स्थानापासून बराच उत्तरेला सरकलेला असल्यामुळे महाराष्ट्र, दक्षिण भारतासह मध्य भारतातही पावसात मोठा खंड पडला, मात्र त्याचवेळी हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पूर आले. हा मॉन्सून ट्रफ आता दक्षिणेला त्याच्या सामान्य स्थितीकडे सरकत आहे. तो त्याच्या मूळ स्थानावर आल्यावर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल. त्यामुळे येत्या आठवड्यात मध्य भारतासह महाराष्ट्रातही पावसाचे पुनरागमन होऊ शकेल अशी अशा करायला हरकत नाही.



महाराष्ट्रातील जूनचा पाऊस 
महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन ३ जूनला वेंगुर्ल्यात झाले. त्यानंतर मॉन्सून ४ जूनला पुण्यापर्यंत, तर ५ जूनला नाशिकपर्यंत पोचला. त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनचा प्रवास रोखला जाऊन १५ जूनपर्यंत त्यामध्ये प्रगती झाली नाही. १५ जूनला त्याने मराठवाड्याचा काही भाग व्यापला. त्यानंतर २० जूनला विदर्भाचा बहुतांश भाग व्यापतानाच २४ जूनला त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन जरी नियोजित वेळेआधी ३ दिवस झाले असले, तरी अनुकूल स्थिती अभावी मॉन्सूनचा राज्यातील प्रवास सुमारे १० दिवस रोखला गेला. याला मुख्य कारण अरबी समुद्रातील प्रतिकूल स्थिती.             
या कालावधीत झालेल्या पावसाचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंत फक्त कोकणात पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. कोकणात जूनच्या सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ टक्के कमी  , मराठवाड्यात ५० टक्के कमी, तर विदर्भात जूनच्या सरासरीच्या १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात मॉन्सून पोचायला वेळ लागला असला तरी, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्या तुलनेत मराठवाडा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणच्या अनुकूल स्थिती पासून वंचित राहिला. म्हणूनच जूनमध्ये तेथील पर्जन्यमान सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी आहे. खरीपासाठी हि स्थिती चांगली नसून  येत्या काळात मराठवाड्यात चांगला पाऊस न झाल्यास चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते.

आयएमडीचा दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज        
- दरम्यान २१ जूनला आयएमडीने अद्ययावत निरीक्षणाच्या आधारावर मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजामधून आयएमडीने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या सरासरीच्या ९८ टक्के पावसाचे प्रमाण बदलून ९५ टक्के केले. म्हणजे आधीच्या अंदाजापेक्षा हंगामात कमी पाऊस पडणार. त्यातहि +/- ४ टक्के एरर गृहीत धरला आहे. 
- दुसऱ्या एका अंदाजानुसार देशभरात जुलैमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९३ टक्के, तर ऑगस्टमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९४ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (एरर +/- ९ टक्के)
- तिसऱ्या अंदाजानुसार संपूर्ण हंगामात वायव्य भारतात तेथील सरासरीच्या ९७ टक्के, ईशान्य भारतात तेथील सरासरीच्या ९५ टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणाऱ्या मध्य भारतात सरासरीच्या ९५ टक्के, तर दक्षिण भारतात सरासरीच्या ९४ टक्के पावसाची शक्यता आहे.
जुलै आणि ऑगस्ट हे भारतातील मॉन्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणारे महिनेच या अंदाजाची पडताळणी करतील.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा